ओळख भारतरत्नांची, मौलाना अबुल कलाम आझाद

By Admin | Published: December 18, 2014 11:16 PM2014-12-18T23:16:13+5:302014-12-18T23:16:13+5:30

अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहनुद्दीन अहमद असं आहे. अबुल कलाम म्हणजेच ‘वाचस्पती’ ही पदवी त्यांना मिळाली होती.

Recognition of Bharat Ratna, Maulana Abul Kalam Azad | ओळख भारतरत्नांची, मौलाना अबुल कलाम आझाद

ओळख भारतरत्नांची, मौलाना अबुल कलाम आझाद

googlenewsNext

  सुबोध मुतालिक, (लेखक पुणे मराठी ग्रंथालयाचे कार्यकारिणी सदस्य आहेत.) -

 
मौलाना अबुल कलाम आझाद , (भारतरत्न पुरस्कार सन १९९२)
 
अबुल कलाम आझाद यांचे मूळ नाव अबुल कलाम मोहनुद्दीन अहमद असं आहे. अबुल कलाम म्हणजेच ‘वाचस्पती’ ही पदवी त्यांना मिळाली होती. पुढे ते आझाद नाव लावू लागले. आझाद यांचा जन्म ११ नोव्हेंबर १८८८ रोजी मक्का येथे झाला. त्यांचे वडील भारतीय होते, तर आई अरब होती.
आझाद यांना लहानपणापासून वाचन, लेखनाची हौस होती. त्यांनी फारसी, उर्दू, अरबी भाषांचे ज्ञान मिळविले. तसेच तर्कशास्त्र, इस्लाम धर्म, तत्त्वज्ञान, गणित या विषयांचा अभ्यास केला. आझाद यांनी लोकजागृतीसाठी कोलकता येथे ‘अल हिलाल’ हे उर्दू साप्ताहिक सुरू केले; पण इंग्रज सरकारने त्यावर बंदी घातली. नंतर त्यांनी ‘अल बलाग’ हे दुसरं साप्ताहिक सुरू केले. मौलाना आझाद त्यांच्या लेखनातून ब्रिटिश राजवटीविरुद्ध जनतेला जागृत करत. जनतेच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची जाणीव निर्माण करत. विशेषत: मुस्लिमांनी हिंदू समाजाच्या बरोबरीनं ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करावा, असं ते त्यांच्या लेखनातून, भाषणातून सांगत. आपल्या धर्माची तत्त्वं त्यांनी जपली. मात्र, खरा धर्म मानवता धर्म आहे, या मानवतावादी धर्माचे आचरण करावे, त्यातूनच समाजाची आणि देशाची सेवा करावी, ही गोष्ट मौलाना आझाद यांना गांधीजींकडून कळाली. ते गांधीजींचे अनुयायी बनले. पुढे काँग्रेसचे प्रमुख नेते झाले. वयाच्या अवघ्या पस्तिसाव्या वर्षी ते काँग्रेसचे अध्यक्ष झाले. तेव्हा अध्यक्षीय भाषणात हिंदू-मुस्लिम ऐक्यावर त्यांनी भर दिला. ८ ऑगस्ट १९४२ रोजी ब्रिटिश सरकारला ‘भारत छोडो’चा इशारा देण्यात आला. तेव्हा प्रमुख काँग्रेस नेत्यांची धरपकड झाली. अर्थातच, मौलाना आझाद यांनाही अटक झाली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे शैक्षणिक धोरण धर्मनिरपेक्ष होते. आधुनिक शास्त्रे आणि आधुनिक विचार यांनाच त्यांच्या शैक्षणिक धोरणात प्राधान्य होते.
मौलाना आझाद एक प्रभावी वक्ते होते, तसेच उत्तम लेखकही होते. ‘तरजुमानुल कोरान’ हा त्यांनी केलेला कुराणाचा अनुवाद प्रसिद्ध आहे. ‘इंडिया विन्स फ्रिडम’ हे त्यांचे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध करण्यात आले. मौलाना आझाद यांचे २३ फेब्रुवारी १९५८ रोजी निधन झाले.
  

Web Title: Recognition of Bharat Ratna, Maulana Abul Kalam Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.