गाव जातं देवभेटीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:29 AM2018-05-20T11:29:46+5:302018-05-20T11:30:00+5:30

मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक आणि सुरेगाव सिन्नर तालुक्यातली ही दुष्काळी गावं. घरादारांना टाळं ठोकून लोक देवभेटीसाठी जेजुरीला जातात. पाच दिवस अख्खी गावं रिकामी. ओस. गायीगुरांचं वैरण-पाणी बघायला, म्हाताऱ्याकोताºयांची काळजी घ्यायला आलेले पाहुणे आणि बंदोबस्तावरले पोलीस एवढेच गावात!

people visit in jejuri | गाव जातं देवभेटीला!

गाव जातं देवभेटीला!

Next


- समीर मराठे

सकाळी साधारण दहाची वेळ.
नाशिकहून सिन्नरच्या दिशेनं चाललो होतो. रस्ता नेहमीसारखाच गजबजलेला. सुसाट वेगानं जाणारी वाहनं, कर्कश्श वाजणारे हॉर्न..
सिन्नर ओलांडून पांगरीच्या दिशेला लागलो.
अचानक बदल जाणवायला लागला. वाहनं कमी झालेली. गर्दी गायब. मºहळ खुर्दच्या वाटेला लागलो तर रस्त्यावर अक्षरश: एकही वाहन नाही. एकदम शुकशुकाट. अधेमधे थोडीफार झाडं. उघड्याबोडक्या रस्त्यावर झाडांनी आपल्या सावल्यांचे तुकडे अधूनमधून अंथरलेले.
अधूनमधून काही घरं लागत होती. मानवी अस्तित्वाच्या खुणा जागोजागी दिसत होत्या.
कुठे पाण्याचे ड्रम, घराच्या पडवीत- काही ठिकाणी थेट दरवाजालाच उभी करून ठेवलेली खाट, अंगणात आडोशाला बसलेली गुरं, छोटी-मोठी मंदिरं, शाळा, बँकेची एखाद-दुसरी शाखा, पिंपळाचे पार, लहान मुलांना जोजवण्यासाठी पडवीत बांधलेल्या साडीच्या झोळ्या.. वाऱ्यानं त्या रिकाम्या झोळ्यांना पीळ पडलेला.
काही ठिकाणी दरवाजाजवळ लग्नाच्या नव्याकोºया पत्रिका टांगलेल्या. बाहेरगावहून आलेल्या; पण त्यांना हात लागलेला दिसत नव्हता..
काही घरांजवळ अंगणात चुली. अर्धवट जळून विझवलेली लाकडं चुलीत तशीच खुपसलेली. चुलीतली राख वाºयानं उडून कोळसे उघडेबोडके पडलेले. जवळच बंब उपडे करून ठेवलेले.
गावातल्या टपºयांवरची ओबडधोबड लाकडी बाकडी माणसांच्या आवाजाला आणि त्यांच्या बाजारगप्पांना आसुसलेली दिसत होती.
मºहळ खुर्द, मºहळ बुदु्रक, मºहळचाच भाग असलेली म्हस्के वस्ती, सुरेगाव.. या तिन्ही गावांत मानवी वस्तीच्या साºया खुणा अगदी ठासून भरलेल्या, पण माणसं?.. ती मात्र नाहीत!
गावातल्या प्रत्येक घराला कुलूप. नाही म्हणायला काही ठिकाणी एखाद-दुसरा म्हातारा-म्हातारी, एखादी लेकुरवाळी बाई, गुरांना वैरण घालताना एखादा माणूस दिसायचा; पण अपवादानंच..
मºहळ खुर्दच्या खंडोबाच्या देवळाजवळ पोलिसांची जीप दिसली. जवळच त्यांची राहुटी होती. दोन-तीन पोलीस होते.
जीपमधून सहायक पोलीस निरीक्षक रणजीत आंधळे उतरले.
त्यांनी सांगितलं, ‘गेल्या चार-पाच दिवसांपासून गावात माणसं नाहीत. बाहेरगावी गेले आहेत. सगळ्या घरांना कुलपं आहेत. गावांच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांनी घेतली आहे. दिवसा बारा पोलीस आणि रात्री बारा पोलीस! गावकरी परत आले की मग आम्ही बंदोबस्त मागे घेऊ...’
***
एकाच वेळी तीन तीन गावं संपूर्णपणे बंद. घराला टाळं ठोकून!
हे सगळं अजबच!
- त्याचीही मोठी परंपरा आहे.
मºहळ खुर्द, मºहळ बुदु्रक आणि सुरेगाव.
नाशिक जिल्ह्याच्या सिन्नर तालुक्यातील ही तिन्ही गावं. हा सारा दुष्काळी भाग. ‘समृद्धी महामार्ग’ या परिसरातून जात असल्यानं संपन्नतेचा काहीसा वारा मात्र इथे स्पर्शून गेला आहे.
गावांत बारा बलुतेदार, मुस्लीम बांधव असले तरीही जेजुरीचा खंडेराव हेच साºयांचं कुलदैवत.
या आपल्या देवावर साºयांचंच भलतं प्रेम. पण प्रेम असलं तरी, आलं मनात की जा आपल्या देवाच्या भेटीला, असं या गावकºयांना करता येत नाही. लग्न झालेल्या नव्या जोडप्याला किंवा एखाद्या कुटुंबाला एकट्यादुकट्यानं आपल्या देवाच्या भेटीला जाता येत नाही. जायचं तर अख्ख्या गावानं एकदम. एकत्र! नाहीतर कोणीच नाही..
मºहळ खुर्द येथे खंडेरावाचं एक मंदिर आहे. या गावाला प्रतिजेजुरी म्हटलं जातं. गावात काही धार्मिक कार्य असलं, लग्न असलं की पहिला मान या खंडेरावाचा. लोक त्याच्याच चरणी डोकं टेकतात.
मंदिरात चांदीचे घोडे आणि खंडेरावाची सोन्याची मूर्ती आहे. गावकरी, भाविक, देणगीदार यांच्या मदतीनं या मूर्तीत भर घातली जाते. सोन्याची ही मूर्ती आता १११ तोळ्याची झाली आहे असं गावकरी सांगतात.
जेजुरीला जाण्याची ही प्रथा पुरातन असली तरी दरवर्षी देवभेट होत नाही. अमुकच दिवशी, अमुकच तिथीला जायचं असंही बंधन नाही. तिन्ही गावच्या गावकºयांनी एकत्र बसायचं, निर्णय घ्यायचा, सर्वानुमते तारीख ठरवायची आणि घरांना टाळी ठोकून निघायचं!..
अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेल्या मºहळ बुद्रुकमधल्या एका आजोबांनी आपल्या आठवणीला ताण देऊन सांगितलं, ‘खूप वर्षांपूर्वी म्हणजे १९३६ला आमची तिन्ही गावं जेजुरीला देवभेटीला गेली होती. बैलगाड्यांच्या रांगांच्या रांगा लागल्या होत्या. प्रत्येक घराला टाळं होतं. प्रत्येकाचं आख्खं गणगोत जेजुरीला गेलं होतं. काही आठवडे गाव बंद होतं.’
१९३६नंतर गावकºयांना जेजुरीच्या देवभेटीचा योग आला तो मात्र तब्बल साठ वर्षांनंतर म्हणजे १९९७ला. त्यानंतर २००७, मग २०१३ आणि आता २०१८ला!
जेजुरीला देवभेटीला जायचं तर जवळपास सहा महिने आधीच सारी तयारी सुरू होते. तिन्ही गावच्या प्रमुख लोकांची बैठक होते. तारीख ठरते आणि मग झाडून सारे कामाला लागतात.
यंदा जेजुरीच्या देवभेटीची तारीख होती ११ ते १६ मे २०१८! तब्बल सहा वर्षांनी आलेला हा देवभेटीचा योग साधण्यासाठी मग अनेकांनी आपापल्या घरातली लग्नकार्यं उरकून घेतली. या काळात जर अचानक कोणाच्या घरी काही दु:खद घटना घडली तर देवभेटीच्या आधी दुसºया-तिसºया दिवशीच ‘दहावं, तेरावंही’ उरकून घेतात; पण सारे लोक जेजुरीला देवभेटीला जातात.
गावातल्या सगळ्यांनी देवभेटीला जायचं हा नियम. बाहेरगावाहून सून म्हणून आलेल्या मुलीलाही हा नियम लागू; पण गावातली मुलगी जर लग्न होऊन सासरी गेली तर तिला हा नियम लागू नाही.
देवभेटीला अख्खा गाव सोबत जात असला तरी प्रत्येक कुटुंब आपापली स्वतंत्र व्यवस्था करतं. कपडेलत्ते, आंथरूणपांघरूण, जेवणाचं सामान.. प्रत्येक कुटुंबाची स्वतंत्र गाडी. कुणी कार, कुणी टेम्पो, कुणी जीप, ट्रॅक्टर, ट्रक..
यावेळी तिन्ही गावांतल्या मिळून तब्बल एक हजाराच्या आसपास गाड्या देवदर्शनाला गेल्या. दहा हजाराच्या आसपास भाविकांनी एकाचवेळी यंदा जेजुरीला जाऊन देवभेट घेतली!
प्रत्येकानं आपल्या गाडीला पिवळा झेंडा लावलेला. प्रवासात ठिकठिकाणी लागणारा टोल अगोदरच नियोजन करून माफ करून घेतलेला. डॉक्टर, आरोग्यसेवक, अ‍ॅम्बुलन्स, लाइट, पाण्याचे टँकर, जनरेटर, मोबाइल शौचालयं, मुक्कामासाठी मोकळी पटांगणं.. याचं पूर्वनियोजन आधीच करून ठेवलेलं होतं.
एकूण पाच मुक्काम. श्रीक्षेत्र आळंदीला एक, जेजुरीला दोन, देहू आणि पांगरीला एकेक मुक्काम..
या तिन्ही दुष्काळी गावांत शेतीला दूध हा जोडव्यवसाय. त्यावरच अनेकांचा चरितार्थ चालतो. ज्यांच्या घरी जनावरं आहेत, अगदीच तान्हं बाळ असलेली ओली बाळंतीण किंवा इतरांवर अवलंबून असणारे आजे-पणजे.. त्यांचा सांभाळ करण्यासाठी घरातल्या कोणातरी एखाद्याला मग नाइलाजानं घरी थांबावं लागतं. पण त्यावरही अनेकांनी उतारा शोधला आहे. जनावरांची दुसरीकडे कुठे व्यवस्था करता येत नाही म्हणून या कालावधीत पाहुण्यांनाच ते आपल्या घरी राहायला बोलावतात. विशेषत: सासरची मंडळी अशावेळी कामाला येतात, घर, जनावरं सांभाळणं, त्यांचं वैरण, शेणमूत, गायीचं दूध काढणं, ते डेअरीत नेऊन देणं.. ही सारी कामं ती अगदी हौसेनं करतात, नातेवाइकांना देवभेटीचा योग जुळवून आणतात आणि त्यापोटी स्वत:ही पुण्य पदरी बांधतात!
***
भर टळटळीत दुपारी सुरेगावच्या ‘ओसाड’ रस्त्यावरून जात असताना एका घराच्या पडवीत लोखंडी पलंगावर एक आजीबाई पहुडलेल्या दिसल्या. कानाला इअरफोन. नातू बहुदा त्यांना मोबाइलवर गाणी ऐकवीत असावा. कौसाबाई त्यांचं नाव. नातू ‘पाहुणा’ होता. मुलीचा मुलगा. घरचे सगळे देवभेटीला गेल्यामुळे जनावरं आणि घराचं पाहण्यासाठी त्यांनी नातवाला बोलवून घेतलं होतं.
आम्ही गेल्या गेल्या त्यांनी नातवाला सांगितलं, ‘जा, फ्रीजमधून पाण्याच्या दोन बाटल्या घेऊन ये!’ थोड्याच वेळात लिंबू-सरबताचे ग्लासही हातात आले!
पडवीत झोळी बांधलेली होती. आजीबार्इंच्या सासूबाई तान्ह्या बाळाला झोका देत होत्या.
शेजारीच राहणारे नामदेवरावही यावेळी एकटेच नाइलाजानं घरी राहिले होते. जनावरांसाठी.
१९९७चा अनुभव त्यांनी सांगितला. म्हणाले, ‘त्यावेळी आमचं अख्खं कुटुंब जेजुरीला ट्रॅक्टरनं देवभेटीला गेलं होतं. घरातले सगळे मिळून ४५ जण होते! यावेळीही चार गाड्या केल्या आहेत!’
म्हस्के वस्तीवर रमेश मोरे जनावरांना पाणी पाजत होते. तेही आठवड्यापासून मुलगी-जावयाकडे ‘पाहुणे’ म्हणून आले होते. ते मूळचे विसापूर, येवल्याचे. मुलगी, जावई देवभेटीहून आले की परत गावी जाणार म्हणाले.
***
एव्हाना दुपारचे ३ वाजले होते. देवभेटीला गेलेली मंडळी सकाळीच देहूहून परतीच्या मार्गाला लागली होती. पालखी केव्हाही गावात येईल, असा अंदाज होता.
बघता बघता वातावरण बदलू लागलं.
एक एक करत माणसं रस्त्यावर येऊ लागली.
जो दिसेल त्या प्रत्येकाच्या तोंडी एकच वाक्य.. फोनवरही तेच.. ‘देव कुठवर आला?’
एक हजार गाड्यांचा ताफा. आस्ते आस्ते मार्गक्रमण सुरू होतं. सर्वात पुढे रथ. या रथाचा मान पांगरीकरांचा. त्याच्या मागे देवाची पालखी आणि त्याच्या मागे गाड्या.. एकही गाडी रथाच्या पुढे चुकूनही जात नाही.
कुणी सांगत होतं, नारायणगाव, कुणी मंचर, संगमनेर.. गावात चारपर्यंत येईल, पाचपर्यंत येईल..
गावात पाहुण्या आलेल्या बायकाही सज्ज झाल्या.. रस्त्यावर पाणी मारलं जाऊ लागलं. शेणाचा सडा. त्यावर जो तो भरउन्हात रांगोळ्या, स्वस्तिक काढत होता..
कीर्तांगळीच्या सुमन चव्हाणके, जापेवाडीच्या कविता गवांदे, मानुरीच्या कमळाबाई बोरकर..
साºयाच पाहुण्या. त्या सांगत होत्या, ‘देवभेटीला जाण्याचा चान्स गावकºयांना लवकर मिळत नाही. त्यांना माणुसकीची मदत आपण नाही तर कोण करणार? देवभेट त्यांची; पण पुण्य आपल्यालाही 
लागतंच की!’..
नैवेद्य तयार होऊ लागला. ओवाळणीची तयारी सुरू झाली. देव आता गावाजवळ आला होता.. देवानं वेस ओलांडल्यावर हळूहळू एकेक करत आता गाड्याही यायला लागल्या.. प्रत्येक गाडीवर पिवळा झेंडा लावलेला. मुलं, माणसं, बायका आणि सामानानं खच्चून भरलेल्या गाड्या. इतक्या दिवसांचा प्रवास; पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह आणि भक्तिभाव ओसंडून वाहत असलेला..
आम्ही म्हस्के वस्तीवर होतो.
तिथेही एक गाडी आली. घरातल्या सवाष्णीनं लगेच तिथल्या तिथे टोपी-टॉवेल देऊन ड्रायव्हरचा सन्मान केला. देवभेट घडवल्याबद्दल!
सगळीकडे लगबग चालू झाली.
भंडाºयाची उधळण सुरू झाली.
येळकोट येळकोट जय मल्हार..
खंडेराव महाराज कीऽऽ जऽऽय..
घोषणांचा गजर घुमू लागला..
ठिकठिकाणी ढोलताशे वाजू लागले.
डीजेवाले सज्ज झाले..
फटाक्यांच्या माळा तटातट फुटू लागल्या..
पालखी आता सुरेगावमार्गे मºहळ बुद्रुक, पांगरीला मुक्कामी आणि दुसºया दिवशी सकाळी मºहळ खुर्दकडे रवाना होणार होती.
सकाळी ज्या रस्त्यांवर माणूस दिसत नव्हता, त्याच ठिकाणी आता उभं राहायलाही जागा नव्हती. रस्त्यावर माणसं लाह्यांसारखी फुटू लागली होती.
संध्याकाळी चारच्या सुमारास म्हस्के वस्तीवर आलेली पालखी, पण तीन-चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मºहळ बुद्रुकपर्यंत यायला तिला रात्रीचे ८ वाजले.
डीजेचा दणदणाट.. भंडाºयाची उधळण.. फटाक्यांची आतषबाजी आणि त्यावर देवापुढे बेधुंद होऊन नाचणारी माणसं..
देव आता घरी आला होता, रात्री त्यानं पांगरीत मुक्काम केला आणि दुसºया दिवशी सकाळी वाजत-गाजत पुन्हा मºहळ खुर्दला जाऊन आपल्या मंदिरात विराजमान झाला! महाप्रसाद झाला आणि लोकं भक्तिभावानं घरी गेले.
***
देव मंदिरात गेल्यानंतर घरोघरचे देवही आपापल्या देव्हाºयात गेले. घरोघरी तळी भरली गेली.
आता तिन्ही गावांत वर्षभर जागरण, गोंधळाचा कार्यक्रम चालेल.. देवभेटीच्या या कहाण्या पुढच्या देवभेटीपर्यंत रंगतील.. आपलं दु:ख, आपला त्रास लोक विसरतील. दुष्काळाची दाहकता कमी होईल. गावांत पाणी नसलं म्हणून काय झालं, देवभेटीनं पाणीदार झालेल्या डोळ्यांतला आशावाद नव्यानं जागा होईल. सारे पुन्हा नव्या उमेदीनं कामाला लागतील. देवाचा हा आशीर्वाद त्यांना पुढची अनेक वर्षे तारून नेईल.
नंतर पुन्हा कधीतरी देवभेटीची ओढ अनावर होईल. हेवेदावे विसरले जातील. लोक एक होतील. बैठका बसतील. देवभेटीचं बोलावणं येईल. मरगळ पुन्हा झटकली जाईल. आनंदाचा, उत्साहाचा पूर येईल.. घरांना टाळी लागतील. गावं निर्मनुष्य होतील; पण देवभेटीनंतर भक्तिरसात चिंब झालेली माणसं पुन्हा गावी परत येतील आणि घराघरांत आनंद, उत्साहाची कारंजी पुन्हा उसळू लागतील..
याच आशेवर, याच परंपरेवर तर ही सश्रद्ध गावं आणि इथली माणसं आजवर टिकून आहेत, टिकून राहतील.
येळकोट येळकोट जय मल्हार...

अनोखा एकोपा..
देवाच्या भेटीला जेजुरीला जायचं तर सगळ्यांनी सोबत. एकट्यादुकट्यानं नव्हे. अख्ख्या गावानं सोबत जायचं आणि सोबतीनंच परत यायचं. त्यासाठी घरांना टाळं ठोकायचं आणि अख्खं गाव बंद ठेवायचं. मºहळ खुर्द, मºहळ बुद्रुक आणि सुरेगाव या तिन्ही गावची अनेक वर्षांपासूनची ही परंपरा.
ती कशी आली, का आली, याचं नेमकं आणि संयुक्तिक कारण तसं कोणालाच माहीत नाही, पण आजवर कोणीच ही परंपरा मोडलेली नाही. याच परंपरेमुळे गावांतील एकोपाही टिकून आहे.
मानाची परंपराही ठरलेली आहे. देवाच्या काठीचा मान म्ह्स्केवस्तीचा, पालखीचा मान मºहळकरांचा, रथाचा मान पांगरीकरांचा. पुजाऱ्याचा मान परिटांचा..
तिन्ही गावांत मिळून सर्व जातीधर्माचे लोक राहतात. मुस्लीम बांधवांचीही काही घरं इथे आहेत, पण त्यांचीही जेजुरीच्या खंडेरायावर अपार श्रद्धा. त्यांनीही गावाची ही परंपरा जपली आहे. गावाबरोबर प्रत्येकवेळी न चुकता त्यांचीही जेजुरीला हजेरी असतेच. यावेळीही ते प्रकर्षानं दिसून आलं..
 

Web Title: people visit in jejuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.