समाज आनंदी, सुखी करणे हे चित्रपटाचे ध्येय असावे : राजदत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 11:10 PM2019-02-07T23:10:06+5:302019-02-07T23:12:05+5:30

चित्रपट हे आनंद देण्यासाठी आहेत. परंतु आनंद देणे हा चित्रपटाचा ५ किंवा १० टक्के उद्देश आहे. चित्रपट बघितल्यानंतर मनात काय विचार सुरू होतात, आपण आपले जीवन त्यानुसार कसे बदलतो ही चित्रपटाची ताकद आहे. त्यामुळे समाज आनंदी आणि सुखी करणे हे चित्रपटाचे ध्येय असावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी आज येथे केले.

The aim of the film is to make the society joy and happy: Rajdutt | समाज आनंदी, सुखी करणे हे चित्रपटाचे ध्येय असावे : राजदत्त

समाज आनंदी, सुखी करणे हे चित्रपटाचे ध्येय असावे : राजदत्त

Next
ठळक मुद्देऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये राजदत्त, बरुआ यांना पुरस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : चित्रपट हे आनंद देण्यासाठी आहेत. परंतु आनंद देणे हा चित्रपटाचा ५ किंवा १० टक्के उद्देश आहे. चित्रपट बघितल्यानंतर मनात काय विचार सुरू होतात, आपण आपले जीवन त्यानुसार कसे बदलतो ही चित्रपटाची ताकद आहे. त्यामुळे समाज आनंदी आणि सुखी करणे हे चित्रपटाचे ध्येय असावे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक राजदत्त यांनी आज येथे केले.
ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन, नागपूर महानगरपालिका, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त, आसामी चित्रपट दिग्दर्शक जाहनु बरुआ यांना पर्सिस्टंट सभागृहात पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर संवाद साधताना राजदत्त म्हणाले, १९३२ मध्ये विदर्भाच्या मातीत माझा जन्म झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा शिडकाव अंगावर झाला. पुढे राजा परांजपे यांची भेट झाली. स्पॉट बॉय म्हणून काम सुरू केले. चित्रपटासाठी आपली उत्कटता असणे महत्त्वाचे आहे. ३१ चित्रपट, सिरियल्स केल्याचे समाधान आहे. माणसाने दुसऱ्यासाठी काहीतरी केले पाहिजे. चित्रपट क्षेत्रानेही समाजाला काही शिकविणे गरजेचे आहे. आसामी चित्रपट दिग्दर्शक जाहनु बरुआ म्हणाले, कथा सांगण्याची आपली जुनी परंपरा आहे. आपण ती विसरत गेलो. चित्रपटाकडे कथा सांगण्याचे माध्यम म्हणून न पाहता केवळ मनोरंजन म्हणून पाहू लागलो. मनोरंजनासोबत नको त्या गोष्टी दाखवून सिनेमाचा दुरुपयोग होत आहे. चांगले प्रेक्षक घडविण्यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवाची गरज आहे. ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे संचालक डॉ. जब्बार पटेल म्हणाले, महोत्सवात निवडक ३१ चित्रपट, २५ लघुपट दाखविण्यात येत आहेत. यातील चित्रपट युवा केंद्री, देशभक्तीपर आहेत. इतर देशातील चित्रपट महोत्सवात त्या देशाचा सहभाग असतो. नागपुरात पहिल्यांदा महानगरपालिका सहभागी झाली ही अभिमानाची बाब आहे.
ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचे सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजीज शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त विजय हुमणे, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशनचे समर नखाते आदी मान्यवरांच्या हस्ते राजदत्त यांना ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन अवॉर्ड आणि आसामी चित्रपट दिग्दर्शक जाहनु बरुआ यांना आऊटस्टँडिंग कॉन्ट्रिब्युशन टु इंडियन सिनेमा अवॉर्ड प्रदान करण्यात आला. प्रास्ताविकातून डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी ऑरेंज सिटी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमुळे नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याचे सांगितले. फेस्टिव्हलच्या माध्यमातून चित्रपट निर्मिती क्षेत्रात तरुणांना प्रोत्साहन देण्याचा उद्देश असल्याची माहिती त्यांनी दिली. संचालन डॉ. सुधीर भावे यांनी केले. आभार उदय गुप्ते यांनी मानले.
नागपूरशी बालपणापासूनचा संबंध
आसामी चित्रपट दिग्दर्शक जाहनु बरुआ म्हणाले, नागपूरशी माझा बालपणापासूनचा संबंध आहे. मी लहान असताना आसामला विनोबा भावे भूदान चळवळीसाठी पदयात्रा करीत आले होते. त्यांना पाहण्याची उत्सुकता असल्यामुळे त्यांचे भाषण ऐकण्यासाठी गेलो होतो. तेथे एकाला विनोबा भावे कुठे राहतात असे विचारले. त्याने ते आश्रमात राहतात असे उत्तर दिले. आश्रम कुठे आहे असे विचारल्यावर त्याने पवनारला असल्याचे सांगितले. पवनार कुठे आहे हे विचारल्यावर त्याने नागपूरजवळ आहे असे सांगितले. परंतु नागपूर कुठे आहे हे माहीत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशी वर्गात शिक्षकांना नागपूरबाबत विचारले. त्यांनाही ते माहीत नव्हते. त्यांनी रागाने अभ्यासात लक्ष दे, तरच मोठा होऊन नागपूरला जाऊ शकशील नाहीतर याच वर्गात राहशील, असे सांगितले.

 

Web Title: The aim of the film is to make the society joy and happy: Rajdutt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.