नरेश डोंगरे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : यावर्षीच्या पहिल्याच महिन्यात अर्थात जानेवारी २०२५ मध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी रेल्वेचे तब्बल ११ अपघात टळले. ऑन रूट सतर्कतेने कर्तव्य बजावणाऱ्या ठिकठिकाणच्या कर्मचाऱ्यांमुळे रेल्वेचे हे संभाव्य अपघात टाळण्यास मदत मिळाली. टळलेल्या या अपघातात नागपूर नजीकच्या बोरखेडीजवळच्याही एका प्रकाराचा समावेश आहे.
देशात अलिकडे रेल्वे अपघात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अपघात टाळण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून रेल्वे अधिकारी कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहे. छोट्याशा चुकीमुळे किंवा दुर्लक्षितपणामुळे रेल्वे अपघात होतो. त्यामुळे प्रत्येकाने रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करण्याच्या सूचना वजा आदेश देण्यात आले आहे. सतर्कपणे काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना महाराष्ट्रात वेळोवेळी विशेष पुरस्कार देऊन सन्मानितही केले जाते. आज अशाच कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
सतर्क कर्मचाऱ्यांचा सत्कार
महाराष्ट्रात मध्य रेल्वेचे मुंबई पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ असे चार विभाग (डिव्हीजन) आहेत. जानेवारी महिन्यात मुंबई विभागात रेल्वेचे तीन संभाव्य अपघात टळले. पुणे विभागात चार, सोलापूर २ आणि नागपूर तसेच भुसावळ विभागात प्रत्येकी १ रेल्वेचा अपघात टळला. हे अपघात टाळणाऱ्या ११ ही सतर्क रेल्वे कर्मचाऱ्यांना ११ फेब्रुवारीला मुंबई रेल्वे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना यांच्या हस्ते 'महाव्यवस्थापक सुरक्षा' हा मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
... तर मालगाडी घसरली असती१९ जानेवारीला नागपूर नजिकच्या बोरखेडी रेल्वे स्थानकावर अविनाश कुमार नामक पॉईंटसमन कर्तव्यावर होते. एक मालगाडी धावत असताना त्यांना गाडीच्या चवथ्या क्रमांकाच्या वॅगनच्या फ्रंट ट्रॉलीचा व्हील प्लॉज पुर्णत: वर आल्याचे दिसले. तशा अवस्थेत आणखी काही वेळ मालगाडी धावली असती तर ती रुळावरून घसरून मोठा अपघात झाला असता. ते ध्यानात येताच अविनाश कुमार यांनी लगेच ट्रेन मॅनेजर आणि स्टेशन मास्टरला माहिती दिली. त्यामुळे मालगाडी तात्काळ थांबवून दुरूस्ती करण्यात आली. अविनाश कुमार यांच्या सतर्कतेमुळे हा संभाव्य अपघात टळल्याने त्यांना महाव्यवस्थापक मिना यांच्या हस्ते आज मंगळवारी मुंबईत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.