लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील सर्वाधिक गरीब, मागास व नक्षल हिंसाग्रस्त जिल्हा हा गडचिरोलीवरचा डाग पुसून निघू पाहत आहे. शुक्रवारी राज्य विधिमंडळात सादर झालेल्या आर्थिक पाहणी अहवालात दरडोई उत्पन्नाबाबत गडचिरोलीने गेल्या वर्षीच्या तुलनेत दोन पायऱ्यांची झेप घेतली असून आता नंदुरबार, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यांपेक्षा गडचिरोलीचे दरडोई उत्पन्न अधिक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये माओवाद्यांच्या कारवायांना पोलिसांनी घातलेला आळा आणि पोलाद उद्योगासह विविध क्षेत्रांत होत असलेली गुंतवणूक यामुळे गडचिरोलीत समृद्धीची पहाट अवतरताना दिसते.
अर्थखाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीशुक्रवारी विधिमंडळात राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. यात मागील २०२३-२४ आर्थिक वर्षातील दरडोई उत्पन्नाचे संदर्भलक्षात घेता गडचिरोली व विदर्भाच्या दृष्टीने या अहवालाचे वैशिष्ट्ये म्हणजे आता स्पष्टपणे गडचिरोलीची आर्थिक स्थिती अन्य जिल्ह्यांपेक्षा सुधारली आहे.
मागील तीन वर्षांचा विचार करता गडचिरोलीने तळाच्या स्थानावरून आता खालून चौथ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे. अर्थात, आधी देशाची व नंतर राज्याची सरासरी ओलांडण्यासाठी आणखी प्रयत्न करावे लागणार आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये घोषित झालेले देशी विदेशी गुंतवणुकीचे करार प्रत्यक्षात साकारले तर अशी झेप नक्की शक्य होईल.
मागच्या आर्थिक वर्षात राज्याचे सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख, ७८ हजार ६८१ असून चालू आर्थिक वर्षात ते ३ लाख ९ हजार ३४० होईल, असा अंदाज आहे. तथापि, राज्याच्या विकासाचा असमतोल अत्यंत चिंताजनक आहे.
गेल्या मार्चमधील आर्थिक पाहणीत देशाच्या दरडोई उत्पन्नाच्या सरासरीपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या राज्यातील जिल्ह्यांची संख्या अकरा होती. ती आता बारा झाली आहे. त्याशिवाय यंदा आणखी पंधरा जिल्हे असे आहेत की, ज्यांचे सरासरी दरडोई उत्पन्न राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. म्हणजेच केवळ ९ जिल्ह्यांमध्ये दरडोई उत्पन्न राज्याच्या सरासरीपेक्षा अधिक आहे.
मागास जिल्ह्यांची तळापासून वर अशी उतरंड
- आर्थिक वर्ष २०२३-२४ नंदुरबार, वाशिम, बुलडाणा, गडचिरोली, हिंगोली, यवतमाळ, परभणी, बीड, जालना, नांदेड, जळगाव व गोंदिया (सर्व देशाच्या सरासरीच्या खाली)
- धुळे, धाराशिव, अमरावती, लातूर, भंडारा, अकोला, चंद्रपूर, वर्धा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, रत्नागिरी, नाशिक, सोलापूर व सांगली (राज्य सरासरीच्या खाली)
- मुंबई (उपनगरसह), ठाणे (पालघरसह), पुणे, नागपूर, रायगड, कोल्हापूर व सिंधुदुर्ग (राज्य सरासरीच्या वर)
राज्यातील गरीब जिल्हे : आर्थिक वर्ष २०२२-२३
वाशिम, गडचिरोली, नंदुरबार, बुलडाणा, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, नांदेड, बीड, गोंदिया व परभणी
आर्थिक वर्ष २०२१-२२नंदुरबार, गडचिरोली, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, बीड व परभणी
आर्थिक वर्ष २०२०-२१गडचिरोली, नंदुरबार, वाशिम, बुलडाणा, यवतमाळ, परभणी, हिंगोली व बीड