भिवापूर : तालुक्यात होऊ घातलेल्या तीन ग्राम पंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी केवळ १३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. पुल्लर या महत्वाच्या ग्रामपंचायतीतून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. दरम्यान तालुक्यात निवडणूक होणाऱ्या पुल्लर, मोखाबर्डी, आलेसूर या तीन ग्रामपंचायतीतून सोमवारपर्यंत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नव्हता. मात्र अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असताना मंगळवारी आलेसूर ग्रा.पं. करीता ८ तर मोखाबर्डी ग्रा.पं. करीता ५ अर्ज दाखल झाले. उद्या (दि.३०) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे तहसील कार्यालयात दुपारपर्यंत स्टॅम्पचा तुटवडा होता. त्यामुळे काही महिला उमेदवारांसह शैक्षणिक व इतर कामासाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत राहावे लागले. दरम्यान दुपारी ३ वाजता नंतर स्टँम्प उपलब्ध झाले.
----
निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र राठोड यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करताना आलेसूर ग्रामपंचायतीचे उमेदवार.