विरोधकांचा सभा उधळून लावण्याचा इशारा : पोलीस बंदोबस्त राहणारनागपूर : जवाहरलाल नेहरू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त १४ एप्रिल रोजी नागपुरात येणार आहे. नागपूर दौऱ्यादरम्यान त्याची सभादेखील होणार आहे. बजरंग दल तसेच इतर काही संघटनांनी कन्हैयाची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे तर कन्हैय्या समर्थकांनी कुठल्याही परिस्थितीत कार्यक्रम यशस्वी करून दाखविण्याचा दावा केला आहे. एकूणच त्याच्या या दौऱ्यामुळे नागपुरातील राजकीय वातावरण तापले आहे. कन्हैया कुमार गुरुवारी सकाळी १० वाजता दीक्षाभूमी येथे जाणार आहे व बाबासाहेबांच्या अस्थींचे दर्शन घेणार आहे. सकाळी १०.३० वाजता इंदोरा ते यशवंत स्टेडियमपर्यंत भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीला कन्हैया कुमार हिरवी झेंडी दाखविणार आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता नागपुरातील विविध विद्यार्थी संघटनांतर्फे त्याच्या जाहीर भाषणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. कॉंग्रेसनगर येथील धनवटे नॅशनल कॉलेज येथील पंजाबराव देशमुख सभागृहात त्याचे भाषण होईल. डाव्या आघाडीप्रणित ‘एआयएसएफ’, कॉंग्रेसप्रणित ‘ए़नएसयूआय’, यूथ कॉंग्रेस, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, प्रगतीशील छात्रयुवा संघर्ष समिती यांच्यातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)सुरक्षा व्यवस्थेवर तणावकन्हैया कुमार हा देशद्रोही असून तो नागपुरात आल्यास त्याला त्याच्यावर हल्ला करुन धडा शिकवू, अशी धमकी बजरंग दलाने दिली आहे. बजरंग दलाचे ८०० कार्यकर्ते तयारीत राहणार असल्याचे सांगत कन्हैयाच्या येण्याने शहरातील वातावरण बिघडल्यास त्याची जबाबदारी पोलिसांची राहील, असा इशारा त्यांच्याकडून देण्यात आला आहे. युवा संघटना तसेच काही महिला संघटनांनीदेखील विरोध करण्याचा इशारा दिला आहे. दुसरीकडे कन्हैया कुमारला विरोध झाला तर त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल, असे रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियातर्फे (सेक्युलर) स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे एकूणच गुरुवारी शहरातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये यासाठी पोलिसांवर मोठे दडपण राहणार आहे.
कन्हैयाच्या दौऱ्यावरून वातावरण तापले
By admin | Updated: April 14, 2016 03:13 IST