शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

यवतमाळ जिल्ह्यातला वाघिणीचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2018 6:00 AM

तब्बल अडीच वर्षं झाली, वाघिणीने यवतमाळ जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे.14 बळी गेले, काही जखमी झाले, शोधमोहिमेतल्या हत्तीनेही लोकांचा जीवच घेतला. दहशतीमुळे लोकांनी शेतात जाणे सोडले, लग्नासाठी या गावांत मुली देणे बंद झाले; पण वाघिणीचा माग अजूनही लागत नाही. वाघ वाचवले पाहिजेत; पण माणसे मेलीत तर चालेल का, असा उद्विग्न सवाल आता लोक करू लागले आहेत. ‘टी-वन कॅप्चर’ मोहिमेचा वेध घेताना गावागावांत दिसलेला संतापाचा उद्रेक.

-अविनाश साबापुरे

कधीही सर्कशीचे दर्शन झाले नाही; पण जंगलांच्या वेढय़ात वसलेल्या या गावांमधील गोरगरीब लोकांचे आयुष्यच सध्या सर्कस बनले आहे अन् रिंगमास्टर बनलीय खुद्द वाघीण! 

राळेगाव, पांढरकवडा, मारेगाव अशा तीन तालुक्यांमध्ये तिचा वावर लाखो नागरिकांच्या उरात धडकी भरवित आहे. वाघ कुठे, कधी, कसा हल्ला करेल याचा नेम नसल्याने तिन्ही तालुक्यातील गावकर्‍यांचे सध्या जगणेच जणू थांबले आहे. वाघाने मारलेली गाई-ढोरं, माणसांचे फाडलेले पोट गावक-यानी प्रत्यक्ष पाहिले आहे. अनेकांनी तर प्रत्यक्ष वाघ पाहिला आहे. त्याची डरकाळी ऐकली आहे. त्याच्या पाऊलखुणा (पगमार्क) अनेकांना दिसल्या आहेत. या सर्व खाणाखुणांमध्ये पाहणा-याना आपला काळ दिसला आहे.

वाघिणीचे हे प्रकरण सुरुवातीला कुणीही गांभीर्याने घेतले नाही. राळेगाव तालुक्यातून माणसे वाघाचे बळी ठरू लागले होते. नंतर कळंब, मारेगाव, पांढरकवडा तालुक्यातही जीव जाऊ लागले. ‘मरता क्या नही करता’ या म्हणीप्रमाणे हळूहळू ग्रामीण माणसांचा आवाज चढू लागला. स्थानिक राजकीय पुढा-याना या मुद्दय़ात ‘मसाला’ जाणवला. वन्यप्राणी आम्हाला, आमच्या गाई-ढोरांना मारतात. मग आम्ही वाघाला का मारायचे नाही, असे प्रश्न पुढे येऊ लागले. त्यानंतर वनविभागानेही वाघिणीचा प्रश्न मनावर घेतला. वाघिणीला जिवंत पकडण्याची मोहीम गेल्या वर्षी सुरू करण्यात आली. मात्र, पावसाळा लागला म्हणून मोहीम थांबविण्यात आली; पण वाघिणीला उन्हाळा काय अन् पावसाळा काय? दिसला माणूस की मारला, हा धुडघूस तिने सुरूच ठेवला, तर तिकडे वाघ पकडण्याची मोहीम रद्द करण्यात यावी, म्हणून प्राणिमित्र थेट उच्च न्यायालयात गेले. इकडे गावखेड्यातील वाघग्रस्त बायका-माणसांजवळ देवाच्या न्यायालयात करुणा भाकण्याशिवाय पर्याय नव्हता. आजही नाही. 

माणसांच्या जगण्याची शाश्वती संपलेली असताना वाघीण आता दोन बछड्यांसह दिसू लागली. त्यामुळे या पट्टय़ात एकच वाघ आहे की अनेक, या शंकेने गावकरी हादरले. शिवाय, आता वणी, घाटंजी तालुक्यातही वारंवार वाघाचे दर्शन घडू लागले आहे. अवघ्या 25 किलोमीटरवरील टिपेश्वर अभयारण्यात 18 वाघ असल्याचा दावा गावकरी करीत आहेत. तेच आता परिसरातील गावांमध्ये भटकत असल्याचे गावकर्‍यांचे म्हणणे आहे. तरी वनविभाग आणि शासन या अभयारण्यात केवळ दोनच वाघ असल्याचे छातीठोक सांगत आहे. गंभीर म्हणजे, सुरुवातीचे तीन बळी गेल्यावरही वनविभागाने हे वाघबळी असल्याचे मान्य केले नव्हते आणि पाठोपाठ बळी जात राहिले. अंजी, तेजनी, वरद, बोराटी, सखी, सराटी, वेडशी, आठमुर्डी, विहीरगाव, सावरखेडा, पळसकुंड, लोणी, खैरगाव, बंदर, खेमकुंड, उमरविहीर, झोटिंगधरा, जिरा, पिंपळशेंडा या गावातील एकंदर 14 बळी गेल्यावर वनविभागाला काहीशी दखल घ्यावीशी वाटली. झोटिंगधरा गावातील बळी गेल्यावर तर लोक इतके खवळले होते, की रागाच्या भरात उपविभागीय अधिका-याचे वाहनच त्यांनी पेटवून दिले. शेवटी, हा आपापल्या मतदारसंघातील मतदारांचा प्रश्न आहे, याचा साक्षात्कार काही राजकीय नव्या- जुन्या धुरिणांना झाला आणि वनविभागाला निवेदने देण्याचा सपाटाही सुरू झाला. वनविभागाच्या बैठकांचाही रतीब सुरू झाला.

वाघिणीच्या नावाने राजकीय धुळवड रंगात आलेली असतानाच सामाजिक कार्यकर्त्यांनाही जाग आली. राळेगाव, पांढरकवडा आणि मारेगाव तालुक्यातील ज्या ज्या गावांमध्ये वाघिणीने धुमाकूळ घातला, त्यातील बहुतांश गावे आदिवासीबहुल लोकसंख्येची आहेत. वाघिणीच्या हल्ल्यात ठार झालेले बहुतांश शेतकरी, शेतमजूरही आदिवासी समाजात मोडणारे आहेत. साहजिकच आदिवासी अस्मिता बाळगणार्‍या संघटनांनी यात उडी घेतली. वाघिणीला नियंत्रणात आणू न शकलेल्या वनविभागावर कारवाई करावी, अशी मागणी थेट राज्यपालांकडे करण्यात आली.मानवाने वाघाच्या क्षेत्रात अतिक्रमण केल्यामुळे हा प्रकार उद्भवल्याचे अनेक जाणकार सांगत आहेत. मात्र आम्ही तर वर्षानुवर्षे जंगलात जातोय, आमचे गाव कित्येक वर्षांपासून जंगलातच आहे. आजवर कधीच वाघाने इतकी माणसे मारली नव्हती. मग गेल्या दीड-दोन वर्षांतच इतके बळी का जात आहेत, हा प्रश्न गावक-याना पडला आहे.अखेर सप्टेंबर महिना उजाडताच देशातील सर्वात मोठी ‘वाघ पकडा’ मोहीम राळेगावात उघडण्यात आली. दरम्यान, वाघिणीला नुसते बेशुद्ध करून पकडायचे की मारायचे, हा खल सुरू झाला. त्यातच शोधमोहिमेत हैदराबादचा प्रसिद्ध शूटर नवाब शाफत अली खान याचा समावेश करण्यात आल्याने मोठा वाद माजला. वाघाला मारू नये म्हणून शूटर नवाबाला परत पाठविण्याची मागणी होऊ लागली. त्यातच हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही पोहचले. शेवटी नवाब शूटरला मोहिमेबाहेर करण्यात आले; पण नंतर त्याला पुन्हा बोलवण्यात आले. वाघिणीच्या शोधमोहिमेसाठी मध्य प्रदेश शासनाकडून चार हत्ती बोलावण्यात आले, तर ताडोबातील एक हत्तीही समाविष्ट करण्यात आला. दिवसभर हत्तीच्या मदतीने वाघिणीचा शोध घ्यायचा आणि रात्र होताच सावरखेडाच्या बेस कॅम्पमध्ये हत्ती बांधून ठेवायचे. पण प्रारंभापासूनच अडचणींची शृंखला ठरलेल्या शोधमोहिमेवर आणखी एक संकट ओढवले. 3 ऑक्टोबरच्या पहाटेच हत्ती बेस कॅम्पमधून निसटला. सैराट झालेला हा हत्ती गावोगावी हिंडू लागला. वनविभागाच्या लक्षात ही बाब येईपर्यंत हत्तीने काही गावे ओलांडली होती. मध्येच तो महामार्गावर पोहचला, त्यावेळी वाहतूकही खोळंबली होती. या पळापळीत हत्तीने एका वृद्धाला गंभीर जखमी केले, तर चहांद गावातील एका महिलेला चक्क सोंडेत उचलून जमिनीवर आपटले. महिला जागीच गतप्राण झाली. वाघाच्या हल्ल्यात बळी जातच होते, आता हत्तीमुळे शोधमोहिमेतही एक बळी गेला. वाघ पकडू न शकलेल्या वनविभागाच्या अधिका-याना हत्ती ताब्यात घेतानाही घाम गाळावा लागला. चोहोबाजूंनी टीका होताच, दुसर्‍याच दिवशी हा हत्ती ताडोबाच्या जंगलात परत पाठविण्यात आला. मध्य प्रदेशातील हत्तींनाही माघारी पाठविण्यात आले.

वनविभाग आणि शासनाने सुरुवातीलाच दखल घेतली असती तर एवढे बळी गेले नसते. आता सर्वस्तरातून येणार्‍या दबावामुळे कदाचित वाघीणही ठार होण्याचीच दाट शक्यता आहे. शिवाय, वाघांच्या नैसर्गिक वाढीसाठी अनुकूल असलेल्या आणि 17-18 वाघ वाढविणार्‍या पांढरकवड्याच्या टिपेश्वर अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यासाठी शासन आतातरी तत्परता दाखवेल का, असाही प्रश्न उपस्थित होतो आहे. वाघिणीच्या धाकाने जवळपास 500 एकर शेतजमीन पडीत पडली आहे. लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. वाघग्रस्त गावांमध्ये मुलगी द्यायची की नाही, याचाही दहावेळा विचार केला जातोय. 

‘कसेही करा, या वाघिणीला ठार मारा’, असे काकुळतीला येऊन गावकरी विणवत आहेत. तर दूर नागपूर, मुंबईसारख्या शहरात बसून प्राणिमित्र ‘वाघ वाचवा’ असा धोशा लावत आहेत. वाघिणीला मारू नका म्हणून नागपूरसारख्या शहरात निदर्शने करण्यात आली, पण ‘वाघ म्हणजे वाघ असतो अन् आमच्यासारखी माणसे त्याचे बळी ठरणारे शेळी असतात काय’, असा उद्विग्न सवालही गावकरी उपस्थित करीत आहेत.

(लेखक लोकमतच्या नागपूर आवृत्तीत उपसंपादक आहेत.)

avinashsabapure@gmail.com