२० वर्षे मुदतीसाठी कर्ज : प्रकल्प सौर ऊर्जेवरनागपूर : नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी केंद्रीय आर्थिक व्यवहार विभाग आणि फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी (एएफडी) बँक यांच्यात गुरुवारी ९७५ कोटींचा करार झाला. ‘एएफडी’कडून मिळणाऱ्या कर्जाचा कालावधी २० वर्षे राहणार आहे. नवी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथील केंद्रीय आर्थिक विकास विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत केंद्रीय आर्थिक विकास विभागाचे सहसचिव एस. सेल्वा कुमार, भारतातील फ्रान्सचे राजदूत अलेक्झेंडर झिग्लर आणि एएफडी बँक समूहाचे दक्षिण आशिया विभागाचे संचालक निकोलस फॉरेन्ज यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यावेळी केंद्रीय नगरविकास विभाग मंत्रालयाच्या मेट्रो रेल्वे प्रकल्प विभागाचे संचालक जनार्दन प्रसाद, नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे (एनएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शहराची वाहतूक व्यवस्था बळकट होणारअलेक्झेंडर झिग्लर यावेळी म्हणाले, नागपूर मेट्रोला निधी उपलब्ध करून देताना आम्हाला आनंद होत असून मेट्रोच्या प्रत्यक्ष परिचलनामुळे शहराची वाहतूक व्यवस्था अधिक बळकट होणार आहे. फ्रान्स देश वातावरण बदलाचा पक्षधर असून नागपूर मेट्रोचे बहुतांश परिचलन सौर ऊर्जेवर चालणार असल्याने आमची पसंती नागपूर मेट्रोला राहिली आहे. नागपूर मेट्रोच्या कामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. याआधी बेंगळुरू आणि कोची मेट्रोसाठी फ्रान्सने कर्ज उपलब्ध करून दिले आहे. करारामुळे भारत आणि फ्रान्सदरम्यान संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याचे झिग्लर म्हणाले. मेट्रो रेल्वेच्या कामाला गती येणारबृजेश दीक्षित म्हणाले, करारामुळे फ्रान्स डेव्हलपमेंट एजन्सी बँकेकडून नागपूर मेट्रोच्या महत्त्वाच्या कामांसाठी निधी उपलब्ध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाला गती येणार असून प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यास मदत होईल. नागपूर मेट्रोचे काम प्रगतिपथावर असून आतापर्यंत २० टक्के काम पूर्ण झाले आहे. नागपूर मेट्रो रेल्वेच्या परिचलनासाठी एकूण विजेच्या दोन तृतीयांश वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात येणार आहे. अशा पद्धतीचा भारतातील हा पहिला प्रकल्प असणार आहे. यातून मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होईल. नागपूर मेट्रोसाठी जागतिक स्तरावरील उत्तम तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात आला आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. करारासाठी महाराष्ट्र शासन, केंद्रीय नगरविकास मंत्रालय आणि केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहार विभाग आणि एएफडी बँक समूहाचे त्यांनी आभार मानले. विविध कामे मार्गी लागणारकरारानुसार नागपूर मेट्रोच्या कामांसाठी एएफडी बँक २० वर्षे मुदतीसाठी ९७५ कोटी रुपये (१३० मिलियन युरो) कर्ज स्वरूपात देणार आहे. कर्ज रूपाने उपलब्ध होणाऱ्या रकमेतून नागपूर मेट्रोचे सिग्नलिंग, टेलिकॉम, आॅटोमॅटिक फेअर कलेक्शन सिस्टीम (एएफसी), लिफ्ट आणि एस्केलेटर आदी कामे करण्यात येणार आहे. नागपूर मेट्रो रेल्वे कॉपोर्रेशन लिमिटेड आणि केएफडब्ल्यू बँक यांच्यादरम्यान प्रकल्प करार होणार आहे. याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल. कराराचे स्थळ व तारीख लवकरच निश्चित होणार असल्याचे दीक्षित यांनी सांगितले.
नागपूर मेट्रोसाठी ९७५ कोटींचा करार
By admin | Updated: November 18, 2016 02:56 IST