सावनेर/कळमेश्वर/नरखेड/काटोल//कामठी/उमरेड/मौदा/कुही/रामटेक/हिंगणा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधितांचा ग्राफ वाढताच आहे. तेरा तालुक्यांमधील बुधवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार ३,०६७ नव्या रुग्णांची भर पडली तर ३३ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागातील बाधितांची संख्या सध्या १,०९,४४६ इतकी झाली आहे. गुरुवारी २,४०८ रुग्णांनी कोरानावर मात केली. त्यामुळे बरे होणाऱ्यांची संख्या आता ७६,६२८ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ३१,४७७ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात १९१ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ३८ तर ग्रामीण भागातील १५३ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्र, केळवद अंतर्गत २ तर चिचोली केंद्रांतर्गत एका रुग्णाचा समावेश आहे.
कळमेश्वर तालुक्यात बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुरुवारी यात १५५ रुग्णांची भर पडली. यात कळमेश्वर-ब्राह्मणी न. प. क्षेत्रातील ३७ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात सर्वाधिक ३५ रुग्णांची नोंद धापेवाडा येथे झाली. यासोबतच बोरगाव खु. येथे ११ रुग्णांची नोंद झाली.
काटोल तालुक्यात ४१० नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात २२३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ६ रुग्ण तर ग्रामीण भागातील २१७ रुग्णांचा समावेश आहे. कोंढाळी केंद्रांतर्गत १११, कंचारी सावंगा केंद्रांतर्गत ८४ तर येनवा केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात २२ रुग्णांची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात ५३ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ३० तर ग्रामीण भागातील २३ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २,४४२ तर शहरात ५६३ इतकी झाली आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव अंतर्गत येणाऱ्या गावात १२ तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावात ११ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यात विविध केंद्रांवर २८१ चाचण्या करण्यात आल्या. त्यात १६ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात वेलतूर येथील १२, कुही (२) तर तितूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. उमरेड तालुक्यात ९७ रुग्णांची भर पडली. यात शहरातील ४८ तसेच ग्रामीण भागातील ४९ जणांचा समावेश आहे.
रामटेक तालुक्यात ८० रुग्णांची भर पडली. यात रामटेक शहरातील ५ तर ग्रामीण भागातील ७५ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५,६९९ इतकी झाली आहे. यातील ४,०५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ७० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,६४७ इतकी झाली आहे.
हिंगणा तालुक्यात ४ मृत्यू
हिंगणा तालुक्यात ४६८ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला. तालुक्यातील मृतांची संख्या २१७ इतकी झाली आहे. गुरुवारी वानाडोंगरी येथे २६, हिंगणा (८), नीलडोह, टाकळघाट व डिगडोह येथे प्रत्येकी ६, रायपूर ५ , मांडवघोराड ४, गिदमगड, डिगडोहपांडे व मोहगाव येथे प्रत्येकी ३, इसासनी, तुरकमारी, अडेगाव, कान्होलीबारा, टाकळी येथे प्रत्येकी २ तर वडधामना, सुकळी बेलदार, शिरुळ, गौराळा, किन्हीधानोली, मोंढा, डेगमा बुद्रुक येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली.