मजूर ते साहित्यिक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 06:00 AM2019-09-15T06:00:00+5:302019-09-15T06:00:07+5:30

ही कहाणी आहे एका चहावाल्याची. गेली चाळीस वर्षे दिल्लीत ते चहाची टपरी चालवताहेत. त्याआधी मिलमध्ये मजुरी करीत होते. कोणीच आपली पुस्तके छापत नाही म्हणून, टपरीतला पैसा बाजूला काढून स्वत:च प्रकाशक झाले. अनेक पुस्तके लिहिली. लिखाणावर कार्यशाळा घेतल्या, तत्कालीन पंतप्रधान, राष्ट्रपतींकडूनही कौतुक झाले; पण आजही चहाची टपरी आणि पुस्तके ही त्यांची प्रेरणा आहे.

Tea vendor to well-known author.. A journey of Amravati's Laxman Rao | मजूर ते साहित्यिक!

मजूर ते साहित्यिक!

Next
ठळक मुद्देअमरावतीच्या लक्ष्मण रावांचा दिल्लीपर्यंतचा ‘अक्षर’ प्रवास..

- विकास झाडे/नितीन नायगांवकर

विजेचे बिल भरले नाही म्हणून सूतगिरणी बंद झाली. सर्व मजूर उघड्यावर आले. त्यात लक्ष्मण हा तरुणही होता. शेतात मात्र तो रमू शकला नाही. डोक्यात वेगवेगळे विचार, आकाश कवेत घेण्याच्या क्षमता असलेल्या या मराठी तरुणाने मग दिल्ली गाठली. चहाच्या टपरीवाला लक्ष्मण कठोर पर्शिमानंतर साहित्यिक लक्ष्मणराव झालेत. आज त्यांची साहित्य संपदा जगभर विखुरली आहे. अलीकडे चहावाला म्हटले की, लोकांच्या भुवया उंचावतात. डोळ्यासमोर दिसतात ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ! ही गोष्ट मात्र आहे एका मराठी चहावाल्याची.
लक्ष्मण गेले चाळीस वर्षे दिल्लीच्या रस्त्याच्या कडेला बसून चहा विकतो आहे. तेव्हाचा हा तरुण केवळ चहा विकण्यासाठीच दिल्लीत आला नाही तर मनाशी तो बाळगून होता आभाळभर स्वप्न ! डोक्यात होती विविध कथानके, त्यात होते राजकुमार आणि राजकुमारी, राजकीय रंगपटावरील ख्यातनाम व्यक्ती ! चार दशकानंतरही चहाचे दुकान तसेच आहे. परंतु या काळात खूप मोठा बदल झाला. फुटपाथवर थाटलेल्या चहाच्या दुकानालगत एक कापड अंथरलेले असते आणि त्यावर 25 कादंबर्‍या पसलेल्या असतात. अलीकडे चहाचा घोट घेताना कादंबर्‍यांची पाने पलटणार्‍यांची लक्षवेधी गर्दी झाली आहे. या कादंबर्‍या लिहिल्यात  स्वत: लक्ष्मण राव यांनी !
लक्ष्मण नत्थुजी शिरभाते हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथील. 1970 मध्ये याच परिसरात एका सूतगिरणीत मजूर म्हणून काम करीत होते. जेमतेम दहावा वर्ग शिकलेले लक्ष्मण यांच्या डोक्यात विविध व्यक्तिरेखांबाबत मंथन सुरू असायचे. गिरणी मालकाने विजेचे बिल न भरल्याने गिरणीची वीज कापण्यात आली. सर्व मजूर उघड्यावर आले. लक्ष्मणही त्यात एक ! चार महिने शेती करून पाहिली; परंतु मन रमेना. त्यांनी वडिलांकडून 40 रुपये घेतले आणि भोपाळ गाठले. तीन महिने भोपाळ पालथा घातल्यानंतर येथेही काही जमणार नाही म्हणून त्यांनी थेट दिल्ली गाठली. ते वर्ष होते 1975 चे. इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी विटा उचलण्याचे काम सुरू केले. सूतगिरणीमध्ये कामाला असतानाच त्यांच्या ओळखीचा पहेलवान रामदास उन्हाळ्याच्या सुटीमध्ये मामाच्या गावाला आला. त्याचे एका मुलीवर प्रेम बसले, रामदासवर गावातील लोकांच्या नजरा होत्या. पोहण्यात तरबेज असलेल्या रामदासला नदीच्या पात्रात डुबकी मारण्याची इच्छा झाली. त्याने सूर मारला; पण नदीच्या डोहातून तो बाहेर आलाच नाही !. या सत्यकथेवर आधारित लक्ष्मणरावची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली तिचे नाव ‘रामदास’!
1977 मध्ये दिल्लीतील आयटीओ शेजारील विष्णू दिगंबर मार्गावर लक्ष्मणराव यांनी पानटपरी सुरू केली; मात्र अनधिकृत म्हणून महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी त्यांचे सामान अनेकदा फेकून दिले. फुटपाथ हॉकरचा परवाना मिळाल्यानंतर त्यांनी चहाची टपरी सुरू केली. दिवसभर चहा करताना त्यांच्या डोक्यात विविध विषय असायचे. अर्थाजनासोबत आठवड्यातील एक दिवस दरियागंज येथील पुस्तक बाजारात ते घालवायचे. गुलशन नंदा यांचे लिखाण त्यांना खूपच भावले आणि त्यांच्यातील साहित्यिकास लिहिण्यासाठी ऊर्जा मिळाली. शेक्सपियर, सोफोक्लीज, मुन्शी प्रेमचंद, शरदचंद्र चटोपध्याय हे त्यांचे आवडते लेखक. याच काळात त्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यानंतर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून त्यांनी, बी.ए., एम.ए.ची पदवी घेतली. 
‘रामदास’ ही कादंबरी प्रकाशित व्हावी म्हणून लक्ष्मण राव यांनी अनेक प्रकाशकांकडे फेर्‍या मारल्या; परंतु कोणीही त्यांना दाद दिली नाही. शेवटी त्यांनी चहाच्या उत्पन्नातील काही भाग बाजूला ठेवत स्वत:चेच ‘भारतीय साहित्य कला प्रकाशन’ सुरू केले. 
या प्रकाशनाद्वारे त्यांनी द बॅरिस्टर गांधी, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परंपरा से जुडी भारतीय राजनीती, मानविकी हिंदी साहित्य, रामदास, नर्मदा, रेणू, दंश, पत्तियो की सरसराहट, अहंकार, दृष्टिकोण, अभिव्यक्ती, साहिल, प्रात:काल, पश्चिम के साहित्यकार, व्यक्तित्व, अभिव्यंजना, प्रासंगिक अपराध, ज्योतिष एवं वास्तुशास्र नाटक - इंदिरा गांधी, अध्यापक, हस्तिनापूर, शिवानी, प्रतिशोध हे त्यांची हिंदीतील पुस्तके प्रकाशित केली. 
लक्ष्मण राव यांची ग्रंथसंपदा जगभर पसरली आहे. त्यांची पुस्तके फ्लिपकार्ट, स्नॅपडिल, अँमेझॉन, शॉप क्लुज, डेली हंट, पेटीएम, किंडल वर विक्रीस उपलब्ध आहेत. त्यांच्या पुस्तकांच्या हजारो प्रती विकल्या गेल्या आहेत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लक्ष्मण राव यांना त्यांच्या घरी बोलवून त्यांचे कौतुकही केले. ज्या फुटपाथवर लक्ष्मणराव चहा करीत असतात, तिथेच विदेशातील लोकही लक्ष्मणराव यांना भेटायला येतात. पुस्तके कशी लिहायची आणि प्रकाशन कसे करायचे यावर दिल्ली, पुणे, उत्तराखंड येथे ते कार्यशाळा घेतात. त्यांचे साहित्य उर्दू आणि पंजाबी भाषेतही येत आहे.
दररोज सकाळी घरी पाच ते सहा तास लेखन-वाचन आणि दुपारी तीनपासून रात्री नऊपर्यंत चहाची टपरी चालवणे असा त्यांचा दिनक्रम आहे.
‘फुटपाथवर त्यांचे अख्खे आयुष्य गेले, आता या जागेची त्यांना सवय झाली आहे. पुस्तकांच्या विक्रीतून त्यांचा खर्च निघतो. त्यांचा एक मुलगा अकाउण्टण्ट आहे आणि एक बँकेत नोकरी करतो. ‘माझी दोन्ही मुले घरखर्च सांभाळतात; पण ज्या जागेने माझ्यातील लेखक जगवला ती जागा सोडवत नाही म्हणून मी चहा विकतो,’ असे लक्ष्मण राव सांगतात. राष्ट्रपतींकडून कौतुक झाले, कित्येक पुरस्कारही मिळाले, देश-विदेशातील माध्यमांनी डोक्यावर घेतले, याचे मोल आहेच; पण चहा टपरीचे मोल त्यांना थोडे जास्तच आहे. 
गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या लिखाणातूनच ‘मानविकी हिंदी साहित्य’ या ग्रंथाची निर्मिती झाली. ‘शब्दकोशांचा वापर विद्यार्थी केवळ शब्दांचे अर्थ बघण्यासाठी करतात; पण शब्दकोश खर्‍या अर्थाने ज्ञानाचा कोश असतात. त्याचा मला खूप फायदा झाला,’ असे लक्ष्मण राव सांगतात. 720 पानांच्या या ग्रंथाच्या गेल्या महिनाभरात 40 प्रतींची विक्री झाली आहे. 

काय आहे ग्रंथात?
‘मानविकी हिंदी साहित्य’ हा ग्रंथ हिंदी साहित्याचा व भाषेचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. लक्ष्मण राव म्हणतात, ‘असे दहा ग्रंथ काढले तरी कमी पडावे एवढा हिंदीचा व्याप आहे. मी छोटासा प्रयत्न केला आहे.’ भाषेचा इतिहास, दृष्टिकोन, साहित्य आणि साहित्यिकांचा इतिहास, संत परंपरा, प्रगतिशील हिंदी साहित्य, हिंदी कादंबरीचे वर्गीकरण, विसंगती, मुन्शी प्रेमचंद यूग, व्यवहारातील हिंदी, हिंदी भाषा व मार्क्‍सचा दृष्टिकोन, नाट्यकला, आत्मकथा, हिंदी कवितेचा इतिहास, कबीर, तुलसीदास, पद्माकर अश्या अनेक विषयांवर लक्ष्मण राव यांनी प्रकाश टाकला आहे. इतिहास सांगतानाच तटस्थपणे त्याचे विश्लेषणही केले आहे. 

हिंदी भवनमध्येच लेखन कार्यशाळा
ज्या हिंदी भवनपुढे चहा विकण्यात आयुष्य चालले त्याच हिंदी भवनच्या सभागृहात लक्ष्मण राव यांच्या लेखन कार्यशाळा होतात. चार तासांच्या या कार्यशाळेसाठी विद्यार्थी 500 रुपये शुल्क भरून येतात. 

‘ही तर माझी मजबुरी’
‘लेखक आहेस तर चहा का विकतो, असा प्रश्न लोक विचारतात. माझ्या दृष्टीने लेखकाचा जन्म वयाच्या पन्नाशीनंतर होतो आणि मृत्यूनंतर त्याचे जीवन सुरू होते. जिवंतपणी रॉयल्टी प्राप्त करणारे लेखक बोटावर मोजण्याएवढे आहेत. मी एखाद्या विषयाचे गाइड काढले असते तर लाखो रुपये कमावले असते. ते जमले नाही म्हणून टपरीही चालवतो आणि लिखाणही करतो. हे माझे वेगळेपण नाही, मजबुरी आहे’, असे लक्ष्मण राव सांगतात.

‘अभ्यासक्रमांमध्ये माझी पुस्तके लागणार नाहीत’
‘शाळा किंवा विद्यापीठांमध्ये अभ्यासक्रमांना माझी पुस्तके लागू शकणार नाहीत, कारण त्यासाठी जे प्रयत्न करायचे असतात, ते मी करू शकत नाही. कमिशनशिवाय शाळा, विद्यापीठांमध्ये शिरणे अशक्य आहे. मी अनुभव घेतला आहे म्हणूनच इथे बसलोय. लोक पुस्तके घेतात, वाचतात. कोणत्याच भाषेत वाचकांची संख्या कमी झालेली नाही. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी माझा मार्ग निवडला,’ असे लक्ष्मण राव सांगतात.

(लेखक लोकमतच्या दिल्ली आवृत्तीत कार्यरत आहेत.)

Web Title: Tea vendor to well-known author.. A journey of Amravati's Laxman Rao

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.