शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

‘‘सर, आम्ही आज आकाशगंगा ‘पाहिली’!”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2021 11:48 IST

नाशिकच्या Marathi Sahitya Sammelan अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांची ओळख, कीर्ती, कर्तृत्व हे सारेच मापनपट्टीच्या पलीकडचे! पण खुद्द डॉ. Jayant Narlikar यांना आवडणारी, मोलाची वाटणारी त्यांची ओळख म्हणजे ‘नारळीकर सर’ ही! तब्बल पंचवीस-तीस वर्षांपूर्वी नारळीकर सरांच्या एका वर्गाची ही लखलखती आठवण!

- मल्हार अरणकल्ले (ज्येष्ठ पत्रकार arankalle.malhar@gmail.com)कोथरूड. पुण्याचं उपनगर.  गोष्ट तिथलीच. चांगली पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची. उंच, धष्टपुष्ट आणि मजबूत चणीच्या झाडांच्या गर्द सावलीत विसावलेली  एक शाळा. साधी. दगडी बांधकामाची. वातावरण कमालीचं शांत.  याच शाळेचा एक वर्ग.  अठरा-वीस लाकडी बाक दाटीवाटीनं मांडलेले. बाकही तसे जुनेच. मोठ्या खिडक्या. सगळीकडं खेळतं वारं.  वर्ग तोच होता; पण त्या दिवशी शिक्षक मात्र बदललेले होते. तेवढ्या दिवसापुरतेच; आणि काही वेळासाठीच शाळेत आलेले शिक्षक होते जगविख्यात खगोल शास्त्रज्ञ आणि गणिती रँग्लर जयंत नारळीकर.

शाळेत सगळीकडं धावपळ सुरू होती. नारळीकरांचं स्वागत कसं करायचं, त्याची उजळणी सुरू झालेली. स्वागताची खूप नेटकी तयारी केलेली असूनही काहीशी धांदल.  एक वळण येऊन गाडी शाळेच्या प्रवेशद्वारापासून आत येते. थांबते. नारळीकर  गाडीतून उतरतात. नमस्कारासाठी सगळ्यांचेच हात कोपरापासून वर उचलले जातात. नारळीकरांच्या चेहऱ्यावर हास्याचा मंद शिडकावा पसरलेला. निळसर रंगाची जिन्स पँट आणि अर्ध्या बाह्यांचा खोचलेला शर्ट. पायांत सँडल्स.‘चला. थेट वर्गाकडंच जाऊ!’- नारळीकरांचा हलका आवाज. वर्ग जेमतेम दहा-पंधरा पावलांवर. नारळीकर लगेचच तिथं पोहोचतात. वर्गातले सगळे बाक भरलेले. मुख्याध्यापिका मुलींना सांगतात : आज नारळीकर सर तुमच्याशी बोलणार आहेत! एकजात सगळ्या बाकांना उत्सुकतेचे उन्हाळे फुटावेत, तशा मुली उभ्या राहतात. ‘सर नमस्कार’ असा सामूहिक आवाज वर्गभर फिरतो. पुन्हा एक हलका स्वीकार : नमस्कार.

वर्ग लगेचच सुरू होतो. नारळीकर टेबलावर एका बाजूला टेकून उभे. ‘सर, आपल्यासाठी खुर्ची ठेवली आहे!’ असं सुचवूनही नारळीकर मात्र तसंच उभं राहणं पसंत करतात. विषयाला सुरुवात होते. विषय आहे : विश्वातल्या आकाशगंगा.  बोलण्याचं माध्यम मराठी. सांगणं अगदी साधं-सोपं. चुकूनही इंग्रजी शब्दाचा उच्चार नाही. बोलण्याला एक विशिष्ट लय. सगळ्यांना कळेल इतकं संथ बोलणं. भरपूर उदाहरण. तपशीलवार वर्णन. पृथ्वीवरून खगोलात दिसणाऱ्या जवळपास सर्वच गोष्टी आपल्या ‘आकाशगंगे’त आहेत. अब्जावधी तारे आहेत. सूर्यापेक्षा लहान; आणि त्याच्यापेक्षा हजारो पट मोठे.

तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे आणि धुळीचे ढग, मृत तारे, नव्यानं जन्मणारे तारे अशा अनेक गोष्टी आकाशगंगेत आहेत; आणि विश्वात अशा अनेक आकाशगंगा आहेत! वर्गात कमालीची शांतता. साऱ्यांचे कान नारळीकरांच्या बोलण्याकडं. नारळीकरांचं सांगणं इतकं प्रभावी, की त्या इवल्या वर्गाच्या छताला लागून विश्वातील आकाशगंगा ओळीनं पसरल्या असल्याचा भास विद्यार्थिनींना व्हावा. आकाशगंगेची रचना कशी असते, पांढुरक्या रंगाचे पुंजके तिच्यात कसे फिरत असतात, तेजोगोल वर खाली कसे होत असतात... नारळीकर सांगत असतात, ते सारंच विलक्षण माहितीपूर्ण... रंजक आणि नवं... पुन:पुन्हा ऐकावं असं! घड्याळाकडं कुणाचंही लक्ष नव्हतं. नारळीकर ‘सरां’चा वर्ग संपला. आता प्रश्नोत्तरांसाठी वेळ होता. अनेक बाकांवरून हात उंचावले गेले. नारळीकर सरांनी सगळ्यांच्या शंकांचे समाधान केलं.

मुलींच्या चेहऱ्यांवर समाधानाचं चांदणं निथळत राहिलं होतं. सरही रंगून गेले होते. ‘वर्गात आत्ता नारळीकर सरांकडून जे ऐकलं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटलं?’ - मुख्यापिकाबाईंनी मुलींना विचारलं. बाकांवरून पुन्हा अनेक हात उंचावले. एकेक मुलगी तिचा तिचा अनुभव मांडू लागली. नारळीकर त्या अनुभवांतही गुंतत होते. पुन: पुन्हा अडकून जात होते. त्याचा विस्मय त्यांच्या चेहऱ्यावर दर क्षणी बदलत जाताना दिसत होता. 

एक मुलगी म्हणाली : सर, आम्ही आज आकाशगंगा पाहिली! तिच्या प्रवाहात जणू हात बुडवून पाहिलं. प्रवाहात धावणाऱ्या रजतकणांशी आम्ही जणू शिवाशिवी खेळतो. आम्ही आज लखलखता प्रकाश पाहिला. सर, आम्ही आज आकाशगंगा पाहिली!” नारळीकर क्षणभर स्तब्ध. एका तळव्यात हनुवटी टेकवून आश्चर्यचकीत झालेले. मुख्याध्यापिका, इतर सहशिक्षिका असे सगळेच मूकपणानं उभे. साऱ्या वर्गभर दृष्टिलाभाचा लख्ख चमत्कार!

नारळीकर सरांचा वर्ग संपला. चेहऱ्यावर निर्मळ हसू खेळवीत. ‘नमस्कारां’ची देवघेव करीत सर वर्गाबाहेर पडले. गाडीपर्यंत आले. मुख्याध्यापिका, सहशिक्षिकांना धन्यवाद दिले. तोच साधेपणा. तोच सभ्यपणा. गाडीचं दार स्वत: उघडून आत बसले. शाळेच्या प्रवेशद्वारातून गाडी बाहेर पडली. खगोलीय चमत्काराचा अपूर्ण आनंद मनात साठवून शाळेच्या आवारातून बाहेर पडताना प्रवेशद्वाराच्या फलकाकडं लक्ष गेलं. ‘अंधशाळा’ ही तिथली अक्षरं किती डोळस आहेत, त्याचा विस्मित अनुभव गाठीला घेऊन मी बाहेर पडलो. मलाही वाटत राहिलं : खरंच, किती साधा माणूस! किती मोठा माणूस!

टॅग्स :Jayant Narlikarजयंत नारळीकरMarathi Sahitya Sammelanमराठी साहित्य संमेलन