ओडिशाच्या  गावागावांत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:01 AM2019-10-20T06:01:00+5:302019-10-20T06:05:02+5:30

देशातल्या गरीब आणि ‘पिछड्या’ राज्यांमध्ये  ओडिशाचं नाव आहे; पण आपत्ती व्यवस्थापनात मात्र या राज्याचा  देशात निर्विवादपणे पहिला क्रमांक लागतो. सतत चक्रीवादळांशी झुंजणं नशिबी आलेल्या या राज्यानं  अख्ख्या जगानं दखल घ्यावी, अशी  आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभी केली आहे. - त्यामागच्या रहस्यांचा शोध !

In the villages of Odisha .. to trace the cyclone 'Foni'.. an exclusive story in Lokmat Deepotsav.. | ओडिशाच्या  गावागावांत..

ओडिशाच्या  गावागावांत..

Next
ठळक मुद्दे‘फोनी’च्या चक्रीवादळात ताठ उभं राहिलेल्या  ओडिशाच्या किनारी गावांमध्ये फिरताना..

- समीर मराठे

‘चक्रीवादळाचा धोका असलेल्या साडेपंधरा लाख लोकांना चोवीस तासांच्या आत प्रशासनानं सुरक्षित जागी हलवलं आणि लाखो लोकांचे प्राण वाचवले !’
कसं शक्य आहे हे?
- या प्रश्नाचा वळवळता भुंगा डोक्यात घेऊनच मी आणि माझा छायाचित्रकार मित्र प्रशांत खरोटेने ओडिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये पाय ठेवला, तेव्हा त्या घटनेला तब्बल अडीच महिने उलटून गेले होते !
भुवनेश्वरच्या विमानतळावर पाय ठेवल्यापासूनच आजूबाजूला विध्वंसाच्या खुणा दिसत होत्या. त्यानंतरच्या दहा-बारा दिवसांत भुवनेश्वर, पुरी, खोर्धा, कटक, कोणार्क. हा चक्रीवादळग्रस्त भाग पिंजून काढताना जे पाहिलं, ते केवळ थक्क करणारं होतं.
3 मे 2019 या दिवशी ओडिशाच्या किनारपट्टीवर ‘फोनी’ या चक्रीवादळानं थैमान घातलं. ताशी तब्बल दोनशे किलोमीटर वेगानं वाहणार्‍या या वार्‍यानं सगळं काही होत्याचं नव्हतं करून टाकलं. दीड कोटी लोकांना या चक्रीवादळाची झळ बसली. लाखो लोकअक्षरश: रस्त्यावर आले. मालमत्तेचं नुकसान झालं असलं, तरी नागरिकांचे प्राण वाचले, त्यामागे होती अख्ख्या जगाला दखल घ्यायला भाग पाडलेली ओडिशाची डिझास्टर मॅनेजमेंट सिस्टीम! एका गरीब राज्याने ही जादू कशी काय साध्य केली असेल, याचं रहस्य शोधायलाच आम्ही ओडिशाला पोहचलो होतो.
1999ला अशाच प्रकारचं एक चक्रीवादळ ओडिशात आलं होतं. या ‘सुपर सायक्लॉन’मध्ये तब्बल दहा हजारपेक्षाही जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. पण याच घटनेतून ओडिशानं पहिला मोठा धडा घेतला. ओडिशा जिद्दीनं उभं राहिलं आणि झपाटल्यागत कामाला लागलं.  
1999 आणि 2019.
त्यावेळी दहा हजारावर बळी आणि आता ‘केवळ’ 64!
पूर आणि चक्रीवादळं ओडिशाला नवीन नाहीत. पण प्रत्येक आपत्तीतून प्रशासन शिकत गेलं. प्रत्येक कमतरतेवर मात करत गेलं. विज्ञान-तंत्रज्ञानाची कास धरली. लोकांनाही सोबत घेताना हे ‘आपलं’ काम आहे, हे त्यांना पटवून दिलं. 
देशातल्या गरीब आणि ‘पिछड्या’ राज्यांमध्ये ओडिशाचा नंबर लागतो; पण आपत्ती व्यवस्थापनात या राज्याचा देशात निर्विवादपणे पहिला क्रमांक लागतो. केवळ भारतातल्याच नाही, तर जगात कुठेही, कोणतीही मानवी, नैसर्गिक आपत्ती घडली, तरी ओडिशाची टीम तिथे धावून जाते, त्यांना मदतीसाठी बोलावलं जातं, इतकी प्रगती आज ओडिशानं केली आहे. ती कशी केली, याची रहस्यं शोधत मी आणि प्रशांतनं सचिवालयापासून ते खेडोपाड्यांपर्यंत अनेक ठिकाणी पायपीट केली. 
ओडिशामधला चक्रीवादळग्रस्त भाग उभा-आडवा पालथा घालताना, सुरुवातीला भेट दिली ती पुरीच्या गंगानारायणपूर या छोट्याशा गावाला. नदीकाठावरचं हे गाव. तिथल्या मल्टिपर्पज सायक्लॉन शेल्टरजवळ आलो, तर अख्खा गाव तिथे जमलेला होता. गावकरी, शाळेतली मुलं-मुली, शिक्षक, मुख्याध्यापक. अख्खं गाव उद्ध्वस्त झालेलं होतं. शाळेच्या पडलेल्या भिंती आणि वर्गांची उडालेली छपरंही बसल्या जागेवरून दिसत होती. प्रत्येकाचं काही ना काही नुकसान झालं होतं. पण इथली मुलं आणि गावकरी मोठय़ा हिमतीचे. सारं काही विसरून त्यांनी आता नव्यानं सुरुवात केली होती. कोणी हातउसने घेतले होते, कोणी कर्ज काढलं होतं, कोणी कामधंदा शोधण्यासाठी आपलं गाव, राज्यही सोडलं होतं.
ना माणसं ओळखीची, ना त्यांची भाषा. पण त्यांची हिंमत त्यांच्या डोळ्यांत दिसत होती. ‘सगळी घरं, झाडं पडलेली; पण तुम्ही कसे वाचलात?’ असं विचारल्यावर त्या शाळकरी विद्यार्थ्यांनी सायक्लॉन शेल्टरकडे बोट दाखवलं आणि थेट प्रात्यक्षिकच करून दाखवलं. एक शाळकरी मुलगी उठली, तिनं आजारी, अपंग लोकांना आपत्तीत एकटीनं कसं उचलून आणायचं ते त्या व्यक्तीला थेट उचलून आणूनच दाखवलं. दुसरी उठली, तिनं कोणतीही औषधं, डॉक्टर नसताना प्रथमोपचार कसा करायचा, हाड मोडलेल्या माणसावर हाताशी असलेल्या वस्तुंनिशी कसे उपचार करायचे हे दाखवलं. दोन तरुण उठले, त्यांनी तिथेच असलेलं एक पॉवर कटर आणलं, त्याच्या साह्यानं रस्त्यात पडलेले भलेमोठे वृक्ष कसे कापायचे आणि बाजूला करायचे, ते दाखवलं.
नैसर्गिक आपत्तीत प्रशासन, सरकार आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही, तेव्हा आपली काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार, हे त्यांना माहीत होतं. शेकडो गावातले हजारो लोक प्रशासनाची वाट न पाहता स्वत:च कामाला भिडले आणि काही तासांत त्यांनी गावागावांतले रस्ते पूर्वपदावर आणले. वाहतूक सुरू झाली आणि त्यानंतर बर्‍याच गोष्टी सोप्या झाल्या.
ज्या प्रशासकीय कर्मचार्‍यांच्या अकार्यक्षमतेच्या नावानं सगळीकडे ओरड होत असते, तेच कर्मचारी लोकांच्या दु:खाशी एकरूप होताना तब्बल महिना-महिना घरीही गेले नाहीत. 
 सगळे मिळून या आपत्तीवर मात करत होते. सगळेच कफल्लक; पण आपली वेदना बाजूला सारून दुसर्‍यासाठी झटत होते. ज्याच्याजवळ जे आहे, त्यातलं तो दुसर्‍याला देत होता. 
पुरी जवळच्या एका गावात दु:शासन कंदी हा तरुण भेटला. त्याच्या गावात तो एकटाच इलेक्ट्रिशिअन. वीज तर अख्ख्या गावातली गेलेली. प्रशासनानं नव्यानं खांब उभारून दिल्यावर हा पठ्ठय़ा घरोघरी जाऊन लोकांची वायरिंग दुरुस्त करीत होता. त्यांच्या घरी वीज येण्यासाठी रात्रंदिवस झटत होता. तेही फुकट ! स्वत:ची रोजीरोटी बुडवून! 
असेच अनुभव जागोजागी. 
एकाच वेळी विषण्ण करणारे आणि त्यांच्या हिमतीची दाद देणारे.
त्यामुळेच ही केवळ विध्वंसाची, विनाशाची, मोडून पडल्याची नकारात्मक कहाणी नाही. ही आहे एका यशाची, झपाटल्या प्रय}ांची, मोडून पडल्यानंतरही ताठ कण्यानं पुन्हा उभं राहण्याची आणि अवघ्या जगानं दखल घ्यावी अशा विलक्षण संघर्षाची फलदायी कहाणी. 
चक्रीवादळग्रस्त ओडिशाच्या भटकंतीत ‘लोकमत दीपोत्सव’ला मिळालेली, मिळवलेली ! यावर्षीच्या  ‘दीपोत्सव’मध्ये आमच्या भटकंतीत आम्हाला सापडलेला हा थरार तुम्हाला प्रत्यक्ष अनुभवता येईल !
sameer.marathe@lokmat.com
(लेखक लोकमत वृत्तसमूहात उपवृत्त संपादक आहेत.)

Web Title: In the villages of Odisha .. to trace the cyclone 'Foni'.. an exclusive story in Lokmat Deepotsav..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.