शहरात २२०० जणांना श्वानदंश : १५ वर्षांखालील मुलांची संख्या सर्वाधिकनागपूर : भारतात ‘रॅबिज’मुळे दरवर्षी २५ ते ३० हजार लोक मृत्युमुखी पडतात. जगभरातील ‘रॅबिज’च्या तुलनेत देशाचे प्रमाण ४० ते ५० टक्के आहे. शहरात जानेवारी ते आॅगस्ट २०१४ पर्यंत सुमारे २२०० लोकांना श्वानदंश केला आहे. यात १५ वर्षांखालील मुलांची संख्या सर्वाधिक आहे. उपराजधानीत गल्लीबोळापासून ते रस्त्यावर मोठ्या संख्येत कुत्री दिसून येतात. ही संख्या साडेतीन लाखांच्या आसपास असल्याचा अंदाज खुद्द महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा आहे. यातील मोकाट कुत्री आठ ते दहा जणांना दररोज चावतात. जानेवारी २०१३ ते नोव्हेंबर २०१३ पर्यंत ५ हजार ३३० लोकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. मागील आठ महिन्यात दोन हजार २०० लोकांना श्वान दंश झाला आहे. ही आकडेवारी महापालिकेसह शासकीय रुग्णालयांमधील आहे. परंतु याच्या दुप्पट लोक खासगी इस्पितळात जात असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.पश्चिम आणि पूर्वमध्ये सर्वात जास्त श्वानदंशउपराजधानीत सर्वात जास्त कुत्र्यांनी चावा पश्चिम व पूर्व नागपुरातील लोकांना घेतला आहे. मागील वर्षी पश्चिम व पूर्व नागपुरात आठ हजार लोकांना श्वानदंश झाला आहे. उत्तर नागपुरात एक हजार लोकांना, मध्य नागपुरात ६०० तर दक्षिण नागपुरात ५०० जणांना चावा घेतला आहे. कुत्र्यांच्या झुंडीकडे दुर्लक्षचशहरातील रस्त्यावर रात्री कुत्र्यांच्या झुंडीच्या झुंडी दिसून येतात. रात्रपाळी करून घरी परतणाऱ्या नागरिकांच्या अंगावर हीच मोकाट कुत्री धावून जातात. जाटतरोडी चौक ते मेडिकल चौक मार्ग, लोखंडी पूल ते शनिमंदिर, मानेवाडा रिंग रोड, उंटखाना चौक ते अशोक चौक, प्रतापनगर सिमेंट रोड ते गोपालनगर, काचीपुरा रामदासपेठ मार्ग, अभ्यंकरनगर रोड, सुगतनगर मार्ग, लष्करीबाग चौक ते वैशालीनगर चौक यासह जिथे-जिथे उघड्यावर मासविक्री होते तिथे-तिथे या झुंडी दिसून येतात. परंतु याकडे अद्यापही महापालिकेचे लक्ष नसल्याचे दिसून येते. (प्रतिनिधी)नसबंदी मोहिमेनंतरही कुत्र्यांची पिलावळवाढत्या श्वानदंशाला घेऊन २००६ मध्ये महानगरपालिकेने कुत्र्यांची नसबंदी मोहीम चालविली. परंतु २०११ मध्ये या मोहिमेवर आक्षेप घेतल्याने थंडबस्त्यात पडली. तब्बल तीन वर्षानंतर जुलै २०१४ पासून ही मोहीम पुन्हा सुरू झाली. कोल्हापूरच्या सोसायटी फॉर अॅनिमल प्रोटेक्शन या संस्थेला हे काम देण्यात आले आहे. एका कुत्र्याच्या नसबंदीवर महापालिकेचा ५२९ रुपये खर्च होत आहे. या संस्थेने जुलै महिन्यात २५८ तर आॅगस्ट महिन्यात ५३५ कुत्र्यांवर नसबंदीची शस्त्रक्रिया केली. असे असताना गल्ली-बोळात आजही कुत्र्यांची पिलावळ दिसून येत आहे.
‘रॅबिज’मुळे वर्षाला २५ हजार मृत्यू
By admin | Updated: September 30, 2014 00:39 IST