बडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला चार्ज कोण करणार?
दीपक नारे
लोकमत न्यूज नेटवर्क
बडेगाव : भंडारा येथील जळीत कांडानंतर पुन्हा एकदा आरोग्य विभागाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. आरोग्य यंत्रणेतील त्रुटीमुळे निष्पाचांचे गेलेले जीव परत येणार नाहीत. मात्र, आरोग्य यंत्रणेचे निरंतर लेखापरीक्षण ही आता काळाची गरज होत चालली आहे. वरिष्ठांचे दुर्लक्ष, खालच्यांना मनस्ताप अशाच प्रकारचा एक चीड आणणारा प्रसंग सध्या बडेगाव (ता. सावनेर ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घडत आहे. या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका क्रमांक (एमएच ३१ - सीक्यू ६५३१)ची केवळ बॅटरी निकामी झाल्यामुळे अनेक दिवसांपासून ही रुग्णवाहिका धक्कामार अवस्थेत उभी आहे. बडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणारी अनेक गावे जंगलात असून, काही गावे दुर्गम भागात आहेत. रात्री-बेरात्री आलेल्या गंभीर रुग्णांना आणि गरोदर मातांना प्राथमिक उपचारानंतर तत्काळ सावनेर किंवा नागपूर येथे पोहोचविणे आवश्यक असते. अशावेळी वाहन नादुरुस्त असल्याचे सांगताच रुग्णाचा जीव टांगणीला लागतो. यावेळी आरोग्य केंद्रातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांना नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. ही बाब येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विभागीय कार्यालय व्यवस्थापक, आरोग्य सेवा परिवहन, नागपूर आणि जिल्हा आरोग्य अधिकारी, नागपूर यांच्या निदर्शनाला आणून दिली आहे. परंतु, अजूनही यावर काेणतीही तत्काळ उपाययोजना करण्यात आलेली नाही. जीव गेल्यानंतर लाखो रुपये खर्च करणारी सरकारी मानसिकता काही हजारांचा आकस्मिक निधी यासाठी तत्काळ का उपलब्ध करून देत नाही, हे न सुटणारे कोडेच आहे.
व्यवस्था असूनही लाखोंचा निधी उभारुन सुसज्ज वैद्यकीय निवासांची बांधकामे करण्यासाठी तत्परता दाखविणारे प्रशासन गोरगरिबांची निकड असलेल्या सोयी-सुविधा पुरविण्याकडे का दुर्लक्ष करते, असा प्रश्न बॅटरीच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेकडे पाहून पडल्याशिवाय राहात नाही.
---
बडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत नागलवाडी, सिरोंजी, कोच्छी, खुबाळा आणि कोथुळणा ही पाच उपकेंद्रे येत असून, ३७ गावे अंतर्भूत आहेत. सावनेर आणि पाटणसावंगी येथे उपलब्ध असलेल्या १०८ रुग्णवाहिकेचा काहीच फायदा बडेगाव परिसरातील रुग्णांना होत नाही. त्यामुळे खापा किंवा बडेगाव केंद्रात एका १०८ रुग्णवाहिकेची नितांत आवश्यकता आहे.
झेड. अन्सारी, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बडेगाव
--
प्राथमिक आरोग्य केंद्र, बडेगाव येथील रूग्णवाहिकेसंदर्भात मला माहिती मिळाली आहे. या परिसरासाठी १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची निकड लक्षात आली आहे. त्यासाठी जिल्हा परिषद यंत्रणेकडे पाठपुरावा करून हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्राधान्यक्रमाने प्रयत्न करणार आहे.
छाया बनसिंगे
जिल्हा परिषद सदस्य, बडेगाव