नागपूर : यंदा बारावीचा निकाल ‘छप्पर फाड के’ लागल्यामुळे विद्यार्थ्यांंसोबतच महाविद्यालयांमध्येदेखील आनंदाचे वातावरण आहे. विशेषत: नागपूर विद्यापीठातील पारंपरिक अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांंची प्रवेशसंख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागपूर विभागाचा निकाल यंदा ८९.0७ टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात चक्क १५.९७ टक्क्यांची वाढ झाली आहे. मागील वर्षी अभियांत्रिकीसह बी.एस्सी., बी.कॉम. व बी.ए यासारख्या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या जागा मोठय़ा प्रमाणावर रिक्त होत्या. विशेषत: कला व वाणिज्य शाखेतील प्रवेशाचे चित्र असमाधानकारक होते. गेल्या वर्षी नागपूर विभागात जवळपास ९८ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. परंतु यंदा नागपूर विभागात कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे मिळून जवळपास १ लाख २६ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. बारावीत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांंमध्ये विज्ञान शाखेतील ५0,२१४ विद्यार्थी आहेत, तर कला शाखेत ५२, २६५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षी हीच संख्या केवळ ३६,६१८ इतकी होती. कला शाखेत उत्तीर्ण होणार्या विद्यार्थ्यांंची संख्या ५२ हजार २६५ इतकी आहे. जवळपास सर्वच शाखांच्या निकालात वाढ झालेली आहे.शिक्षणासाठी विभागाबाहेर जाणार्या विद्यार्थ्यांंची संख्या लक्षात घेतली तरी, महाविद्यालयांना यंदा प्रवेश वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. निकाल जाहीर होताच अनेक महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांंंनी आपल्याकडेच प्रवेश घ्यावेत, याकरिता निरनिराळे प्रयोग करण्यात येत आहेत. बेसिक सायन्सला प्राधान्यसामान्यत: विज्ञान शाखेचे विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात अभियांत्रिकीकडे वळतात, असा अनुभव आहे. परंतु गेल्या तीन वर्षांंपासून सातत्याने अभियांत्रिकीच्या रिक्त जागांची संख्या वाढीस लागली आहे. विद्यार्थ्यांंंमध्ये अभियांत्रिकीबद्दल फारशी क्रेझ राहिलेली नाही. अनेक विद्यार्थी बेसिक सायन्सला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे बी.एस्सी.ला यंदा चांगली मागणी राहील, अशी आशा वर्तविण्यात येत आहे.(प्रतिनिधी)
पारंपरिक अभ्यासक्रमांमधील प्रवेश वाढणार?
By admin | Updated: June 4, 2014 01:10 IST