मिठाईतील भेसळीचा लोकांच्या जीवाशी खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 12:56 AM2019-09-07T00:56:24+5:302019-09-07T00:57:26+5:30

काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व प्रशासन विभाग अपयशी ठरला आहे.

Adulteration in sweets issue | मिठाईतील भेसळीचा लोकांच्या जीवाशी खेळ

मिठाईतील भेसळीचा लोकांच्या जीवाशी खेळ

googlenewsNext
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करावी : ग्राहकांचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सणासुदीच्या काळात दूध, खवा, मिठाई आणि इतर खाद्यपदार्थांची मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मात्र काही लोक पैशाच्या लालसेपोटी भेसळयुक्त खाद्यपदार्थांची विक्री करुन लोकांच्या जीवाशी खेळतात. हॉटेलचालकांवर कारवाई करण्यात अन्न व प्रशासन विभाग अपयशी ठरला आहे. मोहिमेअभावी हॉटेलचालक मस्त आहेत. भेसळखोरांवर कारवाई करून कठोर शिक्षा करावी, असा सूर अनेकांनी लोकमतशी बोलताना काढला.
अन्न सुरक्षा कायद्यातील मानांकनानुसार अन्नाची गुणवत्ता तपासण्यात येते. या मानांकनाचे पालन होते की नाही, हे तपासण्यासाठी प्रयोगशाळेमध्ये विविध पद्धती अवलंबून त्या निकषांवर चाचण्या येतात. पूर्वी धडक मोहिमांमुळे भेसळ करणाऱ्यांवर चाप बसला होता. पण आता हॉटेलचालकांवर कारवाई होत नसल्याचे दिसून येत आहे.

भेसळखोरांना लगाम लावणे अशक्य
ग्राहक महेंद्र आदमने म्हणाले, सणासुदीच्या काळात भेसळयुक्त खाद्यपदार्थ विकणारे आणि तयार करणाऱ्यांची चलती असते. पैशाच्या लालसेपोटी जीवाशी खेळणाऱ्या या समाजकंटकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. भेसळयुक्त खाद्यपदार्थ तयार करणारे व विकणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासनाची करडी नजर असते. परंतु कारवाईबाबत उदासीन धोरण असते. विभागाने नियमितपणे अशा भेसळखोरांवर लक्ष ठेवून कारवाई करावी. भेसळखोरांना रोखण्यासाठी प्रशासनाबरोबर नागरिकांनीही सतर्क राहिले पाहिजे.

इच्छाशक्तीचा अभाव
भाऊ पत्की म्हणाले, अन्न व औषध प्रशासन खात्यात पुरेसे मनुष्यबळ नाही आणि काम करण्याची जबर इच्छाशक्ती नसल्यामुळे कारवाई होत नाही. होते ती नगण्यच असते. भेसळयुक्त खाद्यपदार्थाबरोबरच दूध भेसळही नित्याची बाब आहे. अशा कारवाईच्या उपाययोजना करताना कायमस्वरूपी भरारी पथके स्थापन व्हावीत. न्यायालयानेही अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी.

शोधमोहिम राबवावी
पंकज गाडे म्हणाले, कायद्यानुसार भेसळ हा गुन्हा असतानाही व्यापारी सणासुदीच्या काळात अन्नात भेसळ करतात. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, हे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. अन्न विषबाधेची घटना घडली की, हॉटेलवर धाड पडते आणि भेसळयुक्त पदार्थ जप्त होतात. मात्र, या धाडी अगोदरपासून पडायला हव्यात. त्यासाठी अन्नपदार्थ भेसळ शोधमोहिम अखंड राबवणे गरजेचे आहे.

ग्राहकांनीही सतर्क राहावे
अशोक शेंडे म्हणाले, भेसळ करणाऱ्यांवर अंकुश ठेवायला हवा. प्रत्येक सणांमध्ये मिठाई व गोड पदार्थांची मोठी मागणी असते. प्रशासनाच्या संबंधित खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी आपापले कर्तव्य पद्धतशीर काटेकोरपणे व शिस्तीने बजावल्यास भेसळ माफियांवर वचक बसेल.

कायमस्वरूपी यंत्रणा हवी
विश्वास क्षीरसागर म्हणाले, अन्नपदार्थात कुठली ना कुठली भेसळ असल्याने त्याचे विपरीत परिणाम कालांतराने शरीरावर होताना दिसतात. भेसळमाफियांना शासकीय यंत्रणेची भीती राहिलेली नाही. भेसळ रोखण्यासाठी एक कायमस्वरूपी विशेष यंत्रणा कार्यान्वित झाली पाहिजे. भेसळखोरांना अटकाव करण्यासाठी त्यांना फासावर लटकविणेच उचित ठरेल.

विभागातर्फे नियमित कारवाई
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपुरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यानंतर विभागातर्फे नियमित तपासणी मोहीम राबविण्यात येते. सणासुदीत हॉटेलमधील मिठाई आणि खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. विश्लेषणाच्या आधारावर कारवाई करून दंड आकारण्यात येतो. अन्न मानके कायद्यानुसार अशा प्रकरणांमध्ये शिक्षेची तरतूद आहे. ग्राहकांनी दक्ष राहून भेसळ करणाऱ्याविरुद्ध विभागाकडे तक्रार नोंदविता येते.

Web Title: Adulteration in sweets issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.