नगराध्यक्षासह २० नगरसेवक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:14 AM2020-12-05T04:14:10+5:302020-12-05T04:14:10+5:30

काटाेल : शहरातील गुंठेवारी प्रकरणात नगराध्यक्ष, पालिका उपाध्यक्ष व गटनेता तसेच खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानावर घरकुलांचे नियमबाह्य व निकृष्ट ...

20 councilors including the mayor are ineligible | नगराध्यक्षासह २० नगरसेवक अपात्र

नगराध्यक्षासह २० नगरसेवक अपात्र

Next

काटाेल : शहरातील गुंठेवारी प्रकरणात नगराध्यक्ष, पालिका उपाध्यक्ष व गटनेता तसेच खेळासाठी आरक्षित असलेल्या मैदानावर घरकुलांचे नियमबाह्य व निकृष्ट बांधकाम, त्या बांधकामाच्या निविदा न काढता मर्जीतील लाेकांना कामे दिल्याप्रकरणी या तिघांसह अन्य तीन नगरसेवकांना तसेच पंचवटी येथील म्हाडा काॅलनीतील खुल्या जागेवरील बाजार ओटे ताेडल्याप्रकरणी इतर १४ नगरसेवकांना नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अपात्र ठरविले आहे. तिन्ही आदेश शुक्रवारी (दि. ४) प्राप्त हाेताच काटाेल नगर परिषदेच्या राजकीय वर्तुळात भूकंप आला.

अपात्र ठरविण्यात आलेल्यांमध्ये नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, गटनेता चरणसिंग ठाकूर यांच्यासह सुभाष काेठे, माया शेरकर, मीरा उमप, श्वेता डाेंगरे, किशाेर गाढवे, शालिनी बन्साेड, राजू चरडे, लता कडू, संगीता हरजाल, सुकुमार घाेडे, वनिता रेवतकर, देवीदास कठाणे, शालिनी महाजन, प्रसन्न श्रीपतवार, जयश्री भुरसे, मनाेज पेंदाम या निर्वाचित नगरसेवकांसह हेमराज रेवतकर व तानाजी थाेटे या नामनिर्देशित नगरसेवकांचा समावेश आहे.

शहरातील गुंठेवारीबाबत राधेश्याम बासेवार तर खेळाचे आरक्षित मैदान व शासकीय जाागेवर नियमबाह्य बांधकाम, घरकुलांचे निकृष्ट बांधकामाबाबत राजेश राठी व राधेश्याम बासेवार आणि पंचवटीतील ओटे ताेडल्याप्रकरणी नगरसेवक संदीप वंजारी यांनी नगरविकास मंत्रालयाकडे तक्रारी केल्या हाेत्या.

या प्रकरणांची चाैकशी करण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक विशाल तडस यांची नियुक्ती करण्यात आली हाेती. त्यांनी चाैकशी अहवाल शासनाला सादर करताच या तिन्ही प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. तक्रारींमध्ये करण्यात आलेल्या आराेपांमध्ये सत्यता असल्याचे निदर्शनास आल्याने या गैरव्यवहाराला नगराध्यक्ष वैशाली ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर, गटनेता चरणसिंग ठाकूर यांच्यासह अन्य १४ नगरसेवकांना जबाबदार धरण्यात आले. त्याअनुषंगाने नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ११ नाेव्हेंबर राेजी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे या तिन्ही प्रकरणांचा निवाडा देत नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांना नगराध्यक्षपदापासून दूर केले. पालिकेचे गटनेते चरणसिंग ठाकूर, उपाध्यक्ष जितेंद्र तुपकर यांच्यासह इतर नगरसेवकांना पाच वर्षासाठी अपात्र ठरविण्यात आले. शिवाय, नगराध्यक्षांना या निर्णयाबाबत उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे.

---

चरणसिंग ठाकूर यांना धक्का

काटाेल पालिकेची एकूण सदस्यसंख्या २३ आहे. यात चरणसिंग ठाकूर यांच्या विदर्भ माझाचे १८, शेतकरी कामगार पक्षाचे चार तर भारतीय जनता पक्षाचा एक नगरसेवक आहे. नगराध्यक्ष वैशाली ठाकूर यांची मतदारांमधून निवड झाली हाेती. या कारवाईमध्ये विदर्भ माझाच्या नगराध्यक्षासह १८ निर्वाचित व दाेन नामनिर्देशित नगरसेवकांना अपात्र ठरविले आहे. मीरा उपत यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा दिला असून, श्वेता डाेंगरे यांचे निधन झाले आहे. या कारवाईमुळे चरणसिंग ठाकूर यांच्या गटाला जबर धक्का बसला आहे.

---

आपण गेल्या ४० वर्षांपासून काटाेल शहरातील जनतेची सेवा करीत आहे. हे कार्य यापुढेही सुरू राहील.

- चरणसिंग ठाकूर.

Web Title: 20 councilors including the mayor are ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.