नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हत्या प्रकरणातील एका आरोपीला सदोष मनुष्यवधासाठी दोषी ठरवून सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण चंद्रपूर जिल्ह्यातील आहे.बाबाजी ऊर्फ बापुजी भाऊजी धापकस (४०) असे आरोपीचे नाव असून तो भंगाराम तळोधी, ता. गोंडपिपरी येथील रहिवासी आहे. मृताचे नाव दादाजी सोनुले होते. आरोपीची मुलगी दादाजीच्या नातवासोबत पळून गेली होती. यामुळे आरोपीचा सोनुले कुटुंबीयांवर राग होता. परिणामी त्याने २० मे २०१० रोजी दादाजीवर कुऱ्हाडीने वार केला. यामुळे दादाजीचा मृत्यू झाला. ७ मे २०१२ रोजी चंद्रपूर सत्र न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३०२(हत्या)अंतर्गत जन्मठेप सुनावली होती. याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता, सत्र न्यायालयाच्या निर्णयात बदल करून आरोपीला भादंविच्या कलम ३०४-१(सदोष मनुष्यवध)अंतर्गत सात वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. आरोपीचा दादाजीची हत्या करण्याचा उद्देश नव्हता.त्याने एकदाच व तोही कुऱ्हाडीच्या बोथट बाजूने वार केला, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने निर्णयात नोंदविले आहे. (प्रतिनिधी)
आरोपीला सात वर्षे सश्रम कारावास
By admin | Updated: March 25, 2015 02:37 IST