लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जामिनदाराचे घर तारण ठेवून कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डींग मटेरियल सप्लायरचे त्याच्या भागीदारांनी अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांनी धाव घेऊन आरोपींच्या तावडीतून पीडिताची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी सुरू झालेली अपहरणाची ही नाट्यमय घडामोड रात्री ११ वाजता संपुष्टात आली.म्हाळगीनगर बेसा पॉवर हाऊस चौकात प्रशांत सखाराम वंजारी (वय ३७) राहतात. त्यांच्याकडे तीन ट्रक टिप्पर असून ते गिट्टी रेती तसेच बांधकाम मटेरियल पुरविण्याचे काम करतात. मौदा येथील अजय ज्ञानेश्वर साठवणे (वय २५) आणि त्याचा भाऊ विक्की ज्ञानेश्वर साठवणे हे दोघे प्रशांत वंजारीचे भागीदार आहेत. व्यवसाय वाढविण्यासाठी ट्रक विकत घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठी वंजारीने १० लाखांचे कर्ज घेतले. तारण म्हणून साठवणे याचे घर फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवण्यात आले. दरम्यान, कर्जाचे हप्ते थकल्यामुळे व्याज धरून कर्जाची रक्कम १८ लाखांच्या पुढे गेली. त्यामुळे वसुलीसाठी कर्ज देणारांनी साठवणेबंधूंना वेठीस धरले. त्याचे घर लिलाव करण्याचा इशारा दिला. यासंबंधाने वारंवार सांगूनही वंजारी दाद देत नव्हता. त्यामुळे साठवणे बंधूंची कोंडी झाली. यातून वंजारी आणि साठवणेंमध्ये वाद झाला. तो कर्जाची रक्कम देणार नाही, हे ध्यानात आल्याने साठवणे बंधूंनी आपल्या साथीदारांसह सोमवारी नागपुरात येऊन प्रशांत वंजारीला जबरदस्तीने आपल्या वाहनात कोंबले. त्यांना मारहाण करीत सरळ मौदा येथे नेले आणि तेथे त्याला थकीत कर्जाच्या रकमेची मागणी केली.इकडे प्रशांतचे अपहरण केल्याचे माहीत पडल्याने त्यांचे मोठे बंधू सुरेश सखाराम वंजारी (वय ४३) यांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच नियंत्रण कक्षातून ही माहिती सर्वत्र दिली. परिमंडळ चारचे उपायुक्त नीलेश भरणे यांना ते कळताच त्यांनी हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठून आरोपी आणि प्रशांतचे मोबाईल लोकेशन तपासले. ते मौद्यात असल्याचे कळताच पोलीस पथक तिकडे पाठविले. या पथकाने रात्री ११ वाजता आरोपी साठवणेच्या घरावर छापा घातला. साठवणे बंधू आणि त्यांच्या तावडीतील प्रशांत यांना ताब्यात घेऊन नागपुरात आणले.आरोपींना पोलीस कोठडीचौकशीत हे अपहरण खंडणीसाठी नव्हे तर तांत्रिक स्वरूपाचे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने पोलिसांनी सुरेश वंजारी यांच्या तक्रारीवरून साठवणे बंधू आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. ठाणेदार सत्यवान माने यांनी आज दुपारी आरोपींना न्यायालयात हजर करून त्यांचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला.
नागपुरात भागीदाराचे अपहरण करून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 20:25 IST
जामिनदाराचे घर तारण ठेवून कर्जाचे हप्ते भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या एका बिल्डींग मटेरियल सप्लायरचे त्याच्या भागीदारांनी अपहरण करून त्याला बेदम मारहाण केली. वेळीच पोलिसांनी धाव घेऊन आरोपींच्या तावडीतून पीडिताची सुटका केल्याने पुढील अनर्थ टळला. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी दुपारी सुरू झालेली अपहरणाची ही नाट्यमय घडामोड रात्री ११ वाजता संपुष्टात आली.
नागपुरात भागीदाराचे अपहरण करून बेदम मारहाण
ठळक मुद्देकर्जामुळे कोंडी झाल्याने केला गुन्हा : आरोपी गजाआड