आईच्या हाताला झोंबायच्या मिरच्या; सातवीतल्या लेकाने बनवले मिरची कटर

By निशांत वानखेडे | Published: December 2, 2023 06:53 PM2023-12-02T18:53:37+5:302023-12-02T18:55:12+5:30

जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्याची कमाल : सीईओंनी केले काैतुक

7th standard student made chilli cutter for mother in nagpur | आईच्या हाताला झोंबायच्या मिरच्या; सातवीतल्या लेकाने बनवले मिरची कटर

आईच्या हाताला झोंबायच्या मिरच्या; सातवीतल्या लेकाने बनवले मिरची कटर

निशांत वानखेडे, नागपूर : दरराेज स्वयंपाक करणारी आई जेव्हा मिरची कापायची तेव्हा तिच्या हाताची फार आग व्हायची. त्याला वाईट वाटायचे. मग त्याच्या डाेक्यात भन्नाट आयडिया सुचली. त्याने घरघुती साहित्याचा वापर करून अनाेखे मिरची कटर तयार केले आणि आईला भेट दिले.

हिंगणा पंचायत समितीच्या गुमगाव केंद्रातील सालई दाभाच्या जिल्हा परिषद शाळेतील क्षितिज दिवाकर कोलते या ७ व्या वर्गातील विद्यार्थ्याने तयार केलेल्या या कल्पक उपकरणाचे प्रात्याक्षिक नुकतेच जि.प.च्या सीईओ साैम्या शर्मा यांच्या समाेर सादर केले. आई ललिता काेलते यांच्यासाठी त्याने हे अनाेखे उपकरण तयार केले. क्षितिजच्या या कल्पकतेचे सीईओ यांनीही भरभरून काैतुक केले. उल्लेखनीय म्हणजे सालई दाभा येथील उच्च प्राथमिक शाळेच्या २० विद्यार्थ्यांनी नुकतेच सीईओ यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली. यावेळी शाळेचे शिक्षक व केंद्रप्रमुख उपस्थित हाेते. यावेळी मुलांनी साैम्या शर्मा यांची मुलाखत घेत त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले. या सर्व प्रश्नांचे सीईओ यांनी प्रेमाने उत्तर दिले. इयत्ता सहावी, सातवी, आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाळेत केलेले छोटे छोटे प्रयोग सीईओंच्या कार्यालयातच करून दाखवेल. सीईओ यांनी विनाेबा ॲपमध्ये ‘स्टुडंट इनाेव्हेटर्स’ चा फार्म भरून घेण्याच्या सुचना शिक्षक व शिक्षणाधिकारी यांना दिल्या. विद्यार्थ्यांमधील संवाद काैशल्याबाबत त्यांनी शिक्षकांच्या कार्यशैलीची प्रशंसा केली.

याप्रसंगी जिपच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार (प्राथमिक), गटशिक्षणाधिकारी ज्योत्स्ना हरडे, समग्र शिक्षा अभियान सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रमोद वानखेडे, गुमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख भूपेश चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक विजय कोल्हे, शिक्षिका दिपाली काठोके आणि अश्विनी खोब्रागडे उपस्थित होते.

Web Title: 7th standard student made chilli cutter for mother in nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर