Who says that there is no pollution in the village? see this list! | कोण म्हणत गावात प्रदूषण नसतं? ही घ्या यादी!
कोण म्हणत गावात प्रदूषण नसतं? ही घ्या यादी!

- गौरी पटवर्धन 

परिसर अभ्यासाचा तास चालू होता. आजचा विषय होता प्रदूषण. खडवली नावाच्या छोट्याशा गावातल्या छोट्याशा शाळेतले सर मन लावून सहावीच्या मुलांना प्रदूषणाबद्दल शिकवत होते. प्रदूषण म्हणजे कारखान्यांमधून निघणारा काळा धूर, नदीच्या पाण्यात सोडलेलं सांडपाणी किंवा रासायनिक कारखान्यांमधून येणारं पाणी, सतत ऐकू येणारा मोठा आवाज किंवा कधीतरी डीजे लावून केलेला खूप मोठा आवाज, गाड्यांचे धूर, जहाजं भरून समुद्रात नेऊन टाकलेला कचरा, लोकांनी वापरून टाकून दिलेल्या मोबाइल फोनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू असं सगळं सरांनी शिकवलं.
मग विषय सुरू झाला तो या प्रदूषणामुळे आपल्याला काय काय त्रास होऊ शकतो याचा.

काही गोष्टी सर सांगत होते, तर काही मुलं सांगत होती. वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार होतात, जलप्रदूषणामुळे पोटाचे आणि त्वचेचे आजार होतात, ध्वनिप्रदूषणामुळे ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो किंवा उच्च रक्तदाबाचा आजार होऊ शकतो. हे सगळं सर शिकवत होते आणि मुलं शिकत होती.

सगळा धडा शिकवून झाल्यावर बंटी उभा राहिला आणि  म्हणाला,  ‘म्हणजे सर, आपल्याला असं वाटतं की, आपून लहान्या गावात राहतो. इकडे काहीच मजा नसतेय. सगळी मजा मुंबई-पुण्यालाच असतेय. पन ते वाटणं येकदम चूक निघालं की !’
‘म्हणजे?’ सरांना काही कळेना.
‘म्हंजे असं, की मोठय़ा शहरातल्या लोकांना हे सगळं प्रदूषण त्नास देणार आणि त्यांना हे सगळे आजार होनार. आणि आपल्याला हितं काय प्रदूषण नाहीये. त्यामुळे आपल्याला काय टेन्शन नाय.’
‘अं.. तू म्हणतोस ते तसं बरोबर आहे.’ सरांनी मान डोलवली. बंटी खूश होऊन खाली बसला. तर बायडी उभी राहिली आणि म्हणाली,
‘सर, पण मंग आपल्या हिते जर प्रदूषण नाहीच्चे, तर मग हे सगळं आपल्याला का शिकवतेत?’
‘चांगला प्रश्न आहे. पण पहिली गोष्ट म्हणजे प्रदूषण हा सगळ्या जगासमोरचा प्रश्न आहे आणि आपण त्या जगाचा एक भाग आहोत, तर त्या जगात काय चालू आहे ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. कारण ते आज ना उद्या आपल्यापर्यंत येणारच. आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे खरंच अजिबात प्रदूषण होत नाही असं तुम्हाला खरंच वाटतं का?’

या प्रश्नावर मुलांनी अंदाजाने काहीतरी उत्तरं द्यायला सुरुवात केली. सर म्हणाले, ‘असं नको. तुम्ही सगळे आता आपल्या परिसराकडे उघड्या डोळ्यांनी बघा. तुम्हाला कुठे कशाचं प्रदूषण होताना दिसतंय का याचा विचार करा. दिसलं तर ते कसलं प्रदूषण आहे, कशामुळे होतंय, त्याने कोणाला काय त्नास होतो आणि त्यावर तुम्हाला काही उत्तर सुचतंय का असं सगळं लिहा. आपण बरोब्बर एक आठवड्याने या विषयावर पुन: चर्चा करू.

पुढचा आठवडा खडवलीमधली सहावीत शिकणारी सगळी मुलं सगळीकडे लक्ष ठेवून होती. त्यांना खात्नी होती की त्यांच्या गावात त्यांना कुठेही प्रदूषण सापडणार नाही. कारण त्यांच्या गावात कारखाना नव्हता, फारशा गाड्या नव्हत्या, डीजे फक्त लग्नात लागायचा आणि मोबाइल जुना झाला म्हणून टाकून देण्याइतकं गावातलं कोणीही श्रीमंत नव्हतं. त्यामुळे आपल्याला काहीच सापडणार नाही आणि काहीच लिहावं लागणार नाही याची त्यांना खात्नी होती. पण ज्याअर्थी सर सांगतायत त्याअर्थी आपण सगळीकडे नीट बघितलं पाहिजे असं त्यांना वाटत होतं. कारण त्यांचे सर उगीचंच असलं काही सांगायचे नाहीत.
त्यामुळे त्यांनी आठवडाभर निरीक्षण केलं. जेव्हा ते पुढच्या तासाला आपापल्या वह्या घेऊन आले तेव्हा मात्र त्यांना किती सांगू आणि किती नको असं झालं होतं.
सरांनी एकेकाला उभं राहून वाचायला सांगितलं. त्यांच्या वर्गात खडवली आणि आजूबाजूच्या गावांमधली मिळून एकूण 16 मुलं सहावीत होती. त्या सगळ्यांच्या वह्यांमधल्या नोंदी वाचून झाल्यावर सरांनी मुलांशी चर्चा करून निष्कर्ष काढायला सुरुवात केली.
सगळ्याच्या सगळ्या मुलांनी हे नोंदवलं होतं.
1. या घरात चुलीचा धूर होतो त्या घरातल्या आज्या आणि मावश्या खूप खोकत असतात. याचा अर्थ त्यांना चुलीच्या धुराचा त्रास होतो. म्हणजेच चुलीचा धूर हे छोट्या प्रमाणातल का असेना, प्रदूषणच आहे.
2. अनेक मुलांच्या हे लक्षात आलं होतं, की गावातली भांडी घासायची आणि कपडे धुवायची जागा ही विहिरीच्या किंवा नदीच्या जवळ होती. त्यामुळे भांडी घासलेलं, तोंड धुतलेलं, चुळा भरलेलं, कपडे धुतलेलं पाणी पुन: विहिरीच्या आणि नदीच्या पाण्यात जाण्याची शक्यता होती. असं वापरलेलं पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळलं तर पाण्यातून होणारे संसर्गजन्य आजार होऊ शकतात हे त्यांना माहिती होतं. आणि ज्या अर्थी असं केल्याने आजार होऊ शकतात त्या अर्थी हेसुद्धा जलप्रदूषण आहे असा निष्कर्ष मुलांनी काढला होता.
3. काही मुलांनी आठवून लिहिलं होतं, की पेरणीच्या आधी जमीन जाळतात. तेसुद्धा एक प्रकारचं वायुप्रदूषणच आहे.
4.  लोक मोबाइल वगैरे टाकून देत नसले तरी जुने बल्ब, गेलेल्या ट्युबलाइट्स, उंदराने कुरतडलेल्या वायरी या सगळ्या वस्तू सगळेजण नुसतेच उकिरड्यावर टाकून द्यायचे. त्याने जमिनीवर काही परिणाम होतो का? असा त्यांना प्रश्न पडला होता.
5. पण एकूण चर्चेचं तात्पर्य असं होतं, की आपलं गाव जरी लहान असलं, तरी आपणही लहान प्रमाणात का असेना प्रदूषण करतोच. आणि त्याचा त्रास आपल्याच गावातल्या लोकांना होतो. त्यावर उपाय काय यावर खूप चर्चा करून मुलांनी दोन उत्तरं शोधली.
पहिलं म्हणजे धूर न होणा-या  चुली घरात बसवायच्या किंवा गॅस वापरायचा. आणि दुसरं म्हणजे भांडी घासायची आणि कपडे धुवायची जागा पिण्याच्या पाण्याच्या साठय़ापासून दूर न्यायची. सरांनी त्यांच्या वतीनं या दोन्ही गोष्टी ग्रामसभेत मांडायचं कबूल केलं. त्यांचं गाव बहुदा बरंचसं प्रदूषणमुक्त होईल, तशीच सगळी गावं आणि शहर होवोत.. 

--------------------------------------------------------------------

ही आहे थोड्या ‘सटक’ वयातल्या मुला-मुलींसाठी एक मोकळीढाकळी  ‘स्पेस’
- या जागेत आम्ही तर लिहूच; पण मुलांनीही लिहावं असा प्लॅन आहे. मुलांनी काय लिहायचं? - याचं उत्तरही मुलांना आणि त्यांच्या आईबाबांना या ‘स्पेस’मध्येच मिळेल.
थोडी धडपडी, डोकं जरा ‘तिरकं’ चालणारी, सतत काहीतरी कीडे करायला उत्सुक असलेली मुलंमुली.. कुचकट न बोलता अशा मुलांना ‘सपोर्ट’ करणारे प्रयोगशील शिक्षक आणि अशा वेड्या मुलांच्या पाठीत धपाटे न घालता त्यांच्या गळ्यात मैत्रीचा हात टाकणार्‍या आई-बाबांची मिळून एक ‘कम्युनिटी’ बनवता येईल का, असा एक बेत आम्ही शिजत घातलाय. त्याविषयी सांगूच !
तर भेटूया, येत्या रविवारी !
अधल्या-मधल्या मुलामुलींसाठी काय काय शिजतंय हे पाहायचं असेल, तर एका गरमागरम, ताज्या ताज्या भांड्यात जरा पटकन डोकावून पाहायला सुरुवात करा :www.littleplanetfoundation.org

(गौरी ‘लिट्ल प्लॅनेट फाउण्डेशन’ची समन्वयक आहे.)

lpf.internal@gmail.com


Web Title: Who says that there is no pollution in the village? see this list!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.