- सायकल चालवून दरवाढीचा विरोध : केंद्र व राज्यांचा कर व सेस
नागपूर : पाच राज्यांतील निवडणुकांनंतर पेट्रोलियम कंपन्यांनी ५ ते २८ मेदरम्यान पेट्रोल आणि डिझेलची अठरादा वाढ केली आहे. मध्य प्रदेशातील सर्वच जिल्हे आणि महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर शंभरावर गेले आहेत. शनिवारी व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सायकल चालवून दरवाढीचा विरोध केला.
इंधनावर आकारण्यात येणारा अतोनात कर आणि सेस कमी करून कोरोना महामारीने संकटात असलेल्या लोकांना दिलासा देण्याची मागणी व्यापाऱ्यांनी केली. दरवाढीविरोधात आंदोलन करताना नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष सीए कैलास जोगानी सायकलने घरून कार्यालयात गेले. त्यांनी स्वस्थ जीवनासाठी सायकल चालविण्याचा संदेश दिला. जोगानी म्हणाले, वर्ष २०२४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आले तेव्हा केंद्र सरकारचा पेट्रोलवर ९.४८ टक्के आणि डिझेलवर ३.५६ टक्के कर होता. आता पेट्रोलवर ३२.९८ टक्के आणि डिझेलवर ३१.८३ टक्के कर आकारण्यात येत आहे. मे २०२० मध्ये क्रूड ऑईलचे दर कमी झाल्याचा फायदा सरकारने नागरिकांना दिला नाही. उलट पेट्रोल व डिझेलचे दर वाढविले. आता केंद्राने कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा. दुसरीकडे महाराष्ट्रात पेट्रोल व डिझेलवर व्हॅट आणि सेस आकारण्यात येतो. राज्य शासनानेही हा कर कमी करावा. पेट्रोल आणि डिझेल जीएसटीच्या टप्प्यात आणल्यास दर नियंत्रणात येतील.