गृहविलगीकरणातील रुग्णांची रेमडेसिवीरसाठी भटकंती
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोरोनाच्या गंभीर रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे. मनपा प्रशासनाने बेड मिळण्यासाठी मदत कक्षाचा ०७१२-२५६७०२१ क्रमांक दिला असला तरी याचा रुग्णांना कोणताही लाभ होताना दिसत नाही. या क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तर प्रतिसाद मिळत नाही. अशीच अवस्था कोविड रुग्णालयांची आहे. साइटवर उपलब्ध माहितीनुसार खाली बेडसाठी रुग्णांचे नातेवाईक संबंधित रुग्णालयाशी संपर्क साधतात. परंतु प्रतिसाद मिळत नाही. तासनतास फोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळत नाही. अखेर त्रस्त रुग्णाचे नातेवाईक रुग्णाला गाडीत टाकून शहरातील हॉस्टिलमध्ये भटकंती करतात. दुर्दैवाने हॉस्टिलमध्ये पोहोचल्यावरही बेड मिळत नाही.
जरीपटका येथील रहिवासी कपिल आपल्या वडिलांना बेड मिळावा यासाठी गुरुवारी सकाळी प्रयत्न करीत होते. त्यांनी मनपाच्या कोरोना वॉर रूमच्या मदत कक्षाकडे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु काही उपयोग झाला नाही. त्यानंतर कपिल आपल्या वडिलांना घेऊन मनपाच्या पाचपावली रुग्णालयात पोहोचला. परंतु बेड नसल्याचे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. त्यानंतर त्यांनी मेयो, मेडिकल व काही खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली. परंतु बेड मिळाला नाही. मनपाच्या वेबसाइटनुसार मदर अॅण्ड चाइल्ड हॉस्पिटलमध्ये तीन बेड खाली होते. परंतु या हॉस्पिटलचा फोन उचलत नव्हते. तसेच जामठा येथील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गुरुवारी १०० बेडचे कोविड रुग्णालय सुरू झाल्याची माहिती मिळाली. या हॉस्पिटलच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रतिसाद मिळाला नाही.
......
गृहविलगीकरणातील रुग्णांना रेमडेसिविर नाही
जिल्हा प्रशासनाने औषध दुकानांना रेमडेसिविरच्या विक्रीला बंदी घातली आहे. फक्त कोविड रुग्णालयांना पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु रुग्णालयात बेड मिळत नसल्याने अनेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. डॉक्टर त्यांना रेमडेसिविर लिहून देतात. परंतु औषध दुकानातून त्यांना ते मिळत नाही. प्रसारमाध्यमातील गिरीश झुनके आपल्या वडिलांना रेमडेसिविर इंजेक्शन देण्यासाठी भटकंती करीत आहेत; परंतु ते त्यांना मिळाले नाही.
.........
रुग्णांना मृत्यूसाठी सोडले
एनजीओ अॅक्शन कमिटीचे सचिन बिसेन व सहकारी परिचित रुग्णांच्या मदतीसाठी औषध व बेडसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु बेड उपलब्ध होत नाही. रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नसल्याची माहिती त्यांनी दिली. रुग्णांना मृत्यूसाठी वाऱ्यावर सोडले असल्याचा आरोप त्यांनी केला.