अभय लांजेवार
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : शहर आणि महानगरात डिजिटल युग अवतरले आहे. मग आता वायफायच्या या डिजिटल युगात गावखेड्यातील ग्रामपंचायतीसुद्धा मागे राहणार तरी कशा, म्हणूनच केंद्र शासनाच्या भारत नेट ऑप्टिकल फायबर यंत्रणेमुळे तालुक्यातील ग्रामपंचायती वायफाय कनेक्ट होण्याच्या मार्गावर आहेत. उमरेड तालुक्यातील एकूण ४७ ग्रामपंचायतींमध्ये युद्धस्तरावर ही वायफाय जोडणी सुरू असून, कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
अनेकदा गावपातळीवर वायफायची सक्षम यंत्रणा उपलब्ध होत नाही. यामुळे मग अतिशय लहानसहान आणि महत्त्वपूर्ण कामासाठी शहराकडे धाव घ्यावी लागते. आता ही अडचण ग्रामपंचायत परिसरात उद्भवणार नाही. केवळ एका क्लिकवर अवघ्या सेकंदात अवघे जग पालथे करता येणार आहे. ग्रामपंचायतीमधूनच क्षणात जगभरात पोहोचता येणार आहे.
शिवाय, बॅंकिंग सेवा, विविध शासकीय योजना, प्रशासकीय कामे आदींचा लाभही या इंटरनेट सुविधेमुळे मिळणार आहे.
तालुक्यातील बेला, सिर्सी, मकरधोकडा, पाचगाव, सायकी, डव्हा, बोथली, हिवरा, चनोडा, पिपरा, नवेगाव साधू, सेव, बोरगाव कलांद्री, निरवा, उटी, परसोडी, चांपा, हळदगाव आदींसह ४७ ग्रामपंचायतींमध्ये येत्या दोन महिन्यात इंटरनेट सेवा सुरू होण्याचे संकेत आहेत. सन २०१५-१६ ला डिजिटल गावांची घोषणा केल्या गेली होती. आता हे काम तालुक्यात पूर्णत्वास आल्यानंतर वायफाय सेवेची कमालीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
.....
संस्था, कार्यालये होणार कनेक्ट
ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावांमधील कोणत्याही पाच शासकीय संस्था, कार्यालयांनासुद्धा कनेक्ट करीत ही इंटरनेट सेवा देण्यात येणार आहे. यामध्ये शाळा, अंगणवाडी, तलाठी कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, स्वस्त धान्य दुकान आदींचा समावेश राहणार असल्याची माहिती ऑप्टिकल फायबरचे संचालक रमेश गवळी यांनी दिली.
....
ग्रामपंचायती वायफाय झाल्यानंतर आणि इंटरनेट सेवा सुरू झाल्यानंतर याचा लाभ गावातील प्रत्येक घटकाला नक्कीच मिळणार आहे. अनेकांची शासकीय-प्रशासकीय कामे सुरळीत होतील. काम अंतिम टप्यात असून, लवकरच ही सेवा कार्यान्वित करण्याचा आमचा मानस आहे.
- जे. जी. जाधव, खंडविकास अधिकारी, पंचायत समिती उमरेड.