शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

अंधारातील स्त्रिया..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2021 06:00 IST

निदिध्यासी, संगीताला सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि गुरूला परमेश्वर मानणाऱ्या अनेक त्यागी स्त्रियाआजपर्यंत होऊन गेल्या, पण या स्त्रिया संगीताच्या इतिहासात कधीच कोणाच्या अभ्यासाच्या विषय झाल्या नाहीत.

ठळक मुद्देहिराबाई बडोदेकर स्त्री कलाकारांचा मैफलीचा मार्ग प्रशस्त करीत असताना त्यांचे ‘शालीन वागणे आणि वावरणे’ एवढेच नोंदवणे इतिहासकारांना महत्त्वाचे वाटले..! कधी होणार आम्हाला या स्त्रियांचे कृतज्ञ स्मरण?

- वंदना अत्रे

कौशिकी चक्रवर्ती यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या ‘सखी’चा नृत्यातून अभिनित होत असलेल्या बंदिशीचा दिमाखदार कार्यक्रम समोर सुरू होता. एखाद्या राजदरबारात बसल्याचा भास व्हावा, अशी रंगमंच सजावट. तजेलदार रंगाचे लोड आणि बिछायत, जागोजागी उजळलेले उंच पितळी दिवे, सुगंधी फुले. रंगमंचावर कौशिकीसह सगळ्या तरुण कलाकार. फक्त स्त्री कलाकारांना घेऊन असा चाकोरीबाहेरचा, शास्त्रीय बैठक असलेला कार्यक्रम करण्याची कल्पना सुचली कशी? कौशिकीने या प्रश्नाचे दिलेले उत्तर ऐकताना मला आठवण येत होती, ती गानतपस्विनी मोगुबाई कुर्डूकर यांनी लिहिलेल्या एका घटनेची. कोणत्याही संवेदनशील रसिकाने व्यथित व्हावे अशी ही आठवण. त्यांनी लिहिले आहे, ‘एका कार्यक्रमासाठी कुर्पा नावाच्या गोव्यातील छोट्याशा गावातून आमंत्रण आले. मानधन फक्त पन्नास रुपये, पण कार्यक्रम गोव्यातल्या गोव्यात होता, प्रवासाचा खर्च नव्हता, म्हणून हो म्हटले. साथीदारांना घेऊन गावात पोचले तर कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळी सामसूम. ज्यांनी आमंत्रण दिले त्यांच्याकडे जाऊन अंगणात त्यांची वाट बघत उभी राहिले. कुणीतरी यजमानांना जाऊन सांगितले, “मोगू आलीय..” मोगू? हा एकेरी उल्लेख अगदी जिव्हारी लागला. पण गप्प राहिले. ओसरीवर येत यजमानांनी विचारले, “चहा घेणार की कॉफी?” म्हटले “तुम्ही द्याल ते” पाच मिनिटांनी एका नारळाच्या करवंटीमधून कोमट चहा समोर आला! संतापाने कानशिले गरम व्हावी असेच ते ‘स्वागत’ होते! मी त्या करवंटीला शांतपणे नमस्कार करीत चहा परत पाठवून दिला आणि अंगणाच्या बाहेर जाऊन उभी राहिले.’ देवदासीपणाच्या शापातून बाहेर येत संगीताची उपासना करीत सन्मानाचे जीवन जगू बघणाऱ्या या स्त्रियांना अंगणात उभे करून करवंटीमधून चहा देणारा, मोगू, केशर, तारा असे त्यांना एकेरी नावाने संबोधणारा समाज. त्याबद्दलचा सात्विक संताप आणि दुःख या मुलाखतीत फुटताना दिसते. आपल्या उत्तरात कौशिकी मला सांगत होती, मोगलांच्या आक्रमणाच्या पायाखाली कदाचित जे अभिजात संगीत चिरडून गेले असते, मातीला मिळाले असते ते सांभाळून ठेवणाऱ्या अनेक अनाम स्त्रियांबद्दलचे कृतज्ञ स्मरण? करावे या कल्पनेतून जन्म झाला ‘सखी’चा! अठराव्या-एकोणीसाव्या शतकात झालेल्या सामाजिक उलथापालथीत गाणे सांभाळून ठेवणाऱ्या या स्त्रियांना इतिहासाने डावलल्याची वेदना ‘सखी’मध्ये थेट शब्दांमध्ये फारशी मुखर होत नाही, पण त्याची जाणीव एकविसाव्या शतकातील एका कलाकार स्त्रीला व्हावी हे केवढे दिलासा देणारे..! अन्यथा या स्त्रियांच्या वाट्याला आली ती फक्त उपेक्षा.! एखाद्या व्रताप्रमाणे संगीताची कठोर साधना करणाऱ्या आणि अनेकदा उस्तादांना आपल्या तयारीने आव्हान देणाऱ्या या स्त्रिया. इतिहासाच्या पानांमध्ये मात्र त्यांच्या नावाच्या नोंदी मोठ्या मुश्किलीने आढळतात. शास्त्रीय संगीत शिकणारी पहिली गोमंतक कलाकार सरस्वतीबाई बांदोडेकर केवळ शिक्षण घेऊन थांबल्या नाहीत. गिरिजाबाई केळेकर, केशरबाई बांदोडेकर, ज्योत्स्ना भोळे अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. हे इतिहासाला कधी दिसले कसे नाही? गाण्यासाठी संसाराचा त्याग करून ब्रह्मचारिणी राहण्याचे व्रत मान्य असलेल्या बाबलीबाई साळगावकर रोज अठरा तास रियाझ करीत, एवढी जुजबी माहिती इतिहासात आढळते.

यामध्ये पुढे लिहिले आहे, बडोदा रियासतीत गाण्याचे आमंत्रण मिळाले तेव्हा त्या रात्रभर गात होत्या.! संगीताबरोबर संस्कृत,उर्दू, हिंदी यावर त्यांचे प्रभुत्व होते. नोनाबाई, शामाबाई आणि उमाबाई या काकोडकर भगिनींचा आवाज इतका सारखा की एकीचा दमसास सुटला की दुसरी तो स्वर पकडत असे आणि श्रोत्यांना समजतसुद्धा नसे! टप्पा, ठुमरी, गझल याचा डोळस अभ्यास करणाऱ्या, मुंबईमध्ये होणाऱ्या संगीत जलशांमध्ये हजेरी लावणाऱ्या या स्त्रियांबद्दल केलेली एक त्रोटक नोंद फारच बोलकी आहे. ती लिहिणारे विलायत हुसेन आग्रेवाले म्हणतात, निदिध्यासी, संगीताला सर्वस्व अर्पण करणाऱ्या आणि गुरूला परमेश्वर मानणाऱ्या गोमंतकीय स्त्रियांसारख्या त्यागी स्त्रिया अन्यत्र आढळल्या नाहीत. या स्त्रिया संगीताच्या इतिहासात कधीच कोणाच्या अभ्यासाच्या विषय झाल्या नाहीत. आणि हिराबाई बडोदेकर स्त्री कलाकारांचा मैफलीचा मार्ग प्रशस्त करीत असताना त्यांचे ‘शालीन वागणे आणि वावरणे’ एवढेच नोंदवणे इतिहासकारांना महत्त्वाचे वाटले..! कधी होणार आम्हाला या स्त्रियांचे कृतज्ञ स्मरण?

vratre@gmail.com

(लेखिका संगीत आस्वादक आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत.)