लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमचे खंडित झाले होते, अशा ३७ हजार ८३४ वीज ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीतून दिलासा मिळाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १०,१९६ ग्राहक हे नागपूर जिल्ह्यातील आहेत.
या योजनेचा कालावधी ३१ मार्च रोजी संपत आहे. याअंतर्गत ३१ मार्च २०१४ पूर्वी कायमस्वरूपी खंडित कनेक्शनची मूळ देय रक्कम भरल्यास व्याज आणि विलंब शुल्क माफ केले जात आहे. रिकनेक्शनदेखील घेता येईल. ३० टक्के मुद्दल भरल्यानंतर उर्वरित रक्कम ६ हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधाही आहे. कमी दाबाच्या ग्राहकांना एकरकमी रक्कम भरणाऱ्यांना १० टक्के सवलत आणि उच्च दाबाच्या ग्राहकांना ५ टक्के सवलत दिली जात आहे. विदर्भाबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत ३७,८३४ ग्राहकांनी ४० कोटी ३३ लाख ८५ हजार रुपयांचा भरणा करून थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात माफी मिळवीत थकबाकीतून मुक्तता मिळवली आहे. यात सर्वाधिक १०,१९६ ग्राहक नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील ५,८९३ ग्राहक, गडचिरोली जिल्ह्यातील ३,९०२ ग्राहकांचा समावेश आहे. याशिवाय अकोला २,९२९, वाशिम २,८७२, यवतमाळ २,५८६, अमरावती २,४४४, गोंदिया २,१५३, चंद्रपूर २,००६, वर्धा १,९२६ आणि भंडारा ९२७ या जिल्ह्यातील ग्राहकांचा समावेश आहे.
१ एप्रिलपासून कडक कारवाईयेत्या १ एप्रिलपासून या योजनेचा लाभन घेणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महावितरणने दिला आहे. अशा सर्व थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तपासले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जमीन खरेदी करणाऱ्याला वीज देय रक्कम भरणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनीची वेबसाइट आणि मोबाईल अॅपचा वापर करता येईल, असे महावितरणने म्हटले आहे.