व्हर्चुअल मनोरंजन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 06:00 AM2020-08-30T06:00:00+5:302020-08-30T06:00:02+5:30

पूर्वीचे खेळ आणि आताचे खेळ यात आता जमीन-अस्मानाचे अंतर आहे. आजमितीला 100 अब्ज अमेरिकन डॉलरहून  अधिक उलाढाल असलेल्या डिजिटल उद्योगाने  खेळ, खेळाची संकल्पना, खेळाचे साहित्य  आणि खेळायची जागा या मूलभूत गोष्टी  कायमस्वरूपी बदलून टाकल्या आहेत.

Virtual Entertainment! | व्हर्चुअल मनोरंजन!

व्हर्चुअल मनोरंजन!

googlenewsNext
ठळक मुद्देघडणार्‍या, मोडणार्‍या, नव्याने घडणार्‍या,  सतत बदलणार्‍या ‘आकारां’च्या दुनियेतला  विचार आणि शास्र

- हृषीकेश खेडकर
मध्यंतरी एका संध्याकाळी चर्चगेट ते बोरिवली प्रवास मुंबई लोकलमधून करण्याचा अनुभव आला. तसा हा प्रवास आधीपण अनेकदा केला आहे; पण ही संध्याकाळ जरा वेगळी होती. गर्दीतून जागा काढत एका ठिकाणी जरा स्थिरस्थावर झालो आणि मग नजर डब्यात भिरभिरू लागली. एव्हाना लोकलने चर्नीरोड ओलांडलं होतं आणि गर्दीतले बरेसचे चेहरे त्यांच्या मोबाइल फोनमध्ये गेम खेळण्यात गुंतलेले होते.
माणसांनी ठासून भरलेल्या त्या लोकलच्या डब्यात काही मिनिटांत सगळं भान हरपून मोबाइलवर फुगे फोडण्यात, कोडी सोडवण्यात किंवा गोळ्या मारण्यात रमलेल्या त्या वयस्कर माणसांच्या चेहर्‍यावर उमटलेल्या बाल्यछटा बघून मी एकदम स्तब्ध झालो.
किती पटकन घडलं होतं हे सारं ! डिजिटल गेमच्या माध्यमातून मनोरंजनाच्या दुनियेने आपल्यावर मिळवलेल्या निर्विवाद ताब्याचं ते मूर्तिमंत उदाहरण होतं.
आजमितीला 100 अब्ज अमेरिकन डॉलरहून अधिक उलाढाल असलेल्या ‘या उद्योगाने खेळ, खेळाची संकल्पना, खेळाचे साहित्य आणि खेळायची जागा या मूलभूत गोष्टी कायमस्वरूपी बदलून टाकल्या आहेत.
1952 साली ए.एस. डग्लस नामक एका ब्रिटिश प्रोफेसरने केंब्रिज विद्यापीठात शिकत असताना प्रबंध म्हणून टिक-टॅक-टो नावाचा सगळ्यात पहिला, संगणकावर खेळता येणारा डिजिटल गेम बनवला. या अद्भुत शोधातून मनोरंजनाच्या सुरू झालेल्या प्रवासातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आला तो 1967 साली. व्हिडिओ गेमचे जनक समजल्या जाणार्‍या राल्फ बेअर यांनी ‘ब्राउन बॉक्स’ची निर्मिती केली आणि घरातल्या टीव्हीवर अनेकजण एकाचवेळी खेळू शकतील, असा व्हिडिओ गेमचा प्लॅटफॉर्म बनवला. आज आपल्या बोटाच्या स्पर्शावर उपलब्ध असलेल्या डिजिटल गेमची मुहूर्तमेढ या ब्राउन बॉक्सनी रोवली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
योगायोगाने म्हणता येईल; पण मैदानी खेळ खेळण्यात रमलेल्या माझ्या बालपणात व्हिडिओ गेम खूप उशिराने आले. मला आठवतं, त्या काळी ‘मारिओ’ गेम खूप प्रसिद्ध होता. आम्ही मित्र अख्खी दुपार संगणकासमोर बसून हा गेम खेळायचो. या खेळात मारिओ नावाची एक डिजिटल द्विमितीय बाहुली, जी उड्या मारत आणि अडथळे चुकवत कायम पळत असते. खेळत असताना अडथळ्यांचे स्तर बिकट होत जातात पण उद्दिष्ट तेच. आपल्या मारिओ भाऊला इच्छितस्थळी सुखरूप पोहोचवायचे. पुढे गेम कॉन्सोल, एक्स बॉक्स अशा काही खास माध्यमातून व्हिडिओ गेमचे स्वरूप बदलत गेले आणि खेळण्याचा हा अनुभव अजून उत्कट वाटू लागला. नव्वदच्या दशकाच्या सुरुवातीला दोन खेळ या कॉन्सोलवर आले, एक होता ‘स्ट्रीट फाइटर’ आणि  दुसरा ‘मोर्टल कॉम्बॅट’. 
खेळातला अनुभव म्हणून हिंसक चित्र आणि रक्तपात व्हिडिओ गेममध्ये दाखवण्याची सुरुवात इथून झाली असं  मनालं जातं. मुख्य म्हणजे या गोष्टीची योग्य ती दखल घेऊन या उद्योगात एण्टरटेनमेंट सॉफ्टवेअर रेटिंग बोर्डची स्थापना करण्यात आली. हा बोर्ड आजही चित्रपटाप्रमाणे व्हिडिओ गेममधील समाविष्ट असलेल्या गोष्टींचा विचार करून प्रत्येक गेमची वर्गवारी करतो.
काळ जसा बदलत होता त्याप्रमाणे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांती घडत होती. या सुवर्णसंधीचा योग्य तो वापर करून घेत व्हिडिओ गेमदेखील कात टाकू पहात होता. हळूहळू व्हिडिओ गेमची जागा डिजिटल गेमने  घेतली. हा खेळ खेळणार्‍यांचं स्वत:चं एक वेगळं जग बनलं, ‘व्हर्चुअल वल्र्ड’. 
या अद्भुत त्रिमितीय अनुभव देणार्‍या जगात प्रत्येक खेळाडूला वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे, साधने, गाड्या अशा गोष्टी निवडून आपला विशिष्ट अवतार जसा बनवता येतो; तसंच ‘व्हर्चुअल वल्र्डमधील चलन वापरून व्यवहारदेखील करता येतात. रिअँलिटीपासून विभक्त झालेल्या या जगात थोडेथोडके नाहीत तर 15 ते 20 टक्के  लोकसंख्या ‘अवतार’ धारण करून वावरते असा कयास आहे. 
प्रसिद्ध लेखक युवाल हरारीने आपल्या एका लेखात म्हटल्याप्रमाणे डिजिटल गेम हे धर्माच्या व्याख्येपेक्षा कमी नाहीत.
तो म्हणतो, जर तुम्ही रोज प्रार्थना केलीत तर तुम्हाला गुण मिळतील, प्रार्थना करायला विसरलात तर गुण कमी होतील; आणि आयुष्याच्या शेवटी तुमच्याकडे भरपूर कमावलेले गुण असतील तर मृत्यूपश्चात तुम्ही अजून पुढच्या स्तरावर पोहोचाल. आपण बनवलेले चांगल्या-वाईट कर्मातून मिळणार्‍या गुणांचे हे समज व्हच्यरुअल वल्र्डमध्येदेखील लागू होतात हे महत्त्वाचे. 
स्मार्टफोन हातात घेऊन फार्मव्हिला गेम खेळणार्‍या खेळाडूंमध्ये हजारो - लाखोंचे जमिनीचे व्यवहार होतात; लहान मुले पोकेमॉनची शिकार करायला कुठेही भटकतात, काही जण अवतार धारण करून रक्तरंजित क्रांती घडवू पाहतात आणि हे सगळं व्हच्यरुअली होत असतं. मग आपल्याला प्रश्न पडतो की यात खरं खरं तर काहीच नाही मग कशासाठी हा अट्टाहास? 
पण आपण हे विसरतो की हे सगळं ‘व्हर्चुअली घडवून आणणारा माणूस आणि त्याच्या मनातला विचार रिअल आहे. झपाटल्यासारखं भूक-तहान हरपून एकाच ठिकाणी तासन्तास बसून डिजिटल गेम खेळत,  आपण आपल्या बदलत्या नैसर्गिक जाणिवांकडे मुद्दामून दुर्लक्ष करतो आहोत का? 
निखळ मनोरंजन या उद्देशाने प्राचीन संस्कृतींपासून सुरू झालेली खेळाची सुरुवात आज एका अनोख्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. व्हर्चुअल जगात जिवंत राहण्याच्या आणि र्शीमंत होण्याच्या चिंतेत खेळाचा मुख्य उद्देश कुठे मागे पडला आहे का? भविष्यात खेळात टिकून राहण्याची ही चुरस निश्चितच अजून वाढेल; पण व्हच्यरुअली आपलं अस्तित्व जपण्यासाठी आपण आपलं खरं अस्तित्व कुठे धोक्यात नाही घालत आहोत ना? एक ना अनेक प्रश्न त्या बोरिवली लोकलच्या डब्यात मनात येत होते आणि बाहेरची माणसांची गर्दी परवडली; पण मनातली ही प्रश्नांची गर्दी कोणीतरी थांबवली तर बरं होईल असं वाटत होतं. याचं उत्तर लगेचच मिळालं, खिडकीतून बाहेर नजर गेली आणि रिअल जगात परतलो!. 

hrishikhedkar@gmail.com
(लेखक वास्तुरचनाकार आणि प्रॉडक्ट डिझायनर आहेत.)

Web Title: Virtual Entertainment!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.