आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तथागत गौतम बुद्धांना ज्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली. ते ठिकाण म्हणजे बुद्धगया होय. बिहार राज्यातील गया येथील हे ठिकाण जगभरातील बौद्धांसाठी सर्वांत पवित्र असे स्थळ आहे. याच ठिकाणी बौद्ध धम्माचा पाया घालण्यात आला. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतल्यानंतर या ठिकाणी एक महाविहार बांधले. ते महाविहार आज महाबोधी महाविहार म्हणून जगभरात ओळखले जाते. जगभरातील बौद्धांसाठी सर्वांत पवित्र असलेल्या या महाविहाराची प्रतिकृती आता आपल्या नागपुरातही साकारण्यात येत आहे. जागतिक स्तरावर कार्यरत असलेल्या संघकाया फाउंडेशनने यासाठी पुढाकार घेतला आहे.
संघकाया फाउंडेशनचे अध्यक्ष भन्ते प्रशील रत्न गौतम यांची ही संकल्पना आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र व लहान मुलांसाठी बौद्ध विद्यापीठ स्थापन करायचे होते. यासाठी त्यांनी देशभरात जागांचा शोध घेतला. अखेर त्यांचा हा शोध नागपुरात येऊन थांबला. नागपूर येथील मोहपाजवळ असलेल्या लोहगड येथे त्यांनी संघकाया फाउंडेशनचा हा प्रकल्प सुरू केला आहे. यासाठी शास्त्रज्ञ म्हणून सेवानिवृत्त असलेले डॉ. भास्कर यांनी आपली दोन एकर जागा निःशुल्क दान केली. या प्रकल्पाला त्यांनी बुद्धालॅण्ड असे नाव दिले आहे. याच ठिकाणी बुद्धगयेतील महाबोधी महाविहाराची प्रतिकृती असलेले भव्य बुद्धविहार उभारले जाणार आहे. यासाबेतच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय ध्यान केंद्र आणि लहान मुलांसाठी धम्माचे शिक्षण देणारे बौद्ध विद्यापीठसुद्धा उभारण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर वयोवद्वांसाठी ओल्ड एज होमसुद्धा राहणार आहे. या ठिकाणी धम्मकार्याशी संबंधित विविध प्रकल्प राबविले जाणार आहेत. सध्या कामाला सुरुवात झाली आहे. अनेकजण प्रकल्पाला भेटसुद्धा देताहेत.
"संघकाया फाउंडेशन ही संस्था धम्माच्या शांतता, प्रेम आणि करुणेचा प्रचार प्रसाराचे कार्य जगभरात करते. यासोबतच विविध समाजोपयागी कामातही फाउंडेशन अग्रेसर असते. कोविडच्या काळात देशभारत अनेक ठिकाणी फाउंडेशनचे मदतीचे प्रकल्प राबविले. नागपूर ही खऱ्या अर्थाने बुद्धाची भूमी आहे. डॉ. बाबासाहेबांचा वारसा लाभलेल्या या भूमीतूनच बुद्धांचे विचार खऱ्या अर्थाने जगभरात पोहोचू शकतात. त्यामुळे बुद्धालॅण्ड हा प्रकल्प आम्ही येथे सुरू करतोय. बुद्धांच्या शांती आणि करुणेचा प्रचार प्रसाराचे कार्य येथून केले जाईल."- भन्ते प्रशील रत्न गौतम, अध्यक्ष, संघकाया फाउंडेशन