नागपूर : मिहानमधील २२५ एकरात पतंजलीने उभारलेला ‘पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क’ या आशियातील सर्वात मोठ्या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाद्वारे विदर्भातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि आत्महत्यांचे संत्र थांबेल. १५०० कोटींच्या गुंतवणुकीतून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष १० हजार जणांना रोजगार आणि शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास विश्वास पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत व्यक्त केला . बालकृष्ण म्हणाले, नागपूरची भूमी अध्यात्म आणि क्रांतीची आहे. संविधानाला ठोस स्वरूप देणारी आहे. या भूमीतून पतंजलीच्या नवीन कृषी क्रांतीद्वारे देशातील शेतकऱ्यांसाठी समृद्धीचे दरवाजे उघडतील.
दररोज ८०० टन संत्र्याचा उपयोग आणि अन्य उत्पादनांची निर्मितीप्रकल्पाची प्रक्रिया क्षमता दररोज ८०० टन संत्र्याची आहे. ‘अ’ ग्रेड व्यतिरिक्त, ‘ब’ आणि ‘क’ ग्रेड संत्री, अकाली परिपक्व झालेले उत्पादन आणि वादळामुळे गळून पडलेल्या संत्र्यांवरदेखील प्रक्रिया होईल. प्रकल्प शून्य कचरा प्रणालीवर काम करेल. आमचे काम संत्र्याच्या सालीपासून सुरू होते. सालीपासून सुगंधी तेल काढतो. यासाठी विदेशी तंत्रज्ञान आणि संपूर्ण प्रणालीवर संशोधन केले आहे. एवढा मोठा प्रकल्प केवळ रसाच्या आधारावर चालवता येत नाही. आम्ही त्याच्या बायो उत्पादनांवरही लक्ष केंद्रित केले आहे. प्रकल्प उभारणीसाठी आम्हाला वेळ लागला आणि मेहनत घ्यावी लागली. मिहानमधील फूड पार्क शून्य कचरा प्रणाली अंतर्गत उप-उत्पादनांवर देखील काम करेल.
प्रगत प्रणालीवर आधारित प्रकल्प
बालकृष्ण म्हणाले, प्रकल्पात आधुनिक मानकांवर आधारित संपूर्ण प्रगत प्रणाली आहे. यामध्ये पॅकेजिंग लाइन, टेक्नोपॅक आणि प्रगत संशोधन प्रयोगशाळा आहेत. उत्पादनांची गुणवत्ता उच्च दर्जाची राहील. संपूर्ण जागतिक बाजारपेठ आमच्यासाठी खुली आहे. परंतु आमचे प्राधान्य देशातील लोकांना उत्कृष्ट निर्यात दर्जाची उत्पादने प्रदान करण्याचे आहे. कच्च्या मालाच्या उपलब्धतेनुसार, संत्रा, लिंबू, आवळा, डाळिंब, पेरू, द्राक्षे, भोपळा, गाजराचा रस, आंबा आणि संत्र्याचा गर आणि कांदा आणि टोमॅटोची पेस्टदेखील येथे बनवली जाईल. तसे पाहता संत्र्याच्या उपलब्धता वर्षाला ९० ते १०० दिवस राहतील. त्यामुळे अन्य २५० दिवसात अन्य फळांवर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
वैदर्भीय शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार
विदर्भाचे नाव घेताच येथील शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि दु:खी शेतकऱ्यांचे चित्र आपोआपच समोर येते. हे चित्र बदलण्याचे काम मिहानच्या या संत्रा प्रक्रिया प्रकल्पाद्वारे केले जाईल. या संपूर्ण प्रदेशाची, शेतकऱ्यांची आणि कृषी व्यवस्थेची भयानक स्थिती बदल्याचा समूहाचा संकल्प आहे.
संत्री व अन्य फळे गोळा करण्यासाठी गावोगावी फिरेल ट्रक
या भागातील प्रत्येक शेतकरी आमच्या संपर्कात आहे. स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि शेतकऱ्यांना समृद्ध करण्याला प्राधान्य आहे. कौशल्य कामगारांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम चालविण्यात येणार आहे. संत्री आणि अन्य फळे गोळा करण्यासाठी पतंजली समूहाने पोर्टल सुरू केले आहे. त्यावर शेतकऱ्यांना माहिती टाकायची आहे. तो माल शेतकऱ्यांचा घरूनच खरेदी करू. शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव देऊ.
‘पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क’चे १० रोजी उद्घाटन
मिहानमधील २३५ एकरातील ‘पतंजली मेगा फूड अँड हर्बल पार्क’चे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या प्रसंगी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पतंजली आयुर्वेद समूहाचे सर्वेसर्वा बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहतील.