शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
'पोलिसांनी त्याची हत्या केली...'! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
3
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
4
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
5
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
6
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
7
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
8
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
9
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
10
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
11
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
12
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
13
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
14
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
15
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
16
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
20
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन

भिलवाडा मॉडेल... कोरोनाला रोखून देशाला दखल घ्यायला लावणारा जिल्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2020 6:00 AM

कोरोनाचा पहिला रुग्ण सापडताच अख्ख्या देशाच्या तब्बल आठवडाभर आधीच संपूर्ण भिलवाडा जिल्हा लॉकडाउन! तातडीनं प्रशिक्षित सहायकांच्या तब्बल 3072 टीम उभारल्या. तीन टप्प्यांत भिलवाडा शहरातील 2,14,647 घरांमधल्या 10,71,315 लोकांचं स्क्रीनिंग पूर्ण! अख्ख्या जिल्ह्याच्या सीमा ताबडतोब सील. 1937 प्रशिक्षित टीम्सद्वारे जिल्ह्यातल्या सुमारे 4,50,000 घरांतल्या 22,39,134 लोकांचं सर्वेक्षण पूर्ण! हेही केवळ आठवडाभरातच! लोकांना घरात कोंडलं; पण त्यांच्यापर्यंत अन्नपाणी पोहोचेल याची चोख व्यवस्था उभारली! कोरोनाच्या फैलावाला आळा घातल्यावर पोलिसांनी गावातून फ्लॅग मार्च केला,  तर लोकांनी त्यांच्यावर फुलं उधळली!

ठळक मुद्देअत्यंत धडाडीच्या आणि कमालीच्या नियोजनबद्ध कामातून ‘भिलवाडा मॉडेल’ आकाराला आणणारे भिलवाड्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट राजस्थानचे अतिरिक्त मुख्य सचिव रोहितकुमार सिंग यांच्याशी विशेष बातचित!

- समीर मराठे‘बारूद के ढेर पर बैठे हो आप सब लोग. अगर जल्दी समझ जाओ, तो सब बच जाएंगे. नहीं तो आपको कोई नहीं बचा पायेगा. ना मैं, ना डॉक्टर्स, ना सायंटिस्ट. किसी के हाथ में कुछ नहीं रहेगा. ना मैं बच पाऊंगा, ना आप. कृपया कर के कोई भी अपने घर से बाहर ना निकले. मैं लोगों से हाथ जोडकर बिनती करता था. ’राजस्थानच्या भिलवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट सांगत होते, याच शब्दांत सुरुवातीला माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना मी कळकळीनं समजावत होतो. कारण देशात ज्या मोजक्या ठिकाणी कोरोनाच्या फैलावाला सुरुवात झाली, त्यात भिलवाडाचा समावेश होता!’परिस्थिती होतीच तशी. अतिशय बिकट. भारतात कोरोनाच्या फैलावाची लक्षणं फारशी दिसत नव्हती, अशा काळात राजस्थानच्या या छोट्याशा जिल्ह्यात फटाफट कोरोनाचे पेशंट उगवायला लागले आणि भिलवाडा जिल्हा प्रशासनच नव्हे, तर संपूर्ण राजस्थान आणि देशही हादरला.  केवळ काही दिवसांतच या जिल्ह्यात कोरोनाबाधित तब्बल 27 रुग्ण सापडले. त्यामुळे अख्ख्या देशात पहिल्यांदाच धोक्याची घंटा वाजली. प्रशासन खडबडून जागं झालं. संपूर्ण देशभर भिलवाडाची ‘बदनामी’ झाली. अगदी आत्ता आत्तापर्यंत तर माध्यमांतूनही बातम्या झळकत होत्या, ‘तुमच्या शहराला, जिल्ह्याला भिलवाडा बनवायचं नसेल, तर आधीच काळजी घ्या.’ म्हटलं तर देशभर भिलवाडाची बदनामीच होती ही;  पण राजस्थान आणि भिलवाडा प्रशासनानं अतिशय कठोर पावलं उचलली, कोरोनाला रोखण्यासाठी शक्य ते सारे उपाय अगदी लष्करी शिस्तीनं तरीही ‘प्रेमानं’ राबवले. काही दिवसांपूर्वी जो जिल्हा कोरोनाचं क्लस्टर मानलं जात होता, तोच जिल्हा आज कोरोनाला रोखण्यासाठीचं ‘भिलवाडा मॉडेल’ म्हणून देशात प्रसिद्ध झालाय. हे मॉडेल आता कदाचित संपूर्ण देशभर राबवलं जाईल.भिलवाड्यानं कसं रोखलं कोरोनाला? त्यासाठी काय उपाययोजना केल्या? नेमकं काय आहे हे भिलवाडा मॉडेल/पॅटर्न?. हे जाणून घेण्यासाठी राजस्थानचे अतिरिक्त आरोग्य सचिव रोहितकुमार सिंग आणि भिलवाड्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र भट्ट यांच्याशी ‘लोकमत’ने दूरध्वनीवरून प्रदीर्घ संवाद केला. तोही टप्प्याटप्प्यात; कारण दोघांनाही श्वास घ्यायला वेळ नाही अशी स्थिती आहे!रोहितकुमार सिंग आणि कलेक्टर राजेंद्र भट्ट सांगत होते, ‘संपूर्ण देशात जाऊ द्या, अगदी जगातही आमची केस अतिशय वेगळी होती. कारण आमच्याकडे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला तोच मुळी एका खासगी हॉस्पिटलचा डॉक्टर होता. डॉक्टरच कोरोनाचा रुग्ण आहे म्हटल्यावर ‘कम्युनिटी स्प्रेड’च्या धोक्याची घंटा वाजली!’भिलवाडाच्या ज्या ब्रिजेश बांगर मेमोरिअल हॉस्पिटलच्या (बीबीएमएच) डॉक्टरची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली, ते हॉस्पिटलच केंद्रबिंदू मानून प्रशासनानं तयारीला सुरुवात केली. पहिल्यांदा तिथलेच इतर डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचार्‍यांची तपासणी केली. त्यात याच हॉस्पिटलचे आणखी तीन डॉक्टर आणि एकूण 17 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले! मग प्रशासनानं युद्धपातळीवर काम सुरू केलं.आधी ते हॉस्पिटल सील केलं. तिथलं सगळं रेकॉर्ड, अगदी कागद अन् कागद, प्रत्येक नोंदी चेक केल्या. प्रत्येक पेशंटचा छडा लावला. आधीच्या दोन आठवड्यांत त्या हॉस्पिटलमधून जवळपास आठ हजार रुग्णांनी उपचार घेतले होते. पॉझिटिव्ह सापडलेल्या या डॉक्टरांनी आपल्या घरी, त्यांच्या खासगी ओपीडीमध्ये आणखी किती रुग्ण तपासले, याचा तर काहीच थांगपत्ता नव्हता. प्रशासनासमोरच्या अडचणी एकदम वाढल्या. या लोकांनी आणखी किती जणांना कोरोनाचा संसर्ग पोहोचवला असेल? प्रशासनानं तातडीची आपत्कालीन स्ट्रॅटेजी ठरवली आणि कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर अवघ्या दोन तासातच सारी यंत्रणा कामाला लागली! कोरोनाची लागण किती झपाट्यानं पसरते, हे सांगताना जिल्हाधिकारी भट्ट कोरोनाच्या फैलावाचा गणिती वेगही समजावून सांगत होते. एकाला लागण झाल्यानं एवढं काय आकाश कोसळेल, असं अनेकांना वाटू शकतं; पण कोरोनाच्या संसर्गाची साखळी अतिशय भयानक वेगानं पसरते. संसर्ग होण्याची शक्यता अगदी एक किंवा दोन टक्के मानली तरी, एक रुग्ण महिनाभरात चारशेपेक्षाही जास्त लोकांना कोरोनाचा संसर्ग देऊ शकतो! या वेगानं नुसत्या भिलवाड्यात महिनाभरातच चाळीस ते पन्नास हजार लोक कोरोनाबाधित होऊ शकले असते.19 मार्चला पहिला रुग्ण सापडताच आणि त्यानंतर लगेचंच वीस मार्चपासून भिलवाड्यात लॉकडाउन सुरू झालं. म्हणजे अख्ख्या देशाच्या तब्बल सहा दिवस आधीच भिलवाडा जिल्हा लॉकडाउन झाला होता!जिल्हाधिकारी  भट्ट सांगत होते,  ‘आम्ही ज्या काही उपाययोजना केल्या, त्याकडे आम्ही ‘मॉडेल’ म्हणून  पाहात नाही. ठरवलेली आपत्कालीन स्ट्रॅटेजी अतिशय कठोरपणे अंमलात आणली, ती यशस्वी झाल्यानं ही ‘स्ट्रॅटेजी’च आता ‘मॉडेल’ म्हणून पुढे आली आहे.’रुग्णसंख्या वाढत असताना केवळ जिल्हा लॉकडाउन करून, लोकांना घरात बसवून उपयोग नव्हता. भट्ट सांगतात, ‘आम्ही ज्या ज्या मागण्या राज्य सरकारपुढे मांडल्या, त्या त्या सार्‍या मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पूर्ण केल्या. कोरोनाची साखळी आम्हाला आमच्या जिल्ह्यातच तोडायची होती. ती आम्ही अतिशय कठोरपणे तोडली.’ (पाहा चौकट : काय आहे भिलवाडा मॉडेल?)प्राथमिक उपाय झाल्यावर पुढचं आव्हान होतं, केवळ भिलवाडा शहरच नव्हे तर जिल्ह्यातले कोरोनाबाधित रुग्ण हुडकून काढण्याचं. प्रशासनानं केवळ आठवड्याभरातच जिल्ह्यातलं एकूण एक घर पिंजून काढलं! तब्बल 33 लाखांपेक्षा जास्त लोकांचं सर्वेक्षण केलं. (पाहा चौकट : कसा केला सव्र्हे?)19 मार्च 2020 ला भिलवाड्यात पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर केवळ दहा दिवसांत; 30 मार्चपर्यंत कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 27 पर्यंत पोहोचली होती. त्यानंतर मात्र भिलवाड्यानं कोरोनाबाधितांची संख्या वाढू दिली नाही. संपूर्ण लॉकडाउनच्या कलावधीत प्रशासनानं एकाही व्यक्तीला घराबाहेर पडू दिलं नाही; पण त्यांच्या गरजांकडेही पुरेपूर लक्ष पुरवलं. अत्यावश्यक गोष्टींपासून कोणीही वंचित राहणार नाही, याची तजवीज केली. लोकांना कोणत्याही गोष्टीसाठी घराबाहेर पडावं लागणार नाही आणि त्यांच्या गरजेची प्रत्येक गोष्ट त्यांना घरपोहोच किंवा त्यांच्या दाराशी मिळेल अशी व्यवस्था केली. या काळात प्रत्येक नागरिकाला घरपोहोच किराणा मिळाला त्यासाठी त्या त्या परिसरातील किराणा दुकानदारांच्या टीमवरच रास्त भावात घरपोहोच किराणा पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनानं सोपवली.  उपभोक्ता होलसेल भांडार आणि बाजार समितीतून थेट लोकांच्या घरापर्यंत भाजीपाला यावा यासाठी जवळपास शंभर ट्रकची व्यवस्था केली. कुठल्याही परिस्थितीत रस्त्यावर कुठेही गर्दी होणार नाही, याची दक्षता घेतली गेली. सारस डेअरीच्या मार्फत प्रत्येकाच्या दाराशी दूध पोहोचेल याची व्यवस्था लावण्यात आली. जे गरीब आहेत, त्यांच्याही पोटापाण्याची सोय पाहताना, त्या प्रत्येकापर्यंत अन्नधान्याची आणि शिजवलेल्या अन्नाची पाकिटं रोज पोहोचवली गेली. जिल्ह्यातील प्रत्येक कारखाना, उद्योग, वीटभट्टय़ा बंद राहातील याची काळजी घेतली गेली. एवढंच नाही, या काळात जनावरांच्या वैरणीचीही व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली. कुठल्याही अडचणीवर तातडीनं मार्ग काढण्यासाठी जिल्ह्यात अनेक ठिकाणी 24 तास उघडी असणारी ‘कंट्रोल रूम्स’ तयार केली गेली. भिलवाडाचा हा प्रयोग प्रमाणाबाहेर यशस्वी झाला. काहीच दिवसांपूर्वी कोरोनाच्या कलंकानं बदनाम झालेल्या या जिल्ह्यानं आपल्या यशोगाथेचा टिळा आता अख्ख्या देशाच्या भाळी लावलाय. केव्हाही फुटू शकणार्‍या टाइम बॉम्बवर हा जिल्हा बसला होता, तोच जिल्हा आणि त्याचं हे मॉडेल आता कोरोनाचा बॉम्ब फुसका करण्यासाठी देशभरात वापरलं जाणार आहे..

कसा केला सव्र्हे/स्क्रीनिंग?1- काही वर्षांपूर्वी आलेल्या स्वाइन फ्लूच्या साथीला रोखण्यासाठी अनेक आरोग्य कर्मचार्‍यांनी घरोघर जाऊन तपासणी आणि उपचारही केले होते. या कामाचा पूर्वानुभव असलेल्या दोनशे जणांना एकत्र करून त्यांना कोरोनाच्या संदर्भात विशेष प्रशिक्षण देण्यात आलं. या टीमचं नाव ‘मास्टर ट्रेनर्स’.2 - या मास्टर ट्रेनर्सपैकी प्रत्येकानं आणखी बर्‍याच आरोग्य कर्मचारी व इतरांना प्रशिक्षण दिलं आणि जवळपास 2000 प्रशिक्षित लोकांची टीम तयार झाली.3- शिक्षण, महसूल विभागापासून ते अगदी पंचायतराज, कामगार विभाग, ग्रामविकास, समाज कल्याण अशा सर्व विभागातील कर्मचार्‍यांच्या सहभागातून छोटे गट तयार करण्यात आले. या प्रत्येक गटाला किमान एक मास्टर ट्रेनर देण्यात आला. अशा 3072 टीम तयार करण्यात आल्या.4-  19 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर लगेच 20 मार्चपासून भिलवाडा शहरात स्क्रीनिंग सुरू झालं.5- यासाठीचा फॉरमॅट ठरवून दिलेला होता. प्रत्येक टीमला टार्गेट दिलेलं होतं. कामाची पद्धत आखलेली होती, त्याची प्रत्येकाला माहिती होती.6- प्रत्येक घरात ही टीम गेली. प्रत्येक घराच्या दरवाजावर तशी नोंद करण्यात आली. कोणी, कोणत्या भागात जायचं, किती घरं तपासायची हे सारं ठरलेलं होतं. कोणालाही अतिकाम करावं लागणार नाही, पुरेशी विर्शांती मिळेल याची काळजी घेण्यात आलेली होती. अतिरिक्त पर्यायी टीमही सज्ज ठेवण्यात आली होती. दर दहा तुकड्यांसाठी एक प्रशिक्षित पर्यवेक्षक नेमण्यात आला होता. 7- प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं नाव, घरात कोणाला सर्दी-ताप-खोकल्याची लक्षणं आहेत, होती का, कधीपासून, कुठे उपचार घेतले याची नोंद घेतली गेली. 8- सर्वच लोकांच्या टेस्ट कराव्या लागू नयेत, यासाठी ज्यांच्यात सर्दी-ताप आणि खोकल्याची, फ्लूसारखी लक्षणं दिसताहेत, त्यांना वेगळं काढून त्यांना लगेच क्वॉरण्टाइन करून उपचार सुरू केले गेले. 9- ज्यांनी ‘कोरोनाबाधित’ रुग्णालयांत उपचार घेतले होते, त्यांना तातडीनं विलग करून त्यांच्यावर विशेष लक्ष पुरवण्यात आलं. 10- ज्यांच्यात ही लक्षणं आढळली, असे साधारण 15 हजार लोक होते. ज्यांची लक्षणं कोरोनाची नव्हती, त्यांना घरी सोडलं, तरी त्यांच्यावरही लक्ष ठेवलं गेलं. ज्यांच्या कोरोना चाचण्या घेतल्या, त्यातील 27 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. त्यांना तातडीनं क्वॉरण्टाइन करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. 11- भिलवाडा शहरामध्ये 3072 टिम्सद्वारे तीन टप्प्यांत दोन लाख 14 हजार 647 घरांतील दहा लाख 71 हजार 315 लोकांचं स्क्रीनिंग करण्यात आलं, तर जिल्ह्यात 1937 टिम्सद्वारे दोन टप्प्यांत साडेचार लाख घरांतील 22 लाख 39 हजार 134 जणांची पाहणी करण्यात आली. 12- कोरोना संशयितांच्या तपासणीसाठी, देखरेखीसाठी 24 तास सुरू असणारी ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली.13- ज्या ब्रिजेश बांगर मेमोरिअल हॉस्पिटलपासून कोरोनाची सुरुवात झाली, तिथल्या सर्वांची स्क्रीनिंग आणि टेस्टिंग करण्यात आली. त्यात सर्व डॉक्टर्स, नर्स, तिथले आरोग्य कर्मचारी, संपूर्ण स्टाफ, आयसीयू, आयपीडी, ओपीडीत दाखल रुग्ण, कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्ती यांची तपासणी करण्यात आली. अजूनही त्यांच्यावर बारकाईनं लक्ष आहे. ज्यांना घरी पाठवण्यात आलं आहे, जे संशयित आहेत किंवा ज्यांच्यात फ्लूची लक्षणं दिसली, त्या सार्‍यांना आजही दिवसातून दोनदा फोन करुन त्यांची माहिती घेतली जाते. 

काय आहे ‘भिलवाडा मॉडेल’?कोरोनाला रोखण्यासाठी भिलवाडा जिल्ह्यात अनेक टप्प्यांवर प्रय} करण्यात आले. त्या सर्वांची अतिशय कठोरतेनं अंमलबजावणी करण्यात आली. त्यातूनच आकाराला आलं ‘भिलवाडा मॉडेल’!1- कोरोनाचा पहिला संशयित सापडताच 24 तासाच्या आत भिलवाडा शहरात 144 कलमासह कफ्यूरू लावण्यात आला.2- पहिल्या टप्प्यांत जीवनावश्यक सेवांसाठी मुभा होती. दुसर्‍या टप्प्यात पूर्णपणे लॉकडाउन करण्यात आलं. 3- शहराच्या सीमा तातडीनं सील करण्यात आल्या. 4-  त्यानंतर जिल्ह्याची सीमा सील झाली. जिल्ह्याच्या प्रत्येक एण्ट्री आणि एक्झिट पॉइंटवर चेकपोस्ट्स बसवण्यात आले. 5- भिलवाड्याला लागून असलेल्या जिल्ह्यांच्याही सीमा  सील करण्यात आल्या. 6- जिल्ह्यातील रेल्वे आणि बससेवा तातडीनं बंद करण्यात आली.7- खासगी गाड्यांनाही रस्त्यावर मनाई करण्यात येऊन जिल्ह्यातील सर्व ‘मुव्हमेंट’ थांबवण्यात आली.8- जिल्ह्यातील कोरोनाचा केंद्रबिंदू ठरवून नंतर त्याचे झोन आणि बफर झोन ठरवण्यात आले. केंद्रबिंदूपासून एक किलोमीटरचा परीघ अतिशय कठोरतेनं संपूर्णपणे बंद करण्यात आला, तर बफर झोनमधील तीन ते पाच किलोमीटर अंतरावरही अतिशय कठोर निर्बंध लादले गेले. 9- कोविड पॉझिटिव्ह केसेसचं ‘क्लस्टर मॅपिंग’ करण्यात आलं.10- संपूर्ण परिसरात रोज जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली.11- अख्खा जिल्हा संपूर्ण देशापासून पूर्णत: आयसोलेट करण्यात आला. 12- शहरात आणि ग्रामीण भागात, प्रत्येक गावात, घरोघरी जाऊन लोकांची पाहणी/तपासणी करण्यात आली. 13- होम क्वॉरण्टाइन आणि क्वॉरण्टाइन सेंटर्स जागोजागी उभारण्यात आली. त्यासाठी खासगी हॉटेल्स, शैक्षणिक संस्था, होस्टेल्स, काही खासगी हॉस्पिटल्स अधिग्रहित करण्यात आली. 14- आपत्कालीन परिस्थितीला तयार राहण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचार्‍यांच्या टीम सज्ज ठेवून शेकडो खाटा असलेली क्वॉरण्टाइन सेंटर्सही आधीच  सुसज्ज ठेवण्यात आली. 15- ज्यांना ज्यांना ‘होम क्वॉरण्टाइन’ करण्यात आलं होतं, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी त्यांच्या घराबाहेर पोलीस तैनात करण्यात आले. 

कोरोना ‘कॅप्टन्स’ आणि ‘फायटर्स’1. कोरोनाच्या फैलावाला आळा घालण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात ‘कोरोना कॅप्टन्स’ आणि ‘कोरोना फायटर्स’ची नियुक्ती करण्यात आली. त्यासंदर्भातली जबाबदारी त्यांच्यावर वाटून देण्यात आली. 2. पंचायत समितीस्तरावर उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी, ब्लॉक चीफ मेडिकल ऑफिसर, ग्रामपंचायतस्तरावर तलाठी, ग्रामसचिव, नर्सेस, उच्च माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक यांना त्या त्या ठिकाणचे ‘कोरोना कॅप्टन’ करण्यात आले, तर गावस्तरावर सरपंच, पंचायत सहायक, शिक्षक, आशा यांची ‘कोरोना फायटर्स’ म्हणून नेमणूक करण्यात आली. 3. होम क्वॉरण्टाइन लोकांची नोंद ठेवणं, त्यांच्याकडे लक्ष देणं, गावातील वैद्यकीय उपकरणांची माहिती घेणं, व्यवस्था लावणं, लोकांना तयार अन्नाची पाकिटं देणं, अन्नधान्याची व्यवस्था पाहणं, स्थलांतरित कामगारांकडे लक्ष ठेवणं, गावातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणं. अशी अनेक कामं त्यांच्यावर सोपवण्यात आली. या ‘कोरोना कॅप्टन्स’ आणि ‘कोरोना फायटर्स’नी जिल्ह्यात खूप महत्त्वाची भूमिका बजावली. 

कशी उभारली क्वॉरण्टाइन सेंटर्स?कोरोनाच्या रुग्णांसाठी जगभरात हॉस्पिटल्स, क्वॉरण्टाइन सेंटर्सची कमतरता असताना भिलवाड्यानं कशी केली ही व्यवस्था हा कुतूहलाचा विषय आहे. 1- भिलवाडा प्रशासनाने आधी शहरातील 27 हॉटेल्समधील 1541 खोल्या अधिग्रहित करून त्यांचं रूपांतर ‘कोरोना सेंटर्स’मध्ये केलं. 2- या हॉटेल्समध्ये आजही सुमारे एक हजार व्यक्ती क्वॉरण्टाइन आहेत, तर घरी क्वॉरण्टाइन केलेल्या व्यक्तींची संख्या आहे, सुमारे आठ हजार. 3- 22 शासकीय संस्था, महाविद्यालये, होस्टेल्स अधिग्रहित करण्यात आली असून, तिथे 11,659 खाटांची व्यवस्था आजच्या घडीला तयार आहे. ती अजूनही वाढवता येऊ शकेल.4- भिलवाड्यातील एमजी जिल्हा रुग्णालयाचं रूपांतर ‘कोरोना हॉस्पिटल’मध्ये करण्यात आलं असून, तिथे सध्या दोनशे खाटांची व्यवस्था आहे. ती सुमारे 450 पर्यंंत वाढवता येईल. 5-  चार खासगी हॉस्पिटल्समध्येही प्रशासानानं व्यवस्था केलेली असून, त्या प्रत्येक ठिकाणी आयसोलेशन वॉर्डसह प्रत्येकी 25 खाटांची व्यवस्था आहे. 

‘लोकांचा फक्त विश्वास जिंका,ते जीव ओवाळून टाकतात!’ 

भिलवाडा येथील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखतानाच त्याची साखळी तोडणंही आम्हाला शक्य झालं, कारण आम्ही अतिशय कठोरपणे (रुथलेस कंटेनमेण्ट) प्रत्येक गोष्टीची अंमलबजावणी केली, मात्र त्याचवेळी लोकांनाही विश्वासात घेतलं. माझा तीस वर्षांचा आयएएस कारकिर्दीचा अनुभव सांगतो, लोक मुळातच खूप चांगले असतात. त्यांना तुम्ही विश्वास दिला, त्यांचा विश्वास जिंकला, ‘हे आपल्यासाठीच आहे’, हे त्यांना कळलं तर ते जीव ओवाळून टाकतात. जोर जबरदस्ती, दादागिरी केली, तर लोकही ऐकत नाहीत. सहकार्यानंच कोणतंही काम यशस्वी होतं. आम्ही कठोर होतो, तरी लोकांच्या अडचणीही समजून घेतल्या. परवाच भिलवाडा शहरातून पोलिसांनी फ्लॅग मार्च केला, तर लोकांनी आपापल्या घरांतून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. यापेक्षा अधिक काय पाहिजे?.

- रोहितकुमार सिंग (अतिरिक्त मुख्य सचिव, आरोग्य व कुटुंब कल्याण, राजस्थान)                          

 ‘भिलवाडा मॉडेल’ मुंबई-पुण्यात चालेल का?‘भिलवाडा मॉडेल’ जसंच्या तसं प्रत्येक ठिकाणी लागू करता येणार नाही. ते ‘कस्टमाइज’ करावं लागेल, आमचं भिलवाडा शहर साधारण पाच ते सात लाख लोकवस्तीचं आणि जिल्हा साधारण 25 लाख लोकवस्तीचा आहे. देशातील बहुसंख्य, जवळपास 80 टक्के जिल्हे याच लोकसंख्येचे आहेत. तिथे हा पॅटर्न आपापल्या गरजेप्रमाणे थोडासा बदल करून नक्कीच वापरता येईल.  महाराष्ट्रातील पुण्या-मुंबईसारख्या बलाढय़ शहरांसाठी वेगळा विचार करावा लागेल. तिथे कदाचित आमच्यापेक्षा जास्त सोई असू शकतील, एनजीओज असतील, त्यांचा उपयोग करून घेता येईल. धारावीसारख्या झोपडपट्टीसाठी आणखी वेगळा विचार करावा लागेल, या कामासाठी स्वत:हून पुढे येणार्‍यांना प्रोत्साहित करून, त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांचा वापर करून घेता येईल.’- राजेंद्र भट्ट (जिल्हाधिकारी, भिलवाडा)

sameer.marathesam@lokmat.com(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्तसंपादक आहेत.)

टॅग्स :Positive on Coronaसकारात्मक कोरोना बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याcorona virusकोरोना वायरस बातम्या