इतर विभागाशी समन्वय साधणार : १५ महिन्यांचा ‘रोडमॅप’नागपूर : राज्याचे नवनियुक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) ए. के. सक्सेना यांनी पदभार स्वीकारताच आपल्या १५ महिन्यांच्या कामकाजाचा ‘रोडमॅप’ तयार केला आहे. त्यामुळे पुढील काळात वन विभागाची गाडी ‘सुपर फास्ट’ गतीने धावण्याची शक्यता आहे. यासाठी सक्सेना यांनी तयार केलेल्या ‘सातसूत्री’ अजेंड्याची त्यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत माहिती दिली. त्यानुसार सक्सेना यांनी वन विभागातील कार्यप्रणाली हाताळताना व्यक्तिआधारित व्यवस्था न ठेवता, संस्थाआधारित व्यवस्था निर्माण करणे, अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सभा घेणे, वन विकास महामंडळ व सामाजिक वनीकरण विभागाशी समन्वय साधणे, कार्यालयीन क्षमता वाढविण्यासाठी अभिलेख्यांचे वर्गीकरण करणे, जुन्या व निरुपयोगी नस्ती नष्ट करून कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे, मूल्यांकन विभागाचे बळकटीकरण व चांगल्या कामांची नोंद घेऊन त्याचे समाजासमोर सादरीकरण करणे, असे प्रमुख निर्णय घेतले आहेत. सेवानिवृत्त वनबलप्रमुख एस. डब्ल्यू. एच. नकवी यांच्या जागी सक्सेना यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी अलीकडेच १ जुलै रोजी या पदाचा पदभार स्वीकारला. यानंतर ते प्रथमच पत्रकारांशी बोलत होते. सक्सेना पुढे म्हणाले, गत पाच वर्षांत वन विभागात फार मोठा बदल झाला. पूर्वी निधीची फार मोठी समस्या भेडसावत होती. परंतु गत काही वर्षांत ती दूर झाली आहे. त्यामुळे विकास कामांना गती मिळाली आहे. पुढील १५ महिन्यांच्या काळात खूपकाही करण्याची इच्छा आहे, शिवाय यापूर्वीही अनेक विकास कामे झाली आहेत. गत २०१० ते २०१४ दरम्यान राज्यात १५७२.१४ लाख रोपांची लागवड करण्यात आली आहे. तसेच २०१४-१५ या आर्थिक वर्षांसाठी सहा कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले असून, आतापर्यंत त्यापैकी दोन कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यात यश मिळाले आहे. दुसरीकडे जंगलाशेजारी राहणाऱ्या लोकांचा जंगलावरील भार कमी करण्यासाठी २०१२-१३ मध्ये २८.६१ कोटी रुपयांचा खर्च करून ४१ हजार ६४६ कुटुंबांना एलपीजी व बायोगॅसचे वाटप करण्यात आले. तसेच २०१३-१४ मध्ये ३२ हजार ८६५ कुटुंबांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्जन भगत, एपीसीसीएफ व्ही. के. सिन्हा व शेषराव पाटील यांच्यासह आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
वनबलप्रमुखांचा ‘सातसूत्री’ अजेंडा
By admin | Updated: July 4, 2014 01:13 IST