माैदा : अज्ञात आराेपीने माेबाईल टाॅवरच्या बॅटरी रॅकमधील ५० हजार रुपये किमतीच्या २१ बॅटऱ्या चाेरून नेल्या. ही घटना माैदा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवाजी चाैक, वडाेदा (ता. कामठी) येथे रविवारी (दि.४) सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.
राजेश शंकरराव मारबते (३३, रा. महाजनपुरा, पारडी, नागपूर) यांना रविवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास एटीसी टेलिकाॅम टाॅवरचे अभियंता मिलिंद रामटेके यांनी वडाेदा येथील टाॅवर बंद पडले आहे, अशी फाेनवरून सूचना दिली. मारबते यांनी लगेच वडाेदा येथे जाऊन पाहणी केली असता, माेबाईल टाॅवरच्या बॅटरी रॅकमधील ५० हजार रुपये किमतीच्या २१ बॅटऱ्या चाेरून नेल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी माैदा पाेलिसांनी भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा नाेंदविला असून, तपास पाेलीस हवालदार रवींद्र बकाल करीत आहेत.