कोराडी रोडवर पाच ठार: महिंद्रा पिकअपची ट्रकला धडक नागपूर : भरधाव महिंद्रा पिकअपने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. यात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. हा भीषण अपघात कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नवीन औष्णिक प्रकल्पाजवळ रविवारी रात्री ९.५0 वाजताच्या सुमारास झाला. अपघात एवढा भीषण होता की, मृतांचा चेहरा चेंदामेंदा झाला होता. त्यामुळे त्यांची ओळख वृत्त लिहिस्तो पटली नव्हती. जखमींमध्ये शिवभिला सिंग (४0), विलाप्रताप सिंग (३५) व ज्ञानेश्वर बागडे (३५, रा. तेलकामठी, ता. सावनेर) यांचा समावेश आहे. प्राथमिक तपासणीत असे आढळून आले की, महिंद्रा पिकअपचा चालक हा दारू प्यायला असल्याने सदर अपघात झाला. हे सर्व जण एमएच-३१/डीसी-४१५३ क्रमांकाच्या महिंद्रा पिकअपने सावनेरहून नागपूरकडे येत होते. दरम्यान, कोराडी येथील नवीन वीज प्रकल्पाजवळ या महिंद्रा पिकअपने रोडच्या कडेला उभ्या असलेल्या एमएच-४0/वाय-२६१५ क्रमांकाच्या ट्रकला जोरदार धडक दिली. यात अनेकांच्या डोक्याला जबर मार बसला. मृतांसह जखमींना लगेच मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. सदर ट्रक हा रेतीची वाहतूक करणारा असून, तो पंक्चर झाल्याने नागपूरच्या दिशेने रोडच्या कडेला उभा होता. या ट्रकच्या मागच्या भागाला रेडियमचे स्टीकर नसल्याने तसेच रोडवर प्रकाशाची व्यवस्था नसल्याने भरधाव महिंद्रा पिकअप या ट्रकवर आदळली. या अपघातातील जखमी व मृतांमध्ये हे उत्तर प्रदेशातील असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अपघातांचा वार!
By admin | Updated: May 26, 2014 01:06 IST