शहरं
Join us  
Trending Stories
1
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
2
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
3
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
4
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
5
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
6
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
7
“महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
8
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
9
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
10
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
11
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
12
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
13
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर
14
कोण आहे Jolly LLB 2 मधील इक्बाल कादरी? पाकिस्तानी समजून नाकारले गेले चित्रपट, ओळख पटवण्यासाठी मागितला व्हिसा
15
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
16
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
17
डिजिटल अश्वमेध! STच्या मोबाईल अ‍ॅपला प्रवाशांचा तुफान प्रतिसाद; युजर्सची संख्या १० लाखांपार
18
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
19
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
20
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर

हा काळ उण्याचाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 10:49 IST

आहे ती परिस्थिती स्वीकारायची आणि गप्प बसायचे. पुढे चालायचे. कशाबद्दल तक्रार करायची नाही. कुठलाही ठोस मुद्दा मांडायचा नाही. सगळ्यांना घाई आर्थिक विकासाची!

- डॉ. सुधीर रसाळ

माझे तरुणपण मला आठवते. स्वातंत्र्य मिळालेले. ताजे होते अजून. सगळे वातावरण कसे रसरसलेले. मराठी वाङ्मयाला एक नवे रूप, नवे तेज प्राप्त झाले होते. बा. सी. मर्ढेकर, पु. शि. रेगे यांच्यासारखे कवी, श्री. ना. पेंडसे, गो. नी. दांडेकर यांच्यासारखे कादंबरीकार, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर यांच्यासारखे कथाकार साहित्यात नवनवे प्रयोग करीत होते. जवळपास १९७०-७५ पर्यंत हे वातावरण टिकले. त्यानंतर एक नवे वळण मराठी वाङ्मयाला मिळाले. लघु नियतकालिकांनी एक चळवळ सुरू केली, त्या चळवळीने वाङ्मयामध्ये पुन्हा एक प्रचंड उलथापालथ घडवून आणली; परंतु त्यानंतर मात्र मराठी वाङ्मयाचा दर्जा सतत घसरत गेला. आज तर मराठी वाङ्मयाबरोबरच मराठी भाषेची स्थितीही अत्यंत शोचनीय आहे. त्यादृष्टीने मी स्वत:ला भाग्यवान समजतो, की तरुण वयात जे वाङ्मय मला वाचायला मिळाले, मनावर परिणाम करणाºया ज्या साहित्यिक अनुभवांचे मला साक्षीदार होता आले त्यानेच माझे भरणपोषण केले.माझ्यासारख्या समीक्षकाची जी काही जडणघडण झाली ती या प्रकारच्या आव्हानपर वाङ्मयामुळेच. हे वाङ्मय जाणकार वाचकाच्या मनात नवेनवे प्रश्न निर्माण करीत असे. त्याला वाङ्मयाबद्दल विचार करायला प्रवृत्त करीत असे. त्यातून माझ्यासारखा माणूस घडला. जी काही थोडीबहुत समीक्षा मी लिहू शकलो, त्याचे कारण या काळातील वाङ्मय आहे. म्हणूनच मी माझे पुस्तक गंगाधर गाडगीळांना अर्पण करताना असे म्हटलेय की, ‘तुमच्या वाङ्मयावर आणि तुमच्या वाङ्मय समीक्षेवर आम्ही पोसलो..’आज एखादा तरुण, नवा मराठी अभ्यासक आजच्या लेखकांबद्दल असे काही विधान करू शकेल का याविषयी मी साशंक आहे.आज मला काय दिसते?.. महेश एलकुंचवार यांच्यानंतर एकही नाटककार मराठीत नाही. अरुण कोलटकरांनंतर त्या ताकदीचा एकही कवी मराठीमध्ये आज नाही. भालचंद्र नेमाडे आता वयाच्या ऐंशीत येऊन पोहोचले आहेत. नेमाडेंनंतर त्यांच्या तोडीचा, ज्याला दर्जा आहे असा एकही कादंबरीकार दिसत नाही. याचा अर्थ आज कादंबºया लिहिल्या जात नाहीत असा नाही, पण दर्जात्मक लिखाणाच्या नावाने वानवाच दिसते.एक काळ असा होता, मराठीमध्ये उत्तम वैचारिक वाङ्मय निर्माण होत होते. आज वैचारिक वाङ्मय जवळजवळ संपल्यात जमा आहे. फारच थोडे लेखक ‘विचारवंत’ म्हणावेत असे आहेत. या सगळ्या गोष्टींचा केवळ वाङ्मयावरच नाही, तर समाजावरही काही ना काही परिणाम होत असतो.महाराष्ट्राला अभिमान वाटावा, असे संपन्न वैचारिक वाङ्मय इतर भाषांच्या तुलनेत मराठीला लाभलेले आहे. इतर भाषिक साहित्यिकांनीही त्याचे दाखले दिलेले आहेत. मला आठवते, ते कदाचित रत्नागिरीचे साहित्य संमेलन असावे. त्या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करताना ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा म्हणाले, ‘आम्हाला तुमच्याविषयी एक प्रकारची असूया वाटते. अतिशय संपन्न असे वैचारिक वाङ्मय मराठीमध्ये आहे आणि त्यातून तुमचे ललित वाङ्मय पुष्ट झालेले आहे. असे दृश्य आमच्याकडे पाहायला मिळत नाही.’वैचारिक वाङ्मयाची आज काय अवस्था आहे?.. मासिके बंद पडताहेत. ‘नवभारत’सारखे मासिक रडतखडत चालविले जात आहे. सामाजिक प्रश्नांवर कोणी पोटतिडिकेने लिहीत नाही. आर्थिक प्रश्नांची तर चर्चाही नाही. इतिहासातून नवा अर्थ शोधण्याचा प्रयत्न होत नाही. सर्वच क्षेत्रांत शांतता पसरली आहे. ही शांतता घाबरवून टाकणारी आहे. म्हणून आजचा काळ हा मला उण्याचा, ओंजळीतून काहीतरी निसटल्याचा, हरवल्याचा काळ वाटतो.अधिकचे; ज्याबद्दल उभारीने, उमेदीने बोलावे असे फारसे काहीच आढळत नाही. संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तेव्हा किती उभारी होती मराठी माणसामध्ये. मराठी मनामध्ये. यशवंतरावांसारखा द्रष्टा नेता लाभला होता. मराठी भाषेला किती समृद्ध करू आणि किती नको, असे या मुख्यमंत्र्याला झाले होते. साहित्य संस्कृती मंडळ स्थापन केले गेले. त्यानंतर मराठी भाषेचा स्वतंत्र विभाग स्थापन केला गेला. विद्यापीठ पुस्तक निर्मिती मंडळ स्थापन केले गेले. ‘विश्वकोशा’सारखा प्रकल्प हाती घेतला गेला. किती उत्तम दिवस त्या काळात मराठीला मिळाले. नंतर हळूहळू ही परिस्थिती फारच बदलत गेली. विद्यापीठ वाङ्मयनिर्मिती मंडळही बंद पडले. किती उत्तम पुस्तके त्या काळातील प्राध्यापकांनी अनुवादित केली होती! आज हे सगळे धूळखात पडले आहे. विश्वकोश निर्मिती ही अखंड अशी प्रक्रिया असते. या विश्वकोशाचे सर्व खंड आपण अजून काढू शकलेलो नाही. विश्वकोशाबरोबरच मराठीमधला बृहत्शब्दकोश तयार व्हावा, अशी भूमिका यशवंतरावांनी मांडली होती. तीही आजपर्यंत पूर्णत्वास येऊ शकलेली नाही. ही आहे मराठीची अवस्था!..विकास-विकास.. ‘विकासा’विषयी आपण खूप बोलतो, पण नुसत्या संस्था स्थापन करून विकास होत नाही. त्यासाठी प्रेरणा देणारे नेते त्या-त्या क्षेत्रात निर्माण व्हावे लागतात. तसे काहीही झालेले नाही. मराठी शाळा बंद पडताहेत. सरकारच शाळा बंद करते आहे. हे असे का होते? आपण कुठे चुकतो आहोत, याचा विचार कुणीही का करीत नाही? आहे ती परिस्थिती स्वीकारायची आणि गप्प बसायचे. पुढे चालायचे. कशाबद्दल तक्रार करायची नाही. कुठलाही ठोस मुद्दा मांडायचा नाही. सगळ्यांना घाई आहे ती फक्त आणि फक्त आर्थिक विकासाची! भरपूर पगार देणाºया नोकºया हव्या आहेत! इंग्रजीमधून शिक्षण हवे आहे! शक्य झाल्यास अमेरिकेत किंवा पाश्चात्त्य देशात राहायला मिळाले, तर अधिकच चांगले!आम्ही आमच्याच देशाचा द्वेष करतो! आम्ही आमच्या संस्कृतीचाच जणू द्वेष करतो! ही अतिशय भीषण परिस्थिती आहे. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे, की दुसरी संस्कृती स्वीकारणे म्हणजे त्या दुसºया संस्कृतीला आपण दत्तक जाणे. दत्तक घेतलेले मूल जसे आपल्या रक्ताचे होऊ शकत नाही, तशी दुसरी संस्कृती तुम्ही स्वीकारली, तरी तरी कधीही तुमच्या रक्ताची संस्कृती होऊ शकत नाही. जगात असे कधीही झालेले नाही.संस्कृतीचे परिवर्तन कसे होते? दुसºया संस्कृतीतल्या गोष्टी घेऊन त्या आपल्या संस्कृतीत मुरवाव्या लागतात, तेव्हा त्या आपल्या होतात. आपल्याला ही प्रक्रियाच जणू मान्य नाही. अनेक चुकीच्या गोष्टी, प्रथाही आपल्या संस्कृतीत आहेत. त्या आम्ही सुधारू, त्यात बदल घडवू, त्याला नवे रूप देऊ, ही प्रेरणाच नाही. त्याच्या जागी पाश्चात्त्य संस्कृतीतल्या गोष्टी आणून ठेवणे, असे काही तरी चाललेले आहे.आपण दोन स्तरांवर जगू लागलो आहोत. एकीकडे आपल्याला आपल्या संस्कृतीची घृणा वाटते तर दुसरीकडे पाश्चात्त्य संस्कृतीचे आकर्षण! पण घोळ असा, की ती संस्कृतीही आपल्याला पूर्णपणे स्वीकारता येत नाही, आणि आपली संस्कृती आपल्याला पूर्णपणे टाकताही येत नाही! हे जे सगळे वातावरण आहे, यामुळेच मराठी वाङ्मय, मराठी भाषा, मराठी समाजाबद्दल प्रश्न निर्माण झाले आहेत. हे सगळे बदलायचे असेल, तर सांस्कृतिक क्षेत्रामध्ये फार मोठे नेतृत्व नव्याने उभे राहणे आवश्यक आहे. माझ्यासारखी माणसे ते नेतृत्व देऊ शकत नाहीत; पण नव्या पिढीने गंभीरपणे या सगळ्या प्रश्नाचा विचार करणे आवश्यक आहे.एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, आर्थिक विकासाच्या जोडीला सांस्कृतिक विकासही तितकाच महत्त्वाचा असतो. नाही तर माणसे समृद्ध आर्थिक जीवन जगणारे रानटी पशू बनतात..मातृभाषा हीच ज्ञानभाषा का नसावी?इंग्रजी येणारा आपल्या देशातला विद्यार्थी रशिया, जर्मनीसारख्या देशात शिकायला जातो. त्याला रशियन किंवा जर्मन भाषा येत नसते आणि रशिया, जर्मनीत इंग्रजी भाषेत शिकवत नाहीत. अन्य भाषिकाला या देशांत त्यांची मातृभाषा शिकण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी देतात. सहा महिन्यांत विद्यार्थी जर्मन किंवा रशियन शिकून घेतात; परंतु आपल्या देशात मात्र केजी टू पीजी इंग्रजी शिकविले जाते. काय गरज आहे?.. मातृभाषेत शिक्षण देऊन मग एखादी भाषा शिकण्यासाठी असा ठराविक कालावधी नाही का देता येणार? त्यासाठी ‘लँग्वेज लॅबोरेटरीज’ स्थापन झाल्या पाहिजेत. उर्वरित सर्व शिक्षण मातृभाषेतून द्यावे. लॅबोरेटरीजमधून दररोज एक तास इंग्रजी शिकवा; परंतु असे होत नाही. कारण ज्ञानाच्या संकल्पना आपण स्वत:मध्ये मुरवूनच घेत नाही. आपण पाठांतर करून शिकतो. हे बदलण्यासाठी शाळेचे स्वरूप पूर्णपणे बदलणे आवश्यक आहे. ज्ञानाचे माध्यम म्हणून मातृभाषेतूनच संशोधन झाले पाहिजे.