नागपूर विद्यापीठ : प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना मिळणार दिलासानागपूर : बारावी उत्तीर्ण झालेला कुठलाही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांना अतिरिक्त जागांचा बोनस देण्यात यावा, अशी सूचना राज्य शासनाने दिली होती. त्यानुसार प्रवेश क्षमता अधिकाराअंतर्गत नागपूर विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता २० टक्क्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १५ आॅगस्टपर्यंत महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीत असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.यंदा बारावीचा निकाल मोठ्या प्रमाणावर लागला आहे. त्यामुळे नामांकित महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमात चांगले गुण असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही. बारावीचा निकाल लागून महिना उलटला असला तरी अनेक विद्यार्थ्यांचे अद्याप प्रवेश झालेले नाहीत. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने महाविद्यालयांना जागा वाढ देण्यासंदर्भात विद्यापीठाला पत्र लिहिले होते. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम ८३ (३)(सी) नुसार विद्यापीठाला प्रवेशक्षमता मंजुरीच्या असलेल्या अधिकारांतर्गत मंजूर प्रवेश क्षमतेच्या २० टक्के जास्तीच्या प्रवेशाचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला होता. महाविद्यालयांमध्ये अभ्यासक्रमात मंजूर प्रवेश क्षमतेनुसार, प्रथम वर्षाचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतरही विद्यार्थी प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत असल्यास २० टक्के जास्तीचे प्रथम वर्षासाठी प्रवेश मंजूर करण्याकरिता विद्यापीठाकडे तसा प्रस्ताव सादर करावा अशा सूचना महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. ही अतिरिक्त प्रवेश क्षमता केवळ २०१५-१६ या वर्षासाठीच असल्याने वाढीव क्षमतेपोटी कुठल्याही महाविद्यालयाला अतिरिक्त तुकडी मंजूर केली जाणार नाही असेदेखील विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.(प्रतिनिधी)
महाविद्यालयांत २० टक्के जागा वाढणार
By admin | Updated: August 3, 2015 03:00 IST