योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : दोन बीट मार्शल्सने नक्षलविरोधी अभियानाच्या पोलिस निरीक्षकालाच बेदम मारहाण केल्याची बाब समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला आहे. संबंधित पोलिस निरीक्षकाने उपचारासाठी सहकार्य केले नाही व शासकीय वाहनात बसण्यास नकार दिल्यामुळे बीट मार्शलकडून देखील तक्रार करण्यात आली व गुन्हा दाखल करण्यात आला. या एकूण प्रकरणामुळे पोलिस दलाच्या कार्यप्रणालीवर निश्चितच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
संबंधित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे नक्षलविरोधी अभियान येथे कार्यरत आहेत. त्यांच्या तक्रारीनुसार शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते ग्रँड बार येथे जेवायला गेले होते. त्यावेळी तेथे दोन ग्राहकांमध्ये किरकोळ वाद झाला. निरीक्षकाने पुढाकार घेत मध्यस्थी केली व त्यांच्यातील वाद मिटविला. प्रकरण शांत झाल्यावर सर्व जण आपापल्या टेबलवर बसले. दरम्यान, कुणी तरी दिलेल्या माहितीच्या आधारे दोन बिट मार्शल्स बारमध्ये पोहोचले. त्यांनी इतरांना याबाबत विचारायला सुरुवात केली. निरीक्षक जवळच उभे असल्याने त्यांनी त्यांनादेखील विचारले. निरीक्षकाने किरकोळ वाद होता, असे सांगितले. मात्र, दोन्ही कर्मचारी त्यांनाच बळजबरीने पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यांनी काहीही कारण नसताना निरीक्षकाला बेदम मारहाण केली. या प्रकरणात आरोपी बीट मार्शल पंकज मडावीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, वाडी पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून संबंधित बीट मार्शलने तहसील पोलिस ठाण्यात तक्रार केली.
पोलिस निरीक्षकाने मेयोमध्ये उपचार करण्यास सहकार्य केले नाही व शासकीय वाहनात बसण्यास नकार दिला तसेच डॉक्टर व पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा निरीक्षकाविरोधात दाखल करण्यात आला आहे. या एकूण प्रकरणात नेमकी कुणाची बाजू बरोबर आहे हे शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या भूमिकेकडे आता पोलीस वर्तुळाचे लक्ष लागले आहे.