मनातल्या विचारांचं सिक्रेट काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 03:00 AM2018-08-12T03:00:00+5:302018-08-12T03:00:00+5:30

मनात येतात ते विचारखरे होतात का?

What is the secret of thoughts? | मनातल्या विचारांचं सिक्रेट काय?

मनातल्या विचारांचं सिक्रेट काय?

Next

-यश वेलणकर 

माणसाच्या मनात सतत विचार येत असतात. यातील काही विचार भीतिदायक असतात. मनात स्वत:चा किंवा जीवलग व्यक्तीचा मृत्यू, अपघात, आजारपण, दिवाळखोरी याचे विचार येतात. मनात सतत सकारात्मक, आनंदी विचारच असायला हवेत असा उपदेश ऐकलेला असतो, वाचलेला असतो; पण प्रत्यक्षात तसे होत नाही. मनात नको ते विचार येत राहतात, ते कसे थांबवायचे हे कळत नाही. त्यामुळे भीती, चिंता वाढते.

मनातील विचार खरे होतात हा समज ‘सिक्रेट’ नावाचे लोकप्रिय पुस्तक वाचून दृढ झालेला असतो. अमेरिकेत पंचवीस वर्षांपूर्वी ‘सिक्रेट’ हे पुस्तक आणि फिल्म प्रसिद्ध झाली. त्यामध्ये लॉ ऑफ अँट्रॅक्शन म्हणजे ‘आकर्षणाचा नियम’ सांगितलेला आहे. तुमच्या मनातील विचार वातावरणात तशाच प्रकारचे तरंग उत्पन्न करतात ते तरंग त्यांच्या सारख्याच तरंगांना आकर्षित करतात आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात तसेच प्रसंग घडू लागतात, असा आकर्षणाचा नियम त्यामध्ये अनेक उदाहरणे देऊन सांगितलेला आहे. या पुस्तकाच्या यशानंतर अशा कहाण्या सांगणा-या सेल्फ हेल्प पुस्तकांचे जणूकाही पेव फुटले होते. अशा पुस्तकांमध्ये कल्पनादर्शन म्हणजे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन आणि सकारात्मक विचार यांचा सल्ला दिलेला असतो. क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्हाला जे घडावे असे वाटत असते त्याचे स्पष्ट कल्पना चित्न तयार करून त्याचे पुन्हा पुन्हा ध्यान करायचे. असे ध्यान केल्याने वातावरणात तशा लहरी तयार होतात अणि तुम्ही जी दृश्ये पाहता ती प्रत्यक्ष आयुष्यात सत्यात उतरतात असे सांगितले जाते.

सिक्रेट या पुस्तकावर विश्वास ठेवून अनेकांनी असे ध्यान आणि पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार करणे सुरू केले; पण त्यांनीच नंतर याविरोधात ओरड सुरू केली. Barbara  Ehrenreich या त्यातीलच एक! त्यांनी Bright-Sided : How the Relentless Promotion of Positive Thinking Has Undermined नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. 

त्यामध्ये त्या लिहितात की, आपल्याला जे मिळवायचे आहे त्यासाठी कल्पनादर्शन ध्यान पुरेसे आहे असे समजून रोज तसे ध्यान केले; पण प्रत्यक्ष प्रयत्न फार कमी केले तर  व्यवहारात यश मिळत नाही. यश मिळाले नाही की नैराश्य येऊ लागते. आपण केवळ ध्यान आणि पॉझिटिव्ह विचार करीत राहिलो, त्यावेळी प्रत्यक्ष मेहनत घ्यायला हवी होती, अधिक प्रयत्न करायला हवे होते असे नंतर वाटू लागते. केवळ कल्पनादर्शन केल्याने प्रत्यक्ष आयुष्यात तसे घडतेच असे नाही. 

या  ‘कल्पनादर्शन’च्या संकल्पनेबद्द्ल अधिक तपशिलात येत्या रविवारी..

‘ध्याना’मागोमाग ‘कृती’ही हवीच!

1. आपण जी कल्पना करू तसे बदल आपल्या शरीरात घडतात. 

2. आपल्या तोंडात लिंबू पिळत आहे अशी कल्पना करून तसे दृश्य बंद डोळ्यांनी पाहिले तर तोंडाला पाणी सुटते, तोंड आंबट होते. एखाद्या गोष्टीची कल्पना केली की आपल्या मेंदूला ते खरे वाटते आणि त्यानुसार शरीरात बदल होतात. 
- म्हणूनच अनेक खेळाडू, ऑलिम्पिक विजेते या तंत्नाचा उपयोग करीत असतात. 

3. एखाद्या कृतीची भीती घालविण्यासाठीदेखील या ध्यानाचा उपयोग होत असतो. 

4. एखाद्या व्यक्तीला भाषण करण्याची इच्छा असेल; पण उभे राहून भाषण करण्याची भीती वाटत असेल तर आपण उभे राहून भाषण करीत आहोत अणि र्शोत्यांना ते आवडत आहे अशा दृश्याचे ध्यान पुन्हा पुन्हा केले तर हळूहळू भीती कमी होऊ लागते. मानसोपचारामध्ये ही एक वर्तन चिकित्साच आहे. तिला डीसेन्सिटायझेशन म्हणतात.

5. पण अशा ध्यानाने ती भीती कमी झाल्यानंतर प्रत्यक्ष भाषण करण्याचा सराव त्या व्यक्तीने करायलाच हवा, त्यासाठी संधी निर्माण करायला हवी.

6. तसे केले तरच तिचे भाषण करण्याचे कौशल्य वाढेल केवळ त्या कल्पनेचे ध्यान करून वाढणार नाही. 

(लेखक मनोविकासाच्या तंत्रांचे  अभ्यासक आहेत.)

yashwel@gmail.com

Web Title: What is the secret of thoughts?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.