२२ मार्गांनी करता येतो अंबाझरी तलाव परिसरात प्रवेश : हायकोर्टात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 08:12 PM2019-07-25T20:12:34+5:302019-07-25T20:15:50+5:30

हे धक्कादायक असले तरी खरे आहे. अंबाझरी तलाव परिसरात विविध २२ मार्गांनी प्रवेश करता येतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत आहे. तसेच, जनावरे व कुत्रे २४ तास परिसरात वावरत असतात. त्याचा या परिसरावर वाईट परिणाम होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला गुरुवारी ही माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन यावर तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश वन विभाग व महापालिकेला दिले.

Access to the Ambazari Lake area can be done in 22 ways | २२ मार्गांनी करता येतो अंबाझरी तलाव परिसरात प्रवेश : हायकोर्टात माहिती

२२ मार्गांनी करता येतो अंबाझरी तलाव परिसरात प्रवेश : हायकोर्टात माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देतातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : हे धक्कादायक असले तरी खरे आहे. अंबाझरी तलाव परिसरात विविध २२ मार्गांनी प्रवेश करता येतो. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात मानवी हस्तक्षेप होत आहे. तसेच, जनावरे व कुत्रे २४ तास परिसरात वावरत असतात. त्याचा या परिसरावर वाईट परिणाम होत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला गुरुवारी ही माहिती देण्यात आली. त्यानंतर न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन यावर तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश वन विभाग व महापालिकेला दिले.
यासंदर्भात उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाला देण्यात आलेल्या अन्य माहितीनुसार, हिंगणा एमआयडीसी व वाडी येथील सांडपाणी मिसळत असल्यामुळे अंबाझरी तलावातील पाणी प्रदूषित झाले आहे. नीरीचे तज्ज्ञ तलावातील पाण्याची तपासणी करणार आहे. त्याचा अहवाल व उपाययोजनांची माहिती तीन आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. याशिवाय नीरी तलावात झपाट्याने वाढत असलेल्या जलवनस्पतीच्या निर्मूलनाचा मार्गही सांगणार आहे. सरकारच्या वृक्षारोपण मोहिमेंतर्गत तलाव परिसरात २० हजार झाडे लावण्यात येणार आहेत. तसेच, वन विभाग, महापालिकेच्या मदतीने तलावाचे खोलीकरण करणार असून त्यातून निघणारा गाळ झाडांच्या संवर्धनाकरिता वापरला जाणार आहे. न्यायालयाने हे सर्व मुद्दे रेकॉर्डवर घेऊन प्रकरणात १ ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे अ‍ॅड. एस. एस. सन्याल, नासुप्रतर्फे अ‍ॅड. गिरीश कुंटे, वाडी नगर परिषदेतर्फे अ‍ॅड. मोहित खजांची, राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. सुमंत देवपुजारी तर, महापालिकेतर्फे अ‍ॅड. संगीता जाचक यांनी कामकाज पाहिले.
एसटीपीला मंजुरी केव्हा
अंबाझरी तलावात सांडपाणी मिसळू नये याकरिता वाडी येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारला जाणार आहे. त्याला किती दिवसात मंजुरी प्रदान करता अशी विचारणा उच्च न्यायालयाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला केली व यावर एक आठवड्यात उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, प्रकल्पाचा प्रस्ताव कधी सादर करण्यात आला, प्रस्तावात असलेल्या त्रुटी इत्यादीची माहितीही प्राधिकरणला मागण्यात आली.

Web Title: Access to the Ambazari Lake area can be done in 22 ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.