लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विधानभवन नागपूरच्या विस्तारीकरणाला गती मिळाली आहे. विधानभवनाच्या सध्या अस्तिवात असलेल्या जागेवर सात माळ्याच्या भव्य संकूल उभारण्यात येणार असून हे विस्तारीकरण करतांना सध्याच्या इमारतीची ऐतिहासिक शैली अबाधित राहील याची काळजी घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआरडी) हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासंदर्भात विधानभवन विस्तारीकरण प्रकल्प अंमलबजावणी समितीने शुक्रवारी नागपुरात बैठक घेऊन प्रकल्पासंदर्भातील विविध विभागांची परवानगी व मंजुरीची कामे मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
विधानभवन वास्तुच्या विस्तारीकरणांतर्गत नवीन इमारतींच्या बांधकाम प्रकल्प अनुषंगाने गठीत प्रकल्प अंमलबजावणी समितीची पहिली बैठक राज्य विधीमंडळाचे सचिव डॉ. विलास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी विधानभवनात झाली. समितीचे सदस्य तथा विधीमंडळ सचिव शिवदर्शन साठ्ये, उपसचिव विजय कोमटवार, उपसचिव स्वाती ताडफळे, अपर जिल्हाधिकारी प्रविण महिरे, मनपा उपायुक्त मिलींद मेश्राम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे, महाराष्ट्र राज्य पायभूत सुविधा विकास महामंडळाचे अधिक्षक अभियंता नरेश बोरकर यांच्यासह विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.बैठकीत मंडळाचे अधिक्षक अभियंता नरेश बोरकर यांनी प्रकल्पाबाबतचे सादरीकरण केले.
या प्रकल्पासाठी भूमी हस्तांतरण, पर्यावरणीय परवानग्या, वारसा समिती व विमानतळ प्राधिकरणाची मान्यता यांसह दहा प्रमुख मुद्यांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर समिती सदस्यांनी प्रस्तावित जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी समन्वय साधून कामास गती देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
अशी राहील विधानभवनाची विस्तारित इमारत
- प्रस्तावित इमारत एकूण चार ब्लॉकमध्ये बांधण्यात येणार आहे. विस्तारीकरणामध्ये एकाच इमारतीत विधानसभा, विधानपरिषद, सेंट्रल हॉल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती, मंत्र्यांची दालन, दोन्ही सभागृहांचे विरोधी पक्ष नेते आदींची दालने असणार आहेत.
- शेजारीच मंत्रिमंडळ सदस्यांसाठी वेगळी सात मजल्याची इमारत उभारण्यात येणार आहे. तसेच वाहनतळ, उपहारगृह, अभ्यागत कक्ष, सुरक्षा कक्ष आदी सुविधांही राहतील.
- शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाची जागा विधीमंडळास देण्यात आली असून या जागेवर मंत्रालयीन प्रशासकीय कार्यालयांसाठी भव्य इमारत उभारण्यात येणार आहे.
- विधानभवन परिसर हा प्रस्तावित प्रशासकीय इमारतीला भुयारी मार्गाने जोडण्यात येणार आहे.