घुमानवारीचे फळ

By admin | Published: April 12, 2015 06:14 PM2015-04-12T18:14:47+5:302015-04-12T18:14:47+5:30

घुमानमधल्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी-पंजाबी भाषेतल्या बंधाचे काय झाले कोण जाणो; पण अकाली दल आणि भाजपाच्या नेत्यांमधले बंध मात्र निश्चितच घट्ट झाले.

Swimming Fruit | घुमानवारीचे फळ

घुमानवारीचे फळ

Next

अविनाश थोरात

घुमानमधल्या मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मराठी-पंजाबी भाषेतल्या बंधाचे काय झाले कोण जाणो; पण अकाली दल आणि भाजपाच्या नेत्यांमधले बंध मात्र निश्चितच घट्ट झाले.‘घुमान’ पासून ‘सरहद’ र्पयत आणि भाजपापासून पंजाब सरकार्पयत सगळ्यांनीच काही ना काही ‘कमावले’!
. मराठी भाषा आणि साहित्याचे तेवढे विचारू नका!
--------------
साहित्य संमेलनाच्या यशस्वीतेचे मापदंड संमेलन स्थळावरील निवासापासून ते भोजनार्पयतची व्यवस्था हे(च) असतात असे मानले, तर पंजाबी औदार्याने गेल्या शंभर वर्षात झाली नसेल अशी व्यवस्था केल्याने घुमान मुक्कामी झालेले अ. भा. मराठी साहित्य संमेलन ‘यशस्वी’ झाले, असे म्हणता येईल. मात्र, या सगळ्यामध्ये घुमानकडे जाणा:या रेल्वेगाडय़ा ‘सायडिंग’ला टाकल्या गेल्या, तेच मराठी भाषा आणि साहित्याचे झाले नाही ना, अशी शंका येण्याजोगी परिस्थिती संमेलनाच्या तीन दिवसांत अनुभवली.
 दोन विशेष रेल्वेगाडय़ांमधले सुमारे अडीच हजार साहित्ययात्री, स्वत:च्या खर्चाने आलेले दीडशे ते दोनशे रसिक, अनेक राजकीय मंडळी आणि काही पत्रकारांच्याही घुमानवारीत साहित्य संमेलनाबरोबरच अमृतसरचे सुवर्णमंदिर आणि वाघा बॉर्डरवरील संयुक्त परेड यांच्या दर्शनाचे आकर्षणही होतेच. संमेलनाच्या दुस:या दिवशी वाघा बॉर्डरवरील परेडच्या वेळी मराठी मनातील देशभक्तीची भावना उचंबळून आली होती आणि संमेलन स्थळावरील मंडप मात्र ओस पडले होते. दुस:या दिवशीचा प्रतिसाद लक्षात घेऊन तिस:या दिवशी समारोपाच्या कार्यक्रमात गर्दी खेचण्यासाठी गुरुदासपूर जिल्ह्यातील शिक्षण विभागातील सर्व कर्मचा:यांना रविवारच्या दिवशीही ‘ऑन डय़ूटी’ बोलावून वेळ निभावली गेली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंजाबचे उपमुख्यमंत्री सुरबीरसिंग बादल यांच्या उपस्थितीतील समारोप सोहळ्यात पाय ठेवायलाही जागा नाही अशी परिस्थिती होती. पंजाब सरकारने स्टेट इव्हेंटचा दर्जा दिल्यामुळे ख:या अर्थाने शासकीय पाहुणचार म्हणजे काय याचा अनुभव मात्र साहित्ययात्रींना आला.
सुमारे दोन हजारांवर साहित्ययात्रींची व्यवस्था घुमानमधील शाळा, गुरुद्वारे अशा विविध ठिकाणी केलेली होती. प्रत्येकाला गादी, ब्लँकेट  मिळेल यासाठी शासकीय कर्मचारी जातीने लक्ष घालत होते. लग्नघरात असावे आणि वधूकडील मंडळींची वरमायांना चुलवणावर पातेल्यामधून अंघोळीसाठी गरम पाणी देण्यासाठी घाई उडावी तसे चित्र सकाळी दिसत होते. पंजाबी औदार्य आणि शासकीय कर्तव्य यांच्या  मिलापात महाराष्ट्रातून गेलेला साहित्ययात्री चिंब भिजून गेला.  घुमान आणि परिसरातील गावक:यांनी स्वखर्चातून लंगर लावले होते. पंजाबी भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आग्रह करकरून साहित्ययात्रींना नेले जात होते. यामागे केवळ पाहुणचाराची पंजाबची परंपरा नव्हे, तर संत नामदेवांच्या प्रती असणारी भक्ती हेच मुख्य कारण होते.
गुरुदासपूर जिल्ह्याच्या अगदी टोकाला असलेल्या या गावाला बाबा नामदेवांच्या समाधीमुळे तीर्थक्षेत्रचे स्वरूप आले आहे. मराठी लोकांनी बाबा नामदेवांचाच काहीतरी कार्यक्रम आयोजित केला आहे, असे येथील स्थानिकांना वाटत होते. पहिल्या दिवशी ग्रंथदिंडीमध्ये बाबा नामदेवांच्या तसबिरी पाहून त्यांची खात्रीच पटली, त्यामुळे साहित्य संमेलनाला एक प्रकारच्या धार्मिक सोहळ्याचा रंग चढला होता. त्यामुळेच यंदा संमेलनात पुस्तकांपेक्षा संत नामदेवांच्या तसबिरी अधिक प्रमाणात खरेदी केल्या गेल्या. विशेष रेल्वेच्या अनेक खिडक्यांमध्ये प्रवासादरम्यान भक्तिभावाने संत नामदेवांची प्रतिष्ठापना झालेली होती.
 बाबा नामदेव यांचा हा जुलूस पाहण्यासाठी घुमानजवळील भटिवाल येथून नेहरसिंग भक्तिभावाने आले होते. शीख धर्मामध्ये ‘गुरुग्रंथसाहिब’ हा ग्रंथ सर्वोच्च मानला जातो आणि त्याचीच भक्ती केली जाते. त्यामुळे ‘मराठी साहित्य’ म्हणजे बाबा नामदेव यांचेच साहित्य असून, त्याचेच संमेलन भरले असल्याचे नेहरसिंग यांना वाटत होते. नेहरसिंग म्हणाले, ‘‘बाबा नामदेवांच्या भक्तिपरंपरेतूनच घुमान गाव वसले. आता मराठी लोक घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्रचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. यामध्ये आपला सहभागही असावा, आपल्यासाठी इतक्या मोठय़ा प्रमाणावर लोक आले आहेत. त्यांच्या सेवेत कुचराई होऊ नये, हीच सा:या घुमानवासियांची भावना आहे.’’
- पंजाब सरकारने संमेलनाला ‘स्टेट फंक्शन’चा दर्जा दिला, याचे उत्तरही कदाचित यामध्येच आहे. नामदेव शिंपी समाज हा पंजाबमध्ये ‘चिंबा’ नावाने ओळखला जातो. लवकरच येथे निवडणुका होत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर चिंबा समाज आपल्यासोबत आणणो या संमेलनामुळे सत्ताधारी अकाली दलाला शक्य झाले आहे.  अकाली दलावर आणि पंजाबमधील नागरिकांवर प्रचंड प्रभाव असलेल्या संत शिरोमणी अकाल तख्तानेही या संमेलनाला आशीर्वाद दिले होते.
संमेलनाच्या निमित्ताने मराठी-पंजाबी भाषेतील बंध घट्ट करण्याचा प्रयत्न झाला असे म्हटले जाते. तो यशस्वी झाला की नाही, हे माहीत नाही; परंतु अकाली दल आणि भारतीय जनता पक्षातील नेत्यांमध्ये मात्र बंध निश्चितपणो निर्माण झाला. त्याची पावती म्हणजे केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पंजाबसाठी अनेक रस्त्यांना मंजुरी दिली. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेगाडय़ांसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
घुमान हे (बाबा नामदेवांचे) गाव, आयोजक संस्था आणि भाजपपासून ते पंजाब सरकार्पयत सर्वानीच या संमेलनातून काही ना काही मिळवले; पण ज्या मराठी साहित्यासाठी संमेलनाचा हा सर्व पसारा मांडला गेला, त्या साहित्याला, मराठी भाषेला काय मिळाले, या प्रश्नाचे उत्तर नकारार्थीच येते.
पंजाब सरकारने साहित्य महामंडळाला सुरुवातीलाच सांगितले होते की, ‘तुमच्या कोणत्याही कार्यक्रमात आम्ही हस्तक्षेप करणार नाही. आम्हाला फक्त यजमानकीचे कर्तव्य बजावू द्या.’ - अगदी खरोखरच तसे वातावरण होते. उद्घाटन आणि समारोपाच्या कार्यक्रमातील राजकीय नेत्यांची उपस्थिती वगळता बाकी कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन महामंडळाच्याच हातात होते.
‘साहित्य संमेलन हा उत्सव आहे’ यामध्ये महामंडळ इतके अडकले, आणि संपूर्ण सोहळा उत्सवी करायचा या गंडाने इतके पछाडले गेले होते, की प्रत्येक कार्यक्रमात त्यांना ‘सेलिब्रिटी’ची गरज भासत होती. सेलिब्रिटींना आणण्यासाठी प्रयत्न केले जात असताना, साहित्यिक, विचारवंतांना मात्र पूर्णपणो डावलले गेले. संपूर्ण संमेलनात अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या साहित्यिकांची उपस्थिती दिसत होती.
अध्यक्षांचे भाषण हा संमेलनातील महत्त्वाचा भाग. डॉ. सदानंद मोरे यांच्यासारख्या अध्यक्षांकडून मोठी अपेक्षा होती; मात्र राजकारण्यांच्या भाऊगर्दीत डॉ. मोरे यांचे भाषण अडकले. निबंधाच्या परंपरेने केलेल्या या भाषणात वक्तृत्वगुणाचा पूर्ण अभाव असल्याने संमेलनाध्यक्षांचे भाषण टाळ्या वाजवून बंद करण्याचा प्रकार साहित्य संमेलनाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच घडला. साहित्य रसिकांपेक्षा तीर्थाटनाला आलेल्या वारक:यांनीच गर्दी केल्याने हा प्रमाद घडला असे म्हणणो चूक ठरणार नाही. यजमानांच्या दातृत्वामुळे डॉ. मोरे यांच्यासारखा विचारवंतही किती भारावून जातो, याचे दर्शनही त्यांच्या समारोपाच्या भाषणातून घडले. महाराष्ट्रात पंजाबीला द्वितीय भाषा म्हणून मान्यता देण्याची मागणीच त्यांनी करून टाकली. डॉ. मोरे यांची ही गत झाली असेल, तर सामान्य साहित्यरसिक पंजाबी औदार्यात किती आकंठ बुडाला असेल?

लेखण्या मोडून तलवारी?

मराठी साहित्याचे संमेलन म्हणजे काय याची जाण पंजाबी आयोजकांना नसणो यामध्ये वावगे नाही. पण किमान मराठी आयोजकांना तरी हे भान असायला हवे होते. घडले भलतेच! व्यासपीठावर तलवारी देऊन मान्यवरांचे सत्कार करण्यात येत होते. अनेक मान्यवर ‘स्टाईल’मध्ये तलवारी म्यानातून काढून उंचावतही होते. यामध्ये साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांचाही समावेश होता. ‘लेखण्या मोडा, तलवारी काढा’ हा संदेशच यातून दिला गेला नाही ना?

कोरडे ‘भावबंध’

मराठी-पंजाबी बंधाचे गुणगान संमेलनस्थळी सातत्याने होत होते; मात्र पंजाबमधील साहित्यिकांनी या संमेलनापासून फटकून राहणोच पसंत केले. मराठी साहित्याची किमान माहिती अनुवादित स्वरूपात देण्याचे औचित्यही संयोजकांनी दाखविले नाही. संमेलनाच्या तीन दिवसांत पंजाबी भाषेतील साहित्याबाबत अक्षरही बोलले गेले नाही.

 

Web Title: Swimming Fruit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.