शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२९ पर्यंत मीच महाराष्ट्राचा CM, हेच कार्यक्षेत्र, दिल्ली अजून दूर”: देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत महायुती, इतरत्र स्वतंत्र; मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट संकेत, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल
3
निवडणूक आयोगाकडून आता देशभर SIRची तयारी; दिल्लीत दोन दिवसीय परिषद, अधिकाऱ्यांकडून आढावा
4
तेलावरून तापले राजकारण; ट्रम्प पुन्हा म्हणाले, भारत रशियन तेलाची खरेदी कमी करणार
5
मुंबईत महायुती एकत्र, काँग्रेसला सेना- मनसे नकोच; आयोगाच्या आदेशाआधीच नगरपालिकांसाठी तयारी
6
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध लादण्याचा प्रयत्न निंदनीय”: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
7
सरकारने केली शेतकरी, बेरोजगारांची फसवणूक: चेन्नीथला, काँग्रेसची राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
8
रेल्वे अपघातात पती गमावला, तिने लढा दिला; २३ वर्षांनंतर ‘सुप्रीम’ निर्णयाने न्याय मिळाला
9
सुवर्णाची झळाळी, शिर्डी साईमंदिरात उत्साहात दिवाळी; २.५० कोटींच्या रत्नजडित दागिन्यांची आरास
10
चांदीत ८ दिवसांत २६ हजारांची घसरण; सोन्याच्या दरालाही मोठा फटका, १ दिवसात ११ हजारांनी उतरले
11
सत्या नाडेला यांना वार्षिक पगार ₹८४६ कोटी मिळणार; एआयमुळे दिली मायक्रोसॉफ्टला ओळख
12
AUS W vs ENG W : 'चारचौघी' स्वस्तात आटोपल्या; मग ऑस्ट्रेलियाच्या या दोघी इंग्लंडला पुरुन उरल्या!
13
बोगस नोंदणी विरोधात सत्ताधारी आमदाराची कोर्टात धाव; एकाच पत्त्यावर हजारो मतदार, काय आहे प्रकार?
14
पुतिन यांची 'खतरनाक हसीना' जागी झाली, जगातील गुप्तचर यंत्रणा सतर्क, काय आहे नवीन मिशन?
15
क्रॉस बॉर्डरवर भारताचा दबदबा वाढणार; ६ महिन्यात भारतीय सैन्यात सज्ज होणार '२० भैरव बटालियन'
16
उद्धव ठाकरे पुन्हा राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानी; अचानक भेटीमागचं 'राज'कारण काय?
17
भाजपाची नाराजी नको, एकनाथ शिंदे करणार कारवाई; रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?
18
१६०० वर्षांपासून हजारो लाकडाच्या खांबांवर उभं आहे युरोपमधील हे सुंदर शहर, असं आहे त्यामागचं गुपित
19
अमेरिका, ब्रिटनमध्ये पडझड, उद्या भारतात परिणाम दिसणार? सोने-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात कोसळणार  
20
Video: शिवरायांच्या वेशभूषेत फोटो काढण्यास वसई किल्ल्यावर रोखले; परप्रांतीय सुरक्षा रक्षकाचा प्रताप

वेदनेचे शब्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 06:41 IST

विद्रोही सांस्कृतिक चळवळीतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे ‘विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन’ सुरू आहे. त्यानिमित्त संमेलनाध्यक्ष नजूबाई गावित यांच्याशी एक संवाद.

- मुलाखत : शर्मिष्ठा मीना शशांक भोसले

मराठी साहित्य आजही ‘ब्राह्मणी’ आहे. मुख्य साहित्यिक प्रवाहात कंपूशाही आहे. पुरोगामी चळवळी क्षीण झाल्या आहेत. बहुजन, स्त्रियांचे प्रश्न सर्वार्थानं बेदखल आहेत. मानवी दु:खाला कुठेच स्थान नाही. जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताशी तर कोणालाच काही देणंघेणं उरलेलं नाही. ज्या माणसांसाठी लढायचं त्यांच्या कहाण्या इतर समाजापर्यंत कधी पोहचतच नाहीत. त्या पोहचवण्याच्या हेतूनंच मी लिहिती झाले. ते मला माझं कर्तव्य वाटतं.

विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या सन्मानासाठी मनापासून अभिनंदन. आदिवासी आणि शोषित समूहासाठीचे लढे तुम्ही दीर्घकाळ लढत आहात. चळवळीत कार्यरत असतानाच लिहितं राहण्याचं महत्त्व तुमच्यासाठी नेमकं काय आहे?

लिहितं राहणं हे तर मला माझं कर्तव्यच वाटतं. कारण आजचं वास्तव प्रचंड बोचणारं आहे. एक गाव, एक पाणवठा, भूमिहीनांचे संघर्ष, नामांतर, बाबरी मशीद पाडल्यानंतर उभारलेला लढा असं सगळं मी अनुभवलं. मला दलित-ग्रामीण साहित्याने कधी स्वीकारलं नाही. पुरस्कार मिळाले; पण समीक्षा वाट्याला आली नाही. ते असो. ज्या माणसांसाठी लढायचं त्यांच्या कहाण्या उरलेल्या समाजसमूहापर्यंत कधी पोहचतच नाहीत. त्या पोहचवण्याच्या हेतूनं मी लिहिती झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रीच्या सबलीकरणासाठी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला विरोध झाला. बिल हाणून पाडण्यात आलं. त्यातल्या काही गोष्टी कायद्यात रूपांतरित झाल्या. मात्र आदिवासी स्त्रीला त्याही कायद्याचं संरक्षण नाही. कारण तिला ‘हिंदू स्त्री’ म्हणून मान्यता नाही. आदिवासी स्त्रीला हिंदू कोड बिल लागू करावं यासाठीचा आम्ही दिलेला लढा अपयशी झाला. ती स्त्री आज सर्वार्थाने बेदखल आहे. आदिवासी महिला सुखी-स्वतंत्र आहे असाच समज नागरी समाजात लोकप्रिय आहे. प्रत्यक्षात आदिवासी समाजातल्या अनेक प्रथा-परंपरा स्त्रीविरोधी आहेत. अमानुषतेची परिसीमा असलेल्या डाकीण प्रथेला ही स्त्री बळी पडतेय.डाव्या-पुरोगामी स्त्री संघटनांपुढे मी हे प्रश्न मांडले. मात्र त्यांच्या लेखी ते महत्त्वाचे नव्हते. त्या वेदनेतून मी लिहिती झाले, इतकंच.

कॉ. शरद पाटील यांच्यासोबतचं तुमचं सहजीवन खूप समृद्ध राहिलं. तुमच्या लिहितं होण्यात त्यांचा वाटा नेमका काय होता?

मला तर साहित्यातलं काही कळत नव्हतं. कॉ. शरद पाटील सतत लिहिण्याचा तगादा माझ्यामागे लावायचे. मला कुणाकुणाचं कसदार लिखाण आवर्जून वाचायला द्यायचे. त्यातूनच मी आनंद यादवांचं ‘झोंबी’ वाचलं. वाचून वाटलं, हे ग्रामीण जगणं इतकं कष्टाचं असेल तर आदिवासीचं अजूनच भेगाळलेलं आहे. मी लिहिती झाले. कॉम्रेडनं लिखाणात वेळोवेळी सुधारणा केल्या. माझी ‘तृष्णा’ कादंबरी आल्यावर टीका झाली. हे मी लिहिलं नसावं अशी शंकाही घेतली गेली. मग मी माझं हस्तलिखित दाखवलं लोकांना. पुढं ‘भिवा फरारी’ ही दुसरी कादंबरी आणि ‘नवसा भिलिणीचा एल्गार’ हा कथासंग्रह आला. आता लवकरच भूमिहीनांची उगवती चळवळ आणि शेतकºयांची मावळती चळवळ या विषयावरची नवी कादंबरी येणार आहे. एक कथासंग्रहसुद्धा लवकरच येईल.

आज लिहित्या असणाऱ्या स्त्रियांविषयी काय वाटतं? महिला पुरवण्या-नियतकालिकं कितपत आश्वासक वाटतात?

महिलांच्या प्रश्नावर अनेक मासिकं, पुरवण्या निघतात. पण बराचसा मजकूर वरवरचा असतो. बहुसंख्य स्त्रियांचे प्रश्न, संघर्ष यांना आवाज देण्यात हे मंच कमी पडतात. स्त्रियाच काय, आज सगळीच माणसं उद्ध्वस्त होण्याच्या कड्यावर उभी आहेत. त्यांना बळ देणारं साहित्य निर्माण व्हायला पाहिजे. तरुणांनी आजच्या काळाची भाषा समजून घ्यायला हवी. नसता काळाचे हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहतील. नव्या पिढीनं नुसतं शिकून काही होणार नाही, वास्तवाकडे पाहण्याची नजर कमवायला पाहिजे. आदिवासी पट्ट्यात वाहरू सोनवणेसारखे काही आश्वासक लोक आहेत. ज्यांनी भोगलं नाही असेही अनेक बिगर आदिवासी लोक आदिवासींच्या प्रश्नावर लिहू पाहतात. ते बेगडी ठरतं. धुळे, नंदुरबार पट्ट्यात अजून खूप माणसं लिहिती होणं गरजेचं आहे. नसता त्यांचं दु:ख असं चेहरा नसलेलंच उरेल. घराघरातल्या स्त्रियांनी लिहितं व्हावं असं मला खूप वाटतं. प्रत्येकीची एक कहाणी दिसते मला.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, त्याच्या अध्यक्ष निवडीची प्रक्रि या याबाबत काय वाटतं?मराठी साहित्य हे आजही ब्राह्मणी साहित्य आहे. त्याचा तोंडवळा बहुतांश मनोरंजनप्रधान दिसतो. मानवी दु:ख-वेदनेला तिथं फारसं स्थान नाही. शोषणाचे सूक्ष्म पदर उलगडले जात नाहीत. संमेलनातही साहजिकच याचे प्रतिबिंब पडलेले दिसते. अध्यक्ष निवडीची प्रक्रि या मला पटत नाही. शासनाची मदत घेऊन तुम्ही कसा व्यवस्थाविरोध करणार? दलित, ग्रामीण, मुस्लीम, महिला साहित्याचे प्रवाह थंडावलेत. पूर्वी साहित्यिकांच्या एका फळीने विद्रोह केला. पण नंतर अनेकजण प्रस्थापितांच्या वळचणीला जाऊन बसले. हे असं का झालं? अनेकांच्या कहाण्या आहेत; पण त्या पुढे आणायला ते धजत नाहीत. कारण प्रतिष्ठितांनी एक वर्तुळ आखून ठेवलंय. मुख्य साहित्यिक प्रवाहात कंपूशाही आहेच.

आज पुरोगामी चळवळीपुढची आव्हानं काय आहेत? चळवळीला बळ देण्यासाठी काय करायला पाहिजे?

एकेकाळी सशक्त असलेल्या चळवळी आज क्षीण झाल्यात. पक्ष-संघटना ब्राह्मणी छावणीखाली गेल्यात. बहुजनांचे प्रश्न नीटसे समजून घेतले जात नाहीत. मी कार्यरत आहे त्या सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाने जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची भूमिका घेतली. अनेक पुरोगामी पक्षांनी मात्र जातीबाबत आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही. जात दिवसेंदिवस उग्र होते आहे. जातिअंताचा समान कार्यक्रम घेऊन सगळे मतभेद बाजूला ठेवत आता एकत्र यावं.

आजघडीला विद्रोह म्हणजे नेमकं काय?

माणसानं जात-वर्ग-स्त्रीदास्यअंताची भूमिका घेतली तरच तो विद्रोह होणार. सामाजिक परिवर्तनाकडे साहित्य जाणार असेल तरच ते खरं विद्रोही साहित्य. सामाजिक, सांस्कृतिक विषमतेवर नेमकं बोट ठेवता आलं पाहिजे. अर्थात, त्याची किंमत मोजण्याचीही तयारी पाहिजे. संमेलनात माझं भाषण उत्स्फूर्त असेल. मात्र विद्रोह आणि आजघडीला त्याचा आविष्कार यावर मी आवर्जून बोलणार आहे.

आधुनिक म्हणवणाऱ्या समाजात जात-धर्माच्या अस्मिता तीव्र होताहेत. तंत्रज्ञानाचा वापर हिंसेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केला जातोय. या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता?

मानवी स्वभाव सत्ताप्रिय आहे. आज जग आधुनिक होत असलं तरी माणूस दिवसेंदिवस असुरक्षित होतोय. हिंसा करून तो सत्ता गाजवण्याचं क्षणिक सुख मिळवू पाहतो. आपल्याच आत दबा धरून बसलेल्या अमानवीपणाशी आता डोळा भिडवला पाहिजे.