योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याच्या तिकीटांचा काळाबाजार अखेरच्या क्षणापर्यंत सुरू होता. बुधवारी रात्री पोलिसांनी सदरमधील व्हीसीए मैदानाजवळ काळाबाजार करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. सोशल मीडियामुळे इन्फ्लुएन्सर झालेल्या डॉलीच्या टपरीजवळ गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाचच्या पथकाने ही कारवाई केली.
मोहम्मद जुनैद मोहम्मद जमालुद्दीन (२९, हबीबनगर, टेकानाका) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी व्हीसीएजवळील डॉलीच्या टपरीजवळ उभा राहून तिकीटांचा काळाबाजार करत असल्याची पोलिसांना खबऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली. रात्री १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी तेथून ताब्यात घेतले. त्याच्याजवळ चार तिकीट आढळल्या. तो हजार रुपयांचे तिकीट चार हजारांना विकत होता. त्याच्या ताब्यातून ४ हजारांची तिकीटे, मोटारसायकल जप्त करण्यात आली. त्याच्याविरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला व त्याला तेथील पथकाच्या हवाली करण्यात आले.