लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे दोन खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकून २ लाख २४ हजार ८० रुपयांचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला.अधिकाऱ्यांनी प्रभू ट्रेडिंग कंपनी, प्लॉट नं. १५६, पाटीदार भवनजवळ, क्वेटा क्वॉलनी येथे धाड टाकली असता विक्रेते अमित वासुदेव बत्रा हे रिफाईन्ड सोयाबीन तेल या खाद्यतेलाची अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत नियमांचे उल्लंघन करून तेलाचे पॅकिंग न करता खुल्या स्वरुपात विक्री करीत असल्याचे आढळून आले. तसेच यशवंत पवनकुमार जैन हे प्लॉट नं. ६९, सतनामीनगर, एनआयटी गार्डनजवळ, लकडगंज या ठिकाणी वाहन क्र. एमएच-३१ डब्ल्यू-६९१२ या वाहनातून खाद्यतेलाचे पॅकिंग न करता खुल्या स्वरुपात विक्री करीत होते. भेसळीच्या संशयावरून दोन्ही व्यापाऱ्यांकडून १,६९,१४९ रुपये किमतीचे १७९८ लिटर रिफाईन्ड सोयाबीन तेल (लूज) व उपरोक्त वाहनातून ५५,६५१ रुपये किमतीचे ५९८ लिटर रिफाईन्ड सोयाबीन तेल असा एकूण २,२४,८०० रुपये किमतीचा साठा जप्त केला. या साठ्यातून प्रत्येकी एक-एक नमुना विश्लेषणासाठी घेऊन प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आलेला आहे. सदर नमुन्यांचा विश्लेषण अहवाल प्राप्त झाल्यानंतर अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त (अन्न) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहायक आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांच्या नेतृत्वात कार्यालयातील सुरक्षा अधिकारी विनोद धवड, प्रफुल्ल टोपले व अनंतकुमार चौधरी यांनी केली. पुढील काळात सणासुदीच्या दिवसात खाद्य पदार्थांमध्ये भेसळीची शक्यता जास्त असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. ग्राहकांना अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रार असल्याने विभागाकडे तक्रार करावी, असे पवार यांनी म्हटले आहे.
नागपुरात २.२४ लाखाचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 20:28 IST
अन्न व औषध प्रशासन विभागाने प्राप्त माहितीच्या आधारे दोन खाद्यतेल विक्रेत्यावर धाड टाकून २ लाख २४ हजार ८० रुपयांचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त केला.
नागपुरात २.२४ लाखाचा खुल्या खाद्यतेलाचा साठा जप्त
ठळक मुद्देअन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई : तेलामध्ये भेसळ