शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
3
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
4
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
5
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
6
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
7
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
8
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
9
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
10
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
11
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
12
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
13
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
14
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
15
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
16
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
17
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
18
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
19
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
20
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाला वेशीबाहेर ठेवणाऱ्या गावाची गोष्ट!

By meghana.dhoke | Updated: January 31, 2022 18:02 IST

Coronavirus: धनपाडा, ता. पेठ. जि. नाशिक या गावाने एकजूट करून कोरोनाला अद्यापही गावाबाहेरच रोखून धरले आहे. गावकऱ्यांनी एकत्र येऊन केलेल्या मुकाबल्याची कहाणी...

ठळक मुद्देसर्व छायाचित्रं: प्रशांत खरोटे, लोकमत

- मेघना ढोके(संपादक, सखी डिजिटल, लोकमत)

कोणे एकेकाळी पृथ्वीवर असं जग होतं, जिथं कुणी मास्क लावत नव्हतं, सॅनिटायझरचे फवारे मारत नव्हतं की माणसं दिसल्यावर गर्दी नको म्हणून ‘दुरी’ सांभाळत नव्हतं, बांधूनही घालत नव्हतं माणसांना चार भिंतीत आणि लॉकडाऊनची भीती घालून धाकातही ठेवत नव्हतं... पण ‘कोरोना’ नावाचं प्रकरण उपटलं आणि तोंडाला मास्क लावून सतत भीतीखाली जगण्याची रीतच ‘नॉर्मल’ झाली.

पण म्हणून अजूनही सारं ‘संपलेलं’ नाही. आपल्या अगदी आसपासही असं जग आहे, जिथं अजूनही कोरोना पोहोचलाच नाही. त्या जगात, त्यांच्या निकट भवतालात आजही माणसं मास्क लावून जगत नाहीत. त्यांना धास्तीनं घेरलेलं नाही आणि भीत भीत जगण्याची सक्तीही नाही. अशाच एका गावात ‘लोकमत’ची टीम पोहोचली : धनपाडा, ता. पेठ, जि. नाशिक.नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात अशी अनेक गावं आहेत जिथं आजवर कोरोनाचा एकही रुग्ण मिळालेला नाही. राज्यात, देशातच काय; जगभरातही असे कोपरे आहेतच; त्यातलं एक हे धनपाडा नावाचं गाव!  दुर्गम, जंगलाच्या पोटातलं. गुजरातला लागून असलेल्या बॉर्डरवरचं पाडावजा गाव. नाशिक शहरापासून जेमतेम ८० किलोमीटरवर. वाघेरेचा वळणावळणाचा घाट ओलांडून हरसूल मार्गे निघालो, तर पुढेपुढे रस्त्यावर चटकन माणूस दिसत नाही. झाडांत दडलेला गच्च गारठा, किरकोळ वस्ती.  कुठं झऱ्यांवर, ओढ्यांवर आंघोळी उरकत आश्रम शाळेत जायचं म्हणून गर्दीनं जमलेली शाळकरी मुलं. हळूहळू  पाणी आटलेलं दमण नदीचं खोरं दिसायला लागतं. अवतीभोवती उंच उंच गेलेली सागाची झाडं, त्याहूनही उंच डोंगर आणि गच्च शांतता.  मानवी जगण्याचा कृत्रिम स्पर्शच झालेला नसावा इतका नितळ भवताल. एकटं-दुकटं दिसणारी माणसं, घरं आणि पाडे, कुणी निवांत शेकोटी शेकत असतो. कुणी आईबाई पाणी वाहत असते हंड्यावर हंडे. सिमेंटने बांधलेल्या विहिरी पाण्यानं शिगोशिग भरलेल्या, पण डोक्यावरून पाणी वाहणं इथं बायकांना चुकलेलं नाही. पाड्यांवरच्या छपरांवर डीटीएचच्या छत्र्या दिसतात, लहानशा टपऱ्यांवर कुरकुरे आणि शाम्पूच्या सॅशेटच्या माळा लटकतात, अनवाणी लेकरं गायी-गुरांच्या मागेही पळतात. 

कमालीचं निसर्गसौंदर्य भवताली घेऊन जगणाऱ्या माणसांच्या जगात ‘मास्कवाल्या’ शहरी नागरी जगातून जाताना मोठी उत्सुकता वाटते. कसं असेल बिना कोरोनाचं जग? कशी असतील तिथली खुला श्वास घेणारी माणसं? या गावांमध्ये कोरोना पोहोचलाच नाही, ते कसं?असं काय आहे या गावात, जे इतर गावांत नाही? धनपाडा तसा छोटाच, पण लखलखीत स्वच्छ. कुठं कागदाचा कपटा नाही, प्लास्टिकचा कचरा नाही, कुठं गटार नाही की कुठं रस्त्याला खड्डा नाही. अतिशय चापूनचोपून सारवलेली अंगणं, घराभोवती छोटी हिरवीगार वाडगी, खेळणारी-पळणारी लहान लेकरं. गोठ्यात निवांत म्हैशी. अतिशय देखणं-सुबक गाव. मंदिराला लागूनच सरपंचांचं घर. रमेश दरोडे त्यांचं नाव. तरुण गृहस्थ. पस्तीशीचे. बीए आणि आयटीआयचा डिप्लोमा करून इलेक्ट्रिकलचं दुकान त्यांनी पेठमध्ये काही काळ चालवलं; पण आता शेतीच करतात. २०११ ला गावचे उपसरपंच झाले. त्यानंतर सरपंच. ऑक्टोबर २०२१ ला त्यांची मुदत संपली आहे; पण अजून निवडणुका न झाल्यानं तेच काळजीवाहू सरपंच म्हणून कामकाज पाहात आहेत. दरोडे सांगत होते, ‘आमच्या गावात अजून एकपण पेशंत नाय निगलेला. आमची धनपाडा ग्रुपग्रामपंचायत आहे. धनपाडा, बिलकीस, बोरपाडा, खामशेत हे चार पाडे. ३००० लोकांची एकूण वस्ती. आमचं गाव ५०० माणसांचं. आमच्याकडे शेती चार महिनेच. पावसाळ्यात. उडीद, नागली, तूर, भात, खुरसणी एवढीच पिकं. पोटापुरतंच पिकतं. बाकीचे महिने लोक नाशिक, गुजरात-पार सोलापूर-पंढरपूरपर्यंत मजुरीला जातात. स्थलांतर जास्त आहे. साथ सुरू झाल्याझाल्या कामाला लागलो आम्ही.  गावातले जेवढेपण स्थलांतरित होते, त्या सर्वांना  गाड्या करून लगेच अर्जण्टमध्ये गावात आणलं. जे मागेच राहून गेले, त्यांना सांगितलं तिकडेच राहा. तिकडं त्यांना धान्य मिळेल, उपासमार होणार नाही, याची सोय ओळखपाळख काढून केली. जे गावात आले, त्यांच्या पोटाचा प्रश्न होता, मग समाजसेवी संस्थांची मदत घेऊन  ४७० कुटुंबांत धान्य वाटलं. सगळ्यांच्या पोटापुरतं होईल,  याची काळजी घेऊन सांगितलं की, आता गावाबाहेर जायचं नाही.’

आपल्या गावात एकही कोरोनाबाधित आजवर झाला नाही, याचा आनंद अनेक डोळ्यांत दिसतो. ‘हालाखीचे फार दिवस पाहिले आम्ही. विकास व्हायला पाहिजे तर गावानं एक व्हायला पाहिजे...’  -  एक आजोबा सांगत होते. बाकी लोक ‘बरोबर आहे, बरोबर आहे’ म्हणत हीच कथा सांगत होते. गावाला गाडगे महाराज स्वच्छता अभियानात प्रथम पारितोषिक मिळालं आहे.  मोठी पाण्याची टाकी बांधून प्यायचं पाणी गावात आणलेलं आहे. त्याला नळ लागलेत. आता  बायका पाणी भरतात तिथं. एक तरुण सांगतो, ‘बाया पाणी वाहूनच जाम व्हायच्या, आता आम्ही सांगतो सगळ्यांना, पाणी बायांनीच वहायला पाहिजे असं नाही, बाप्यांनी पण वाहिलं तर चालतं.’ काही दिवसांनी घरोघर प्यायच्या पाण्याचे नळ जातील.  केंद्राची टीम येऊन गेली, त्यातून गावाला निधी मिळाला. ‘गावात एकी पाहिजे, आपण योजना, काम घेऊन गेलं तर कोण नाही म्हणत नाही.’ - दुसरा तरुण सांगत असतो.गावात सगळ्यांकडे अशा कहाण्या असतात. तोवर शाळेची वेळ झाल्याने पोरं शाळेत धावतात. काही तरुण डबल, ट्रिपल सिट्स कुठं कामाला जातात. काहींच्या डोक्याला जेल चोपडून स्पाईक्स, कुणाच्या अंगात लेदर जॅकेट्स, हातात स्मार्टफाेन. लॉकडाऊन लागण्यापूर्वी गावात फार तुरळक स्मार्टफोन होते, आता घरोघर एक स्मार्टफोन आहे. कोरोनाकाळात एवढे सारे नियम, भीती, चुकून कधी वैताग आला का? असं विचारलं तर एक आजोबा म्हणाले, ‘चिडून कुणाला सांगायचं? नियम आपल्या सुरक्षिततेसाठी आहेत. त्यात काय त्रास व्हायचा?’ अडचणी साऱ्या जगाला आल्या, आपल्यालाही आल्या... पुढं चालायचं..

meghana.dhoke@lokmat.com  

धनपाडा ग्रामपंचायतीने कोरोना दूर कसा ठेवला?  

लॉकडाऊन जाहीर होताच गावातील जास्तीत जास्त स्थलांतरित कुटुंबांना परत आणलं.  

गरजू लोकांच्या  पोटापाण्याची सोय गावानं उचलली. 

किराणा, भाजी आणायलाही कुणी दूरच्या गावात जाऊ नये यासाठी गावातच व्यवस्था केली.  जवळच्या पेठ या तालुक्याच्या किंवा हरसूल या बाजारपेठेच्या गावी जाऊ नये, असं ठरवलं.

लॉकडाऊन जाहीर झालं तेव्हा चारही पाडे मिळून १५ लग्न सोहळे ठरलेले होते.  ते रद्द करण्यात आले. लॉकडाऊन उघडल्यावरही अगदी कमीत कमी माणसांत काही विवाह करण्यात आले. गर्दी टाळली.

लग्न, अंत्यसंस्कार यासाठी लांबच्या गावी, दूरवर जाण्यास मनाई करण्यात आली.

गावात कुणालाही थोडा सर्दी-ताप आला तरी त्याला ताबडतोब अलगीकरणात ठेवणे,  आरोग्य केंद्रातून औषधोपचार, लक्षणांकडे लक्ष राहील, अशी तजबीज केली.

तेच अंत्यसंस्काराला जाण्यासंदर्भात, फार लांबच्या गावी, दूरवर जाण्यास मनाई करण्यात आली.

विशेष म्हणजे, हे सारं गावातल्या सर्व लोकांनी एकमतानं मान्य केलं. ज्यांना प्रश्न होते त्यांचं शंकानिरसन केलं गेलं.

लसीकरण सुरु होताच संपूर्ण गावाने लसीच्या मात्रांचं वेळापत्रक काटेकोरपणे सांभाळलं.

आपल्या गावात कोरोना नाही तर लस तरी कशाला घ्यायची, असं म्हणणाऱ्यांची समजून काढली गेली.

गावात दोन्ही डोस घेतलेल्यांचं प्रमाण ९५ टक्के आहे.

दुर्गम पाड्यावरच्या माणसांनी आजवर निभावलेल्या ‘एकी’चं यश असं की, त्यांच्या गावाची पायरी कोरोना चढू शकलेला नाही!  

धान्य किट देण्यासाठी मदत  करणाऱ्या संस्थांची नावे :  सोशल नेटवर्किंग फोरम नाशिक ,  सिटीआर मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, नाशिक,  आपली आपुलकी बहद्देशीय सेवाभावी संस्था,  विश्व हिंदू परिषद नाशिक, पेठ,  तहसिल कार्यालय पेठ, मंडळ अधिकारी कार्यालय पेठ  

चर्चेत सहभागी ग्रामस्थ : रमेश दरोडे (सरपंच), तुकाराम दोडके, भगवान दरोडे, महादू दुंदे, अर्जुन गालट, कैलास गालट, चिंतामण दोडके, पुंडलिक दरोडे, रामदास दरोडे, पोपट दरोडे, भावसा वातास, सुभाष दुंदे

पुढे काय होईल?

‘रुग्ण’ आढळला नाही याचा अर्थ अमूक भागात ‘संसर्ग’ पोहोचलाच नसेल, असं होत नाही. अतिग्रामीण, अतिदुर्गम भागात चाचण्या करण्याची फार सोय नसते, लोकांना छोटे-मोठे आजार झाले तरी कुणी लगेच चाचणी करुन घेत नाही. जी गावं दुर्गम, शहरांपासून तुटलेली, टोकावरची आहेत, त्यांचा बाह्य समाजाशी काही संपर्कच नाही किंवा कमी आहे, तिथे संसर्ग न होण्याची शक्यता आहेच.  अशी गावं आणि तिथं राहणाऱ्या माणसांमध्ये विषाणू प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. त्यामुळे पुढे कधीतरी संसर्ग झालाच तर इतरांच्या तुलनेत त्यांच्यासाठी जे त्रासदायक असू शकते. कारण अन्य लोकांमध्ये समूह प्रतिकारशक्ती, ॲण्टीबॉडीज तयार झालेल्या असतात.अर्थात, आजार पोहोचलेला नाही पण लस पोहोचली आहे, लसीकरण झालेले आहे तर आजाराचा धोका कमी होतो. कारण लसीमुळेही ॲण्टीबॉडीज तयार होतातच. त्यामुळे लसीकरण होणं या गावांसाठीही आवश्यकच आहे. - डॉ. प्रदीप आवटे(महाराष्ट्राचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी) 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिक