नागपूर : शहरातील अपघातप्रवण क्षेत्र (ब्लॅक स्पॉट) दिवसेंदिवस मृत्यूचा सापळा बनत चालल्याची धक्कादायक स्थिती आहे. २०१७ ते २०१९ या तीन वर्षांत 'ब्लॅक स्पॉट'च्या ठिकाणी ५१६ प्राणांतिक व गंभीर अपघात झाले असून २६२ व्यक्तींना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे. शहरात पूर्वी ५२ ब्लॅक स्पॉट होते. दरम्यानच्या काळात यावर उपाययोजना झाल्याने सध्याच्या घडीला ३२ ‘ब्लॅक स्पॉट’ आहेत. ते कमी करणाऱ्या
ब्लॅक स्पॉटच्या व्याख्येत दरम्यानच्याकाळात बदल करण्यात आला आहे. रस्त्यावरील साधारणत: ५०० मीटर लांबीचे ठिकाण जेथे मागील ३ वर्षांत ५ रस्ते अपघात झाले असतील. ज्यामध्ये व्यक्ती जखमी किंवा मृत्यू झाला असेल किंवा जेथे मागील ३ वर्षांत रस्ते अपघातात १० व्यक्ती मरण पावल्या आहेत, त्या स्थळला ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून निश्चित केले जात आहेत. सध्या वाढते शहर, वाढती वाहने, वाढते रस्ते, वाढते उड्डाण पूल यामुळे सतत होणाऱ्या अपघाताच्या ठिकाणातही वाढ झाली आहे. या ‘ब्लॅक स्पॉट’वर रस्ते सुरक्षा समिती, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस उपआयुक्त शहर कार्यालय अभ्यास करीत आहे. अपघाताची कारणे शोधून महानगरपालिका व बांधकाम विभागाला उपाययोजना करण्याचे सुचवित आहे; परंतु त्याचबरोबर या ‘ब्लॅक स्पॉट’ची माहिती चालकांना होणे गरजेचे आहे. या ठिकाणावरून वाहने हळू चालविण्याची व आवश्यक खबरदारी घेण्याबाबत जनजागृती करणारे फलक आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
-हे आहेत ‘ब्लॅक स्पॉट’
:: एमआयडीसी वाहतूक झोनअंतर्गत राजीवनगर व वाडी येथील मारोती सेवा अमरावती रोड
:: सोनेगाव वाहतूक झोनअंतर्गत शिवणगाव फाटा व छत्रपती चौक
:: सीताबर्डी वाहतूक झोनअंतर्गत झाशी राणी चौक परिसर, मॉरिस टी पॉईंट परिसर, लॉ कॉलेज रोड, कॅम्पस चौक परिसर, रवीनगर चौक परिसर व धंतोली चौक
:: या वाहतूक झोनअंतर्गत झिंगाबाई टाकळी झेंडा चौक ते राज टावर, अयप्पा मंदिर ते गोरेवाडा चौक, पोलीस तलाव, ऑटो हब ते दाभा टोलनाका, गिट्टीखदान चौक त दिनशॉ फॅक्ट्री, नवीन काटोल नाका ते टोलनाका प्राणिसंग्रहालय, गोरेवाडा फॉरेस्ट गेट ते नवीन काटोल नाका चौक, एलआयसी चौक, जपानी गार्डन व गड्डीगोदाम चौक ते लोहापूल.
:: कॉटन मार्केट वाहतूक झोनअंतर्गत मेयो चौक, कॉटन मार्केट चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक सी. ए. रोड परिसर.
:: अजनी वाहतूक झोनअंतर्गत विहीरगाव पूल, बेलतरोडी हुडकेश्वर आऊटर रिंगरोड, महेश धाबा, चिंचभवन बसथांबा.
:: सक्करदरा वाहतूक झोनअंतर्गत शितला माता चौक, चामट चक्की चौक व वाठोडा चौक.
:: इंदोरा वाहतूक झोनअंतर्गत उप्पलवाडी पूल.
:: कामठी वाहतूक झोनअंतर्गत जुना पारडी नाका चौक व चिखली चौक.
-‘एमआयडीसी’ झोन मध्ये ७५ मृत्यू
२०१७ ते २०१९ या तीन वर्षांत ‘एमआयडीसी’ वाहतूक झोनमध्ये मृत्यूची संख्या मोठी आहे. या झोनअंतर्गत ‘ब्लॅक स्पॉट’वर १०६ अपघात झाले असून ७५ मृत्यू झाले आहेत. सोनेगाव झोनमध्ये २७ अपघात झाले असून १९ मृत्यू, सीताबर्डी झोनमध्ये ५५ अपघातांत १३ मृत्यू, सदर झोनमध्ये १२० अपघातांत ५० मृत्यू, कॉटन मार्केट झोनमध्ये १५ अपघातांत ११ मृत्यू, लकडगंज झोनमध्ये ५ अपघातांत ५ मृत्यू, अजनी झोनमध्ये ८७ अपघातांत ४४ मृत्यू, सक्करदरा झोनमध्ये ४३ अपघातांत ८ मृत्यू, इंदोरा झोनमध्ये ११ अपघातांत ७ मृत्यू, तर कामठी झोनमध्ये ४७ अपघातांत ३० मृत्यू झाले आहेत.