नागपूर : काेराेनाचे लक्षण दिसत असतानाही रुग्णाची आरटी-पीसीआर टेस्ट करण्यास नकार दिला. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) मध्ये हा प्रकार घडला. साधा ताप असल्याचे सांगून रुग्णाला परत पाठविण्यात आले. मात्र या प्रकरणात केंद्रीकृत लाेकतक्रार निवारण आणि निरीक्षण प्रणाली (सीपीग्राम्स) मध्ये तक्रार केली व केंद्रीय आराेग्य मंत्री डाॅ. हर्षवर्धन यांना माेबाइलवर मेसेज पाठविल्यानंतर एम्सचे डाॅक्टर खडबडून जागे झाले. त्यांनी रुग्णाची तपासणी केली असता ताे पाॅझिटिव्ह आढळून आला. सध्या हे रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.
व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले आशिष मुकीम यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना सांगितले, त्यांचे भाऊ काही दिवसांपासून ताप, सर्दी व खाेकल्याने त्रस्त हाेते. नंतर त्यांची ताेंडाची चव गेली व गंधही येत नसल्याचे समजले. हे काेराेनाचे लक्षण असल्याने १७ एप्रिल राेजी त्यांना मिहानजवळच्या एम्समध्ये नेण्यात आले. टाेकन घेण्यात आले. मात्र डाॅक्टरांना लक्षण असल्याचे सांगूनही केवळ ताप असल्याचे सांगून औषध लिहून दिली आणि टेस्ट करण्यास नकार देत परत जाण्याची सूचना करण्यात आली. भावाने हा प्रकार सांगितल्यावर मुकीम यांनी संबंधित डाॅक्टरांशी चर्चा केली, मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यांनी त्वरित केंद्रीकृत लाेकशिकायत निवारण व निरीक्षण प्रणाली (सीपीग्राम्स) पाेर्टलवर तक्रार दाखल केली. शिवाय केंद्रीय आराेग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांच्या माेबाइलवर मेसेज पाठविला. या दाेन्हीची डिजिटल काॅपी एम्सच्या संबंधित डाॅक्टरांना दाखविल्यानंतर त्यांची चांगलीच तंतरली. डाॅक्टरांनी रुग्णाची ताबडताेब टेस्ट केली, ज्यामध्ये ताे पाॅझिटिव्ह आढळून आला. सध्या त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले. डाॅक्टरांची चिठ्ठी, तक्रारीची काॅपी व डाॅक्टरांशी झालेल्या संवादाचा अहवाल लाेकमतजवळ आहे. याबाबत एम्सचा पक्ष समजण्यासाठी प्रयत्न केले असता संपर्क हाेऊ शकला नाही.
रिपाेर्ट लवकर मिळावा म्हणून एम्सला गेलाे
मुकीम यांनी सांगितले, सीए असण्यासह भाजपचे शहर काेषाध्यक्षही आहेत. त्यामुळे त्यांनी त्वरित मंत्री व पाेर्टलवर तक्रार केली. मात्र सामान्य नागरिकांनी काय करावे. त्यामुळेच त्यांना अनेक समस्या सहन कराव्या लागत आहेत. आरटीपीसीआरचा रिपाेर्ट यायला तीन ते चार दिवसाचा कालावधी लागताे. मात्र एम्समध्ये एका दिवसात रिपाेर्ट मिळत असल्याने इकडे टेस्ट करायला आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र येथे आलेला अनुभव संतापजनक असल्याचे ते म्हणाले.