एक उठ(व)लेले वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 06:02 AM2019-02-17T06:02:00+5:302019-02-17T06:05:04+5:30

पालेकर जे बोलले ते योग्य होते; पण ते जिथे बोलले ते स्थान पाहता पालेकरांनी ‘औचित्यभंग’ केला हे निश्चित ! कलाविषयक ज्या घडामोडींना पालेकरांची हरकत आहे, ते हिमनगाचे फक्त टोक झाले! त्याखालचा अख्खा हिमनग मी जाणतो!

Suhas bahulkar clears the controversy at NGMA Mumbai and Amol Palekar | एक उठ(व)लेले वादळ

एक उठ(व)लेले वादळ

Next
ठळक मुद्देबरेच कलाकार ‘कला हे समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे साधन’ मानतात. त्यामुळे कलेचे क्षेत्र हे राजकारणाचे कुरण बनले असून, गटबाजी करणाऱ्या मंडळीमुळे चांगलेच फोफावले आहे.

- सुहास बहुळकर
थोर चित्रकार कै. प्रभाकर बरवे यांच्या १९९५मधील मृत्यूनंतर तब्बल २४ वर्षांनी एनजीएमए, मुंबई येथे बरवे यांचे सिंहावलोकनी प्रदर्शन बोधना या संस्थेमार्फत जेसल ठक्कर यांनी भरवले. त्याचे उद्घाटन ८ फेब्रुवारी २०१९ रोजी झाले. त्याप्रसंगी अमोल पालेकरांनी जे केले त्याला ‘औचित्यभंग’ असेच म्हणावे लागेल. शिवाय त्यांनी लगेचच १० फेब्रुवारी २०१९ला पत्रकार परिषदही घेतली व त्यानंतर उठलेला व उठवलेला गदारोळ पाहता हे सर्व त्यांनी ज्याप्रकारे योजनापूर्वक घडवून आणले ते अनुभवता, त्यामागे राजकारण असावे, असे वाटते. एनजीएमए, मुंबईसंदर्भात घेतल्या गेलेल्या काही चुकीच्या निर्णयांबाबत अमोल पालेकर जे बोलले ते योग्यच होते. त्याची माहितीदेखील त्यांनी माझ्याकडूनच घेतली होती, हेदेखील जाहीरपणे सांगितले आहे. पण त्यासोबतच मी व आमच्या समितीने शासनाने जे चुकीचे निर्णय घेतले ते शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यासंदर्भात अनेकांशी चर्चा केली होती, सुनावले होते व लेखी कळविले होते. हे मात्र पालेकरांनी उघड केले नाही शिवाय त्यासाठी वेगळे व्यासपीठ उभारून त्यावरून हे प्रश्न मांडण्याच्या व राज्य व केंद्र सरकारच्या चुकीच्या भूमिका व निर्णयाला वाचा फोडण्याचा प्रयत्नात मी आहे, हेदेखील त्यांना सांगितले असूनही दडवून ठेवले. प्रचार फक्त बोलताना अडवले हाच केला. म्हणूनच असा संशय येतो की, या प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रभाकर बरवे व त्यांची चित्रनिर्मिती यांचे स्मरण करण्यापेक्षा अमोल पालेकरांचा हेतू वेगळा होता. शिवाय एनजीएमएने घेतलेले चुकीचे निर्णय माझ्याकडून ज्ञात करून घेत व त्याचा हुशारीने वापर केला. अमोल पालेकर नाट्य व चित्रपट क्षेत्रातील ‘हीरो’ होतेच, आज ते प्रसारमाध्यमात सातत्याने चमकत आहेत व त्यासाठी त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी झाली व होत आहे, असा मुद्दा हिरिरीने मांडला आहे. त्यामुळे हा ‘कलाकार’ सोशल मीडिया गाजवत आहे, प्रसारमाध्यमात झळकत आहे; परंतु त्यासाठी त्यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास केला आहे. बरवे यांच्यासाठी, त्यांना मानवंदना देण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ औचित्यभंग करून वापरले आहे. कार्यक्रमापूर्वी आपण असे करू इच्छितो हेदेखील दूरभाष संभाषणात सांगितले आणि त्यावर मी कृपया असे करू नका, त्यासाठी वेगळे व्यासपीठ उभारण्याच्या प्रयत्नात मी आहे हे सांगितले, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. हा प्रसंग घडला त्याक्षणी माझे हेच मत होते व आजही ते कायम आहे. जे घडले ते निश्चितच खेदजनक आणि बरवेंवर अन्याय करणारे होते, योग्य नव्हते व नाही असे माझे ठाम मत आहे. याला कारण बरवे यांचे व्यक्तिमत्त्व आणि ते ज्या कलाविषयक शुद्ध विचाराने प्रेरित होऊन निष्ठापूर्वक जगले ते जीवन!
प्रभाकर बरवे कायमच कला आणि कलेची शुद्धता याविषयी आयुष्यभर आग्रही होते. कलाक्षेत्रातील पूर्वापार सुरू असलेल्या मतभेद, ईर्षा, निंदा-नालस्ती, बाजारीकरण आणि राजकारण अशा सर्वच गोष्टींचा त्यांना तिटकारा वाटत असे. केवळ शुद्धकला आणि कलानिर्मितीची प्रक्रिया याबद्दलच त्यांना रस असे. म्हणूनच बरवे त्यांच्या पूर्वीच्या, समकालीन आणि सध्याच्या कलावंतांपेक्षा फार वेगळे होते. कलाकाराने आपल्या कलाविचाराशी एकनिष्ठ राहाणे हेच त्याचे जीवन ध्येय असले पाहिजे, असे त्यांचे मत होते. म्हणून ते लिहितात,
‘‘अभिजात चित्रनिर्मितीसंदर्भात, चित्रकाराच्या सामाजिक बांधिलकीचा किंवा बाह्य बांधिलकीचा प्रश्न गौण ठरतो’’ - प्रभाकर बरवे.
हे ज्यांना ज्ञात आहे व बरवेंच्या अशा दृष्टिकोनाबाबत ज्यांना आदर आहे त्यांच्यासाठी या प्रदर्शनाचे निमित्त साधून अमोल पालेकर जे बोलले ते महत्त्वाचे असूनही अप्रस्तुत होते. औचित्यभंग करणारे होते. बरवेंना स्मरणे व त्यांना आदरांजली देणे यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ अन्य कारणासाठी वापरणे निश्चितच योग्य नव्हते. (शिवाय अमोल पालेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना हेदेखील माहीत नसेल की हे प्रदर्शन व्हावे म्हणून मी काय प्रयत्न केले... केंद्र सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांशी कशा प्रकारे लढलो व हा निर्णय घेण्यास त्यांना भाग पाडले.)
या पार्श्वभूमीवर ८ फेब्रुवारी २०१९ला काय घडले ते सत्य जगासमोर आणलेच पाहिजे. म्हणूनच मी हे लिहीत आहे..
 

उद्घाटन समारंभ : वस्तुस्थिती...
८ फेब्रुवारी २०१९ रोजी एनजीएमएचे पाच मजली कलादालन बरवे यांच्याशी संबंधित चित्रे, स्केचेस, डायऱ्या, कागदपत्रे, वस्तू यांनी भरले होते. पण त्यासोबतच प्रभाकर बरवे या चित्रकारासंदर्भात कमालीचा आदर व प्रेम असणारे, बरवेंना जाणणारे, जवळचे, ओळखणारे आणि न बघितलेले असे विविध वयाचे तरुण, मध्यमवयीन व वृद्ध स्री-पुरुष हजर होते. कारण हे प्रदर्शन ‘एका अत्यंत संवेदनशील, विचारवंत आणि प्रसिद्धी पराङ्मुख अशा प्रामाणिक व पारदर्शी व्यक्तिमत्त्वाने विविध प्रकारे केलेल्या अभिव्यक्तीचे होते. त्यावर जेसल ठक्कर, त्यांचे सहकारी आणि सल्लागार मन:पूर्वक संशोधन करून लोकांपुढे आणत होत्या. जे जे उपलब्ध ते आत्यंतिक तळमळीने मिळवून बरवेंच्या संयत व धीरगंभीर प्रवृत्तीला साजेशा पद्धतीने प्रदर्शित केले होते.
प्रदर्शनाच्या गेस्ट ऑफ ऑनर बरवेंचा सहवास व मैत्री लाभलेल्या ८६ वर्षांच्या ललिता लाजमी अत्यंत आत्मीयतेने आल्या होत्या. बरवेंचे सर्वात जवळचे मित्र दिलीप रानडे एक वक्ते होते, तर दुसरे अमोल पालेकर. वातावरण भारलेले होते. किंबहुना ते बरवेंचा कलेबद्दलचा मूलभूत विचार व बरवेंच्या मते कोण्याही अभिजात कलेचे आयुष्यातील पवित्र अस्तित्व व आध्यात्मिक अनुभवाचा प्रत्यय देणारे होते. या वातावरणात समारंभ सुरू झाला. स्वागताच्या उपचारानंतर जेसल ठक्कर यांनी त्यांचा बरवेंची ओळख ते हे प्रदर्शन हा प्रवास व त्यानिमित्ताने झालेल्या सर्व प्रक्रियेवर प्रकाश टाकला. त्यानंतर समारंभाचा अध्यक्ष असूनही माझ्यावर टाकलेली आमंत्रित वक्त्यांच्या परिचय करून देण्याची जबाबदारी पार पाडत मी बरवे यांच्या संदर्भातील हृद्य आठवणी आणि अनुभव सांगितले. आमंत्रितांपैकी ललिता लाजमी प्रथम बोलल्या. वय वर्ष ८६ असल्यामुळे त्या बसूनच बोलल्या आणि बरवे व त्यांच्या हृद्य आठवणींचा पट उलगडत असताना बरवेंचे चित्र त्यांनी दरमहा थोडे पैसे देत विकत घेतले त्यावेळचा जो अनुभव सांगितला, तो खरोखरच डोळे ओलावणारा होता. त्यानंतर बरवेंचे अत्यंत जवळचे मित्र दिलीप रानडे हे बोलले. त्यांनी बरवेंचे प्रामाणिक व संवेदनशील व्यक्तिमत्त्व, छोट्या छोट्या प्रसंगातही त्यांचा कलाशुद्धतेचा दृष्टिकोन आणि चित्रनिर्मितीतील वेगळेपण सांगत बरवे डोळ्यासमोर उभे केले. संपूर्ण वातावरण बरवेमय होऊ झाले.
यानंतरचे वक्ते होते अमोल पालेकर ! प्रायोगिक नाटक, चित्रपट, चित्रकला अशा विविध विषयांत वावरलेल्या अमोल पालेकरांचे भाषण ऐकण्यास सर्वजण उत्सुक होते. अमोल पालेकर बोलण्यास उभे राहिले. सुरुवातीस त्यांनी अमोल पालेकरी शैलीत बरवे यांची चित्रे, त्यांचा आलेला संबंध यावर थोडेसे भाष्य केले व ते नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबईसंदर्भात बोलू लागले. या गॅलरीच्या संदर्भात दिल्लीहून घेतले गेलेले चुकीचे निर्णय त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. यावर संचालक अनिता रुपावतरम यांनी त्या बसल्या होत्या तेथूनच काहीतरी सांगायचा प्रयत्न केला. तो त्यांच्या प्रशासकीय कर्तव्याचाच भाग होता. यावर पालेकरांनी आपले भाष्य सुरू ठेवले आणि ते लांबू लागले. साहजिकच प्रभाकर बरवे यांच्या या प्रदर्शनासाठी अपार कष्ट घेतलेल्या जेसल ठक्कर यांनी पालेकरांना नम्रतापूर्वक, ‘‘बरवेंवर बोला, त्यांच्या आठवणी सांगा’’, अशी विनंती केली. त्यावर पालेकरांनी ‘‘आर यू स्टॉपिंग मी?’’ असे विचारताच परत जेसलने, ‘‘नो सर, जस्ट रिक्वेस्टिंग यू टू टॉक अबाउट बरवे’’, असे नम्रतापूर्वक सांगितले. यानंतरही पालेकर त्यांचाच मुद्दा रेटत होते. त्यावर जेसलने पुन्हा विनंती करताच अमोल पालेकरांनी मराठी साहित्य संमेलनात नयनतारा सहगल यांना आमंत्रित करून त्यांचे निमंत्रण रद्द केले याचा उच्चार करत भाष्य करण्यास सुरुवात केली. मला स्वत:ला ते असह्य होऊ लागले होते. कारण मी अमोल पालेकरांकडून बरवेंच्याच आठवणी ऐकण्यास उत्सुक होतो. त्याचवेळी जेसलही कमालीची अस्वस्थ होती व तिने ‘प्लिज स्पिक अबाउट बरवे’, अशी विनंती केली तर माझ्या तोंडून ‘प्लिज स्पिक अबाउट बरवे अ‍ॅण्ड बरवे ओन्ली’ हे वाक्य निघून गेले. त्यावर असंतोष व्यक्त करत पालेकरांनी पुन्हा ‘आय अ‍ॅम स्पिकिंग अबाउट बरवे’, असे सांगत बरवेंबद्दलची काही वाक्ये बोलून आपले भाषण संपवले. त्याक्षणी उपस्थित सर्वजणांपैकी काहीजण सुन्न होते, काही भांबावलेले-गोंधळलेले होते तर काही पालेकरांच्या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट करत होते.
उद्घाटनाच्या समारंभाच्या सुरुवातीस असलेले ‘बरवे’मय वातावरण पार विस्कळीत झाले होते.
यानंतर एनजीएमएच्या संचालक अनिता रुपावरम उठल्या व चिडून काही बोलून निघून गेल्या. अमोल पालेकरांनी त्यांच्यानंतर कोणीही बोलायचे नाही, अशी अट घातली असूनही मी उठलो आणि माईकजवळ जाऊन ‘डिफरन्स ऑफ ओपिनियन्स इज अल्वेज देअर, अरग्युमेण्ट आर बाउण्ड टू हॅपन, बट वुई हॅव ग्यॅदर्ड हिअर फॉर प्रभाकर बरवे. हिस ऑनेस्टी, इंटिग्रिटी क्रिएशन अ‍ॅण्ड नन पॉलिटिकल अ‍ॅप्रोच... लेट अस फरगेट व्हॉटेव्हर हॅज हॅपण्ड अ‍ॅण्ड लेट अस एन्जॉय द एक्झिबिशन’ असे सांगून सभेचा समारोप केला.
त्यानंतर ९ फेब्रुवारीला या सर्व प्रसंगाच्या बातम्या वृत्तपत्रात झळकल्या. दि. १० फेब्रुवारी २०१९ला पुण्यात पत्रकार परिषद झाली आणि वृत्तपत्रे, टीव्ही, सोशल मीडियावर एकच वादळ उठले. त्यामुळे बिचारे प्रभाकर बरवे आणि त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल २४ वर्षांनी होणारे प्रदर्शन बाजूला पडले. वेगळाच गदारोळ उठला आणि प्रत्यक्ष उद्घाटन समारंभात न घडलेल्या घटनांचा साक्षात्कार अनेकांना होऊन त्यावर भाष्य, आरोप-प्रत्यारोप आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होऊन अमोल पालेकरांना आम्ही धमकावले, असेही प्रतिपादन होऊ लागले.
हे सर्वच उद्वेगजनक होते. बरवेंच्या जवळचे व त्यांना मानणारे उद्विग्न झाले होते. काहीजण भांबावून कुंपणावर बसून होते, तर काहीजण प्रदर्शनाला हजर नसूनही खोटे-नाटे आरोप करण्यात आणि अत्याचाराला-असंतोषाला वाचा फुटली अशा उन्मादात बोलत होते, लिहीत होते, बरळत होते.
***
उठलेले आणि उठवलेले वादळ आणि सरकारची माघार...
सध्या माणसे फारच सेन्सिटिव्ह झाली आहेत. देश असंख्य संवेदनक्षम मंडळीनी भरला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे असे म्हणणाऱ्यांना माध्यमे अनुकूल आहेत, किंबहुना काहीही सेन्सेशनल असले की तेथे धाव घेत आहेत. एकूणच वस्तुस्थितीचा सारासार आणि संयत विचार करणारे कमी होत आहेत. बरेच कलाकार ‘कला हे समाजातील अन्यायाला वाचा फोडण्याचे साधन’ मानत आहेत. साहजिकच राजकारण हे समाजाचेच प्रतिनिधित्व करणारे असल्यामुळे कलेचे क्षेत्र हे राजकारणासाठी कुरण मानणाऱ्या गटबाजी करणाऱ्या मंडळीमुळे चांगलेच फोफावले आहे. अशा मंडळीचा आवेश असा असतो की वर उधृत केलेले व त्यापेक्षा बरेच काही हेच कलेचे ध्येय असते, कलानिर्मितीचे प्रयोजन असते असे वाटणाऱ्यांची संख्या वाढत आहे.
- बरवे यापेक्षा फार फार वेगळे होते आणि म्हणूनच त्यांच्या प्रदर्शनासंदर्भात जे काही घडले ते माझ्यासारख्या अनेकांना वेदनादायक आहे, विशेषत: या प्रदर्शनाच्या नंतर उठलेले वादळ आणि त्याला घाबरून केंद्र शासनाने ज्या अविचारी पद्धतीने अमोल पालेकरांनी उठवलेल्या मुद्द्यांवर काही बाबतीत माघार घेतली, ती बघून हसावे का रडावे हेच माझ्यासारख्याला कळत नाहीसे झाले आहे. कारण अमोल पालेकरांनी जे मुद्दे उपस्थित केले तो तर फक्त हिमनगाचा वरचा भाग होता आणि हिमनग मी स्वत: जाणतो. शिवाय त्याबाबत मी सांस्कृतिक मंत्री, सांस्कृतिक सचिव व डायरेक्टर जनरल यांच्याकडे सातत्याने निषेध नोंदवीत आलो आहे, सूचना करत आलो आहे, सुधारणा सुचवीत आलो आहे. मी स्वत: अध्यक्ष असलेलया आणि संदेश भंडारे, ब्रिंदा चुडासामा मिलर, मनीषा पाटील, भरत त्रिपाठी आदी सात सदस्य असलेल्या समितीने आॅक्टोबर २०१७मध्ये नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट संबंधात घेतलेले निर्णय चुकीचे आहेत, हे संबंधित अधिकाºयांना लेखी कळविले होते. हे निर्णय काय व कशाप्रकारचे असावेत, याबाबत मार्गदर्शनही केले होते. दुर्दैवाने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. प्रत्यक्ष भेटीत सचिव श्री. गोयल आणि डायरेक्टर जनरल यांना स्पष्ट शब्दात हे चुकीचे निर्णय बदला हे सांगूनही त्यांनी त्याची दखल घेतली नाही. आता जे घडले त्यामुळे प्रत्यक्ष ज्ञान व अभ्यासापेक्षा ग्लॅमरच महत्त्वाचे आहे असे वाटू लागले आहे.
एकूण कलाविषयक धोरणासाठी केंद्र सरकारने जी उच्चस्तरीय अपेक्स कमिटी नेमली होती, त्याची १९ जून २०१८ रोजी मंत्री डॉक्टर महेश शर्मा उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत मी स्वत: एक निवेदन देऊन काही मूलभूत स्वरूपाच्या सूचना केल्या होत्या. त्यात नॅशनल गॅलरी आॅफ मॉडर्न आर्ट, मुंबईचा चित्रसंग्रह राष्ट्रीय स्वरूपाचा नाही त्यात सर्व राज्यातील थोर कलावंतांचे प्रतिनिधित्व नाही, यातून मार्ग कसा काढता येईल आणि इतर अनेक विषयांवर सूचना केल्या होत्या. या बैठकीला डॉक्टर फिरोझा गोदरेज, सरयु दोशी व देशातील अनेक कलाकार, अभ्यासक व कलासमीक्षक अपेक्स कमिटीचे सदस्य म्हणून हजर होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत मी आणि इतरांनी केलेल्या अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना तातडीने अंमलात आणायचा प्रयत्न करावा असे ठरले. परंतु दुर्दैवाने याहीबाबत काहीही घडले नाही. विशेष म्हणजे या बैठकीचे जे इतिवृत्त सर्वांना पाठविले गेले, त्यातही तीन तास मी दिलेल्या निवेदनांचा साधा उल्लेखही झाला नाही.
याउलट ग्लॅमर असलेल्या व्यक्तीने दुसºयाकडून माहिती घेऊन गदारोळ केला, की सरकार कोणाच्याही पक्षाचे असले तरी नमते घेते हा चुकीचा संदेश शासनाने अमोल पालेकरांच्या फक्त दोन मागण्या मान्य करून दुर्दैवाने दिला आहे. त्याची भलावण एका वृत्तपत्राने अग्रलेख लिहून ‘औचित्यभंगाची इष्टापती’ अशी केली. ‘लोकमत’नेही आपल्या दि. १२ फेब्रुवारीच्या २०१९च्या अग्रलेखात माझ्याबद्दल गैरसमज पसरवणारा मजकूर लिहिला.
पण मी हे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की, अमोल पालेकरांनी माझ्याकडून मुद्दे घेऊन जे सांगितले ते मी अभ्यासपूर्वक तयार केलेल्या व करत असलेल्या महाराष्ट्र व केंद्र सरकारशी संबंधित दृश्यकला विषयक असंख्य अडचणी व असंतोषाचे व त्यावरील उपायांचा जो हिमनग आहे, त्याचे फक्त वरचे टोक आहे.
१८८८मध्ये स्थापन झालेली बॉम्बे आर्ट सोसायटी आॅफ इंडिया आणि २०१८ मध्ये शताब्दी साजरी केलेली आर्ट सोसायटी आॅफ इंडिया या दोन संस्थांनी एकत्र येऊन राज्य आणि केंद्र शासनाच्या स्तरावर महाराष्ट्रातील कलाविषयक प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे.
शासन कोणत्याही पक्षाचे असो, हा लढा दीर्घकालीन आहे; आणि तो योग्य प्रकारे लढला पाहिजे.
(लेखक ख्यातनाम चित्रकार आहेत.)

suhasbahulkar@gmail.com

Web Title: Suhas bahulkar clears the controversy at NGMA Mumbai and Amol Palekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.