चैतन्याचा सारांश-अंतर्देशीय पत्रवर छापलेले ‘पत्रसारांश’ हे बेडेकरांच्या नीटस ऊर्जेचे देखणो रूप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 07:30 AM2019-12-29T07:30:21+5:302019-12-29T07:35:02+5:30

देखणे  अक्षर आणि उपक्रमशीलतेने ख्यातकीर्त असलेले श्रीकृष्ण बेडेकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त.

 Summary of Consciousness - 'patrasaransha' printed on Inland Letters is a beautiful form of Bedekar's energy! | चैतन्याचा सारांश-अंतर्देशीय पत्रवर छापलेले ‘पत्रसारांश’ हे बेडेकरांच्या नीटस ऊर्जेचे देखणो रूप!

चैतन्याचा सारांश-अंतर्देशीय पत्रवर छापलेले ‘पत्रसारांश’ हे बेडेकरांच्या नीटस ऊर्जेचे देखणो रूप!

Next

-रत्नाकर मतकरी

श्रीकृष्ण बेडेकरांची आणि माझी पहिली ओळख झाली, ती त्यांच्या ‘पत्र सारांश’मुळे. अनेकांची ती तशीच झाली असणार. कारण ही घटनाच तशी नवलाईची होती. दैनिके, मासिके इत्यादी, साहित्य व बातम्या यांचा समन्वय साधणारी वार्तापत्रे, वाचकांर्पयत पोहोचवणो हे एकट्या दुकट्याचे काम नाही. तरीही एकट्या माणसाला हे काम करण्याची उत्कट इच्छा असल्यास त्याने काय करावे? - बेडेकरांनी यावर उपाय शोधून काढला. त्यांनी, आपल्या माहितीच्या वाचकांना थेट पोस्टाने ‘इनलॅण्ड’ लेटर्स’ पाठवली. त्या आकाशी अंतर्देशीय पत्रवर त्यांनी शक्य तेवढा मजकूर छापून घेतलेला असे. जास्तीत जास्त मजकूर समाविष्ट व्हावा, यासाठी तो लहान पण त्यांच्या सुबक हस्ताक्षरांत पत्ते घालून ते सर्वत्र पाठवत असत. इतकेच नव्हे ;त्यात कुठेही क्लिष्टता वा अवाचनीयता येऊ नये, याची काळजी घेतलेली असे. म्हणजे देखण्या, नेटक्या तरीही लहानशा अशा निर्मितीबरोबरच आखीव रेखीव अशा सुनियोजित रचनेचाही विचार बेडेकरांनी केलेला दिसत असे. डाळिंबात जसे आकर्षक दाणो गच्च भरलेले असतात, तसे ते अंतर्देशीय पत्र दिसे. मुळात मोठा आशय अशा त:हेने ‘गागर मे सागर’ असा छापून तो वाचकांर्पयत पोहोचवणे , ही कल्पनाच अफलातून- पण ती बेडेकरांनी वर्षानुवर्षे सातत्यानं राबवली. बहुतेक 
त्यांनी एकट्यानेच; कारण मी तरी आजवर असे दुसरे पत्रमासिक पाहिलेले नाही. पत्र तर सोडाच, पण इतके मोहक आणि तरीही कमी जागा व्यापणारे सुंदर अक्षरही दुसरे पाहिलेले नाही!
पत्रांमधून मजकूर पोहोचवून, त्यातील वेगळेपणा कायम राखूनही बेडेकरांचे समाधान झाले नसावे, कारण रीतसर अंक काढणो, दिवाळी अंक काढणे हे काही त्यांनी टाळले नाही. गेली काही वर्षे   ‘शब्ददर्वळ’ या नावाचा देखणा दिवाळी अंक ते काढतात. त्याचे संपादन करतात. त्यात लेख लिहितात, तो स्वत:च्या हस्ताक्षराने नटवत नसले तरी त्यात चित्रे, व्यंगचित्रे असतात. मासिकावर   स्वत:चा ठसा सर्वार्थाने उमटवणारा असा दुसरा संपादक विरळा. खरे तर  ‘पत्रसारांशकार’ ही ओळख पुरेशी असतानाही बेडेकरांनी, आपण प्रतिष्ठित -प्रस्थापित संपादकांच्या पंगतीत बसतो, हे पुन्हा एकदा आवजरून सिध्द केले. अनेक मानसन्मान, पारितोषिके मिळवली. आणि आपले   पत्रकारितेविषयीचे कधीही न आटणारे प्रेम वाचकांना जाणवून दिले. 
पत्रकारितेबरोबरच बेडेकरांची मित्रकारितादेखील विस्मयकारक आहे. माणसे जोडण्याचा त्यांना  विलक्षण छंद आहे. (माणसांविषयीच्या आपुलकीनेच त्यांना  ‘पत्रे’ लिहावीशी वाटली असतील का?) बहुतेक सर्व ‘कत्र्या’ व्यक्तींशी -विशेषत: कलावंतांशी परिचय करून घेऊन तो वर्षानुवर्ष टिकवणे -चांगला मुरवणो ही बेडेकरांची खासियत. महाराष्ट्रातील ठिकठिकाणच्या व्यक्तींशी त्यांनी इतकी घनिष्ट मैत्री ठेवली आहे , की ते स्वत: खरोखरच इंदूरसारख्या लांबच्या ठिकाणी राहात असतील,  याविषयी शंका यावी. दूरदूरचे प्रवास करणो, आपणच जोडलेल्या सुह्दांना भेटणो, पत्रे लिहिणो, हे सारे त्यांनी आजवर सर्वच वयात कसे जमवले असेल, याचे आश्चर्य वाटते. याला कारण त्यांची माणसांविषयीची ओढ हे जसे आहे, तसेच इंदुरात राहात असूनही स्वत:चे व्यक्तिमत्त्व इंदूरपुरते सीमित न ठेवता दूरवर पोहोचवावे, ही त्यांची आंतरिक ऊर्मी , हे ही आहे. 
स्वत:चे व्यक्तिमत्त्व अधिकाधिक विकसित करण्याच्या नादामधूनच बेडेकरांनी अनेक क्षेत्रमध्ये  स्वत:ला रमवले आहे.  लेखन, संपादन, चित्रकला, संगीत, गायन, रेखीव हस्ताक्षर अशा अनेक  कलांमध्ये ते पारंगत आहेत. ( त्यांच्या संचाराची आणखीही काही क्षेत्रे असतील, ज्यांच्याशी मी परिचित नाही) परंतु या सर्वामधून मला एकच श्रीकृष्ण बेडेकर दिसतात. ज्यांना स्वत:च्या निरनिराळ्या ओळखींधून अनेकविध लोकांर्पयत पोहोचायचे आहे. कदाचित इंदूरमध्ये 
वास्तव्य  करीत असल्यामुळे आपण दुर्लक्षित राहू की काय, 
या शंकेतून हा अनेक क्षेत्रंत वावरण्याचा ध्यास त्यांनी घेतला असेल! मात्र एक गोष्ट विशेष उल्लेखनीय आहे 
ती ही की परप्रांतात राहात असलेल्या अनेकांप्रमाणो त्यांनी आपल्या उपेक्षेविषयी तक्रार न करता त्या र्निबधालाच सकारात्मक स्वरूप देवून इंदूर बाहेरही स्वत:चे स्थान स्वत:च निर्माण केले. अनेकानेक उपक्रम करून स्वत:कडे महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. 
आज वाचनसंस्कृती लोप पावत चालल्याची तक्रार केली जाते. पर्यायाने लेखनसंस्कृतीलाही अस्तंगत होण्याची धास्ती आहे. शालेय विद्यार्थ्यापैकी ब-याच मुलांना मराठी समजते;पण वाचता येत नाही. अर्थात मराठी लेखनाची निकडही कमी होते आहे. पुढील काळात लेखन  हे फक्त ब्लॉग आणि टिवटरवर करायचे असते, असा समज दृढ होईल आणि पत्रसंदेशातले  ‘पत्र’ कधीच न लिहायचे व  ‘संदेश ’ फक्त मोबाइलवर पाठवायचा अशी प्रथा पडेल, ही भीती वाटते. अशी वेळी बेडेकरांच्या इतर उपक्रमांची दखल तर घ्यावीच घ्यावी, पण त्यांचे  ‘पत्रसारांश’ मासिक अंकही जतन करायला हवेत. त्यात अनेक प्रकारचे वेधक साहित्य आहे. बेडेकरांनी त्यांच्या व्यवस्थितपणाच्या बाण्यानुसार ते एकत्रित केलेच असतील; परंतु ते पुढच्या पिढ्यांनाही पाहायला मिळावेत, यासाठी साहित्य संस्कृती मंडळासारख्या संस्थांनी या संचिताची राखण करायला हवी. 
श्रीकृष्ण बेडेकरांच्या पंचाहत्तरीचा सोहळा आता साजरा होत आहे. परंतु त्यांच्यासारख्या  उपक्रमशील व्यक्तीच्या बाबतीत 75 हा , इंग्रजीत म्हणतात तसा  ‘फक्त एक आकडा’ आहे. त्याचा वार्धक्याशी काही संबंध नाही. कारण यापुढेही बेडेकर विविध क्षेत्रंत कार्यक्षम राहतील, याची खात्री आहे. त्यांच्यातील ऊर्जा अशीच सळसळत राहो, आणि त्याबरोबरच त्यांना नवनवीन कल्पना सुचण्यासाठी व त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी दीर्घकाल आयुरारोग्य लाभो, हीच सदिच्छा.  

 

Web Title:  Summary of Consciousness - 'patrasaransha' printed on Inland Letters is a beautiful form of Bedekar's energy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.