सायकलींचे महामार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 06:04 AM2019-10-27T06:04:00+5:302019-10-27T06:05:08+5:30

विसावे शतक मोटारींचे होते;  पण एकविसावे शतक मात्न  सायकलींचे असणार आहे,  याची प्रचिती येत आहे. सायकलींना प्रोत्साहन आणि  प्राधान्य देण्याची सुरुवात  कोपनहेगन शहराने 1970च्या  दशकातच केली होती.  आणि आता अनेक देशांत जाणीवपूर्वक तसे प्रयत्न होत आहेत.

Now new trend in the world is Bicycle highways... | सायकलींचे महामार्ग

सायकलींचे महामार्ग

Next
ठळक मुद्देगजबजलेल्या असह्य शहरांची कोंडी फोडण्यासाठी  जगभरात वेगवेगळे पर्याय तयार केले जात आहेत.  त्या पर्यायांच्या कहाण्या सांगणारी नवी लेखमाला.

- सुलक्षणा महाजन
शहरांमध्ये सतत नव्या नव्या समस्या निर्माण होत असतात आणि त्यावर मात करण्यासाठी शेकडो मेंदू, डोकी, हात आणि पाय कामाला लागतात. एखादी कल्पना एखाद्या देशातल्या शहरात यशस्वी झाली की तिचे इतर शहरांमध्येही अनुकरण सुरू होते. त्यात अशा कल्पना डोळ्यांना सहज दिसतात तेव्हा त्यावर आधारित नागरी अभिकल्प झपाट्याने जगभरातल्या शहरांमध्ये स्वीकारले जातात. असे असले तरी जुन्या कल्पना, जुने अभिकल्प लगेच मोडून पडत नाहीत किंवा ते नष्टही केले जात नाहीत. मात्न कधी ना कधी त्यांचा त्याग करावाच लागतो. काही देश हे करण्यात अग्रेसर असतात, तर काही मागे राहातात. 
चीन देश हा असाच झपाट्याने नव्या कल्पना, नवे अभिकल्प (डिझाइन) सहजपणे स्वीकारणारा देश आहे; परंतु जेव्हा एखाद्या कल्पना जुनाट होतात, त्यागायला हव्यात असे लक्षात येते तेव्हा त्याचेही निर्णय चीनमधील शहरे झटपटपणे घेतात. ती कल्पना झपाट्याने राबवितात. नव्वदच्या दशकात अमेरिकेतील मोटारी हे चीनचे आदर्श बनले होते. पण, आता मोटारींचे आकर्षण ओसरले आहे. मोटारींचे नागरी आक्रमण र्मयादित करण्यासाठी आता सायकलींचे महामार्ग बांधण्याची नवीन मोहीम तेथे सुरू झाली आहे. या वर्षीच्या मे महिन्यात चीनमधील बीजिंग शहरात सायकलीचा पहिला महामार्ग तयार झाला. त्यामागे डेन्मार्क, हॉलंड, बेल्जियम, र्जमनी अशा युरोपच्या देशांमधील शहरांच्या प्रेरणा होत्या.
2010 साली डेन्मार्क येथील नगर नियोजनकार जान गेल यांचे ‘सिटीज फॉर पीपल’ हे पुस्तक प्रकाशित झाले होते. त्यामध्ये शहरे पादचारी आणि सायकलींना प्राधान्य देण्यासाठी कशी करावीत याची चर्चा आहे. या पुस्तकाचे जगातील सर्व भाषांमध्ये अनुवाद झाले. मराठीमध्ये त्याचा मी केलेला अनुवाद ‘असावी शहरे आपुली छान’, असे शीर्षक देऊन प्रकाशित झाला 2014 साली. त्या आधी चिनी भाषेत त्याचा अनुवाद होऊन, त्यावर चर्चा होऊन, नवी धोरणे घडवून, जुनी मोटारप्रेमी रस्त्यांसाठी केलेली धोरणे, कायदे बदलून सायकलप्रेमी शहरांची अंमलबजावणी सुरूही झाली. 
2012 साली डेन्मार्कच्या कोपनहेगन राजधानीमध्ये पहिला सायकल महामार्ग पूर्ण झाला होता. शिवाय तेथे 400 कि.मी. सायकलच्या महामार्गाच्या जाळ्यांचे नियोजन झाले होते. आता ते सर्व मार्ग कार्यान्वित झाले आहेत. कोपनहेगनच्या  उपनगरांमधून शहरात येणारे असंख्य नागरिक थंड हवामान, पाऊस, बर्फ असतानाही सायकलने, कोठेही वाहतूक कोंडीचे अडथळे न येता मध्यवर्ती शहरात कामासाठी येतात. वाटेमध्ये त्यांच्यासाठी हवा भरण्याचे, स्वच्छतागृहाचे आणि इतर सेवांचे थांबे आहेत. तेथे कपडे बदलून लोक कार्यालयात जातात.
युरोपमध्ये फ्रान्स, र्जमनी, बेल्जियम आणि इंग्लंडमध्येही आता असे सायकल मार्ग तयार झाले आहेत. विशेष म्हणजे असे नवे मार्ग उपलब्ध झाल्यावर नवनव्या प्रकारच्या नावीन्यपूर्ण सायकलीही उपलब्ध होत आहेत. जोडप्यांना एकत्न जाण्यासाठी, वृद्ध आणि लहान मुलांना घेऊन भटकण्यासाठी, बाजारहाट करून सामान घेऊन वेगाने सायकल चालवत जाणारे असंख्य सायकलवीर आणि वीरांगना मला कोपनहेगनमध्ये बघायला मिळाल्या होत्या. शिवाय वारा, पाऊस, बर्फ यांच्यापासून सुरक्षा देणारे कपडेही तेथे तयार झाले आहेत. कोपनहेगन शहरात सायकलच्या मार्गिकांसाठीही विशेष सिग्नल आहेत. लाल दिवा दिसताच तेथे अध्र्या मिनिटात असंख्य सायकली येऊन थांबतात. विशेष म्हणजे त्यांच्यासाठी हिरवा सिग्नल अर्धा मिनिट आधीच सुरू होतो. लाल सिग्नलला थांबलेल्या मोटारींसाठी असलेला दिवा हिरवा होण्याआधी सायकलस्वार कितीतरी पुढे गेलेले असतात.
सायकलींना प्रोत्साहन आणि प्राधान्य देण्याची सुरुवात कोपनहेगन शहराने 1970च्या दशकातच केली होती. तेव्हा मध्य-पूर्वेतून मिळणार्‍या खनिज तेलाच्या किमती त्या देशांनी अचानकपणे खूप वाढवल्या. त्या आर्थिक धक्क्यातून बाहेर पडण्याच्या हेतूने सायकलींना प्राधान्य दिले जाऊ लागले. मोटारींचे वाढते प्रस्त, अपघात, वाहतूक कोंडी अशी अनेक संकटेही त्याआधी अनुभवाला येत होतीच. त्यामुळे मोटारींच्या वापरावर निर्बंध आणणे सुरू झाले होते. मोटार व्यक्तिस्वातंत्र्य देते तसेच स्वातंत्र्य सायकलीही देऊ शकतात याची जाण तेथील वाहतूक आणि नगररचना तज्ज्ञांना होती. त्यामुळे तेलाचे संकट उभे राहताच तेथील शहरांनी सायकलींना प्रोत्साहन देणे सुरू केले. आधी रस्त्यावर सायकल मार्गिका तयार केल्या, पाठोपाठ भाड्याच्या सायकली उपलब्ध केल्या. शिवाय अरुंद रस्ते, गजबजलेले बाजारपेठांमधील रस्ते यावर मोटारींना बंदी घातली. रस्त्यांवरचे मोटारतळ कमी केले आणि त्यांचे भाडे अनेकपट वाढवले. सुरुवातीला अशा धोरणांबद्दल आरडाओरड झाली नाही असे नाही. अनेक नागरिक, वार्ताहर आणि व्यापारी त्याबद्दल साशंक होते. मोटारी कमी झाल्या तर खरेदीदार पाठ फिरवतील ही दुकानदारांची भीती प्रत्यक्षात मात्न खोटी ठरली. उलट अशा विभागातील दुकानातील खरेदीदार आणि खरेदी कमी न होता वाढली हे त्यांच्या लक्षात आले. रस्त्यांवरचे अपघात, कोंडी, वेळेचा अपव्यय, हवा आणि ध्वनिप्रदूषणही कमी झाले. सायकलींचे फायदे नागरिकांच्याही लक्षात आले. शिवाय सायकलींसाठी शहरांच्या नगरपालिकांनी वाहतूक आणि नगर नियोजनकारांच्या मदतीने विशेष पायाभूत सेवा तयार केल्या. त्यामुळे कमी खर्चात वाहतूक सुरळीत होते हे पालिकांच्याही लक्षात आले. 
कोपनहेगन शहरात हिंडत असताना मला एक मोठे सायकलचे तीन मजली दुकान दिसले. तेथील रंगीबेरंगी, लहान-मोठय़ा, हलक्या-जड सायकली तसेच त्याच्या सोबत लागणार्‍या हेल्मेटसारख्या अनेक लहान-मोठय़ा गोष्टी बघून मी अक्षरश: थक्क झाले होते. त्यावेळी मला आपल्याला सायकल चालविता येत नाही याचे प्रचंड दु:ख झाले. युरोपमधील कोणत्याही देशात आता माझ्यासारखे सायकल चालविता न येणारे नागरिकही बहुतेक राहिलेले नसतील. शाळेमध्ये प्रत्येक मुला-मुलीला तेथे सायकल चालविण्याचे धडे, त्यासंबंधीचे वाहतूक नियम आणि शिस्त या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. सायकलप्रेम आणि मजा आणि दुरु स्ती यांचा अनुभव घ्यायला शिकवले जाते. त्यामुळे युरोपमधील बहुतेक लोक अतिशय चटपटीत, तंदुरुस्त राहातात. मुक्तपणे, आत्मविश्वासाने हिंडतात. 
नेदरलॅँडमधील रॉटरडॅम शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनच्या तळघरात हजारो सायकली उभ्या करण्यासाठी विशेष प्रकारचे सायकलतळ आहे. घरातून थेट स्टेशनमध्ये सायकलने जाता येते. मात्न मोटारीने गेल्यास किमान 500 मीटर चालत जावे लागते. शिवाय पेट्रोल आणि गाडीतळाचे जबरदस्त भाडेही मोजावे लागते. सायकलींना मानवी प्रोत्साहन देण्यासाठी मानवी स्वभावाचा खास  अभ्यास केला जातो. त्यासाठी विशेष कल्पना राबविल्या जातात. युरोपमधील बहुतेक शहरे आपल्या शहरांसारखीच जुनी आहेत. तेथे गल्ल्याबोळ अतिशय चिंचोळ्या आहेत. वस्ती दाट आहे. विशेष म्हणजे तेथे मोटारींना जागा करून देण्यासाठी रस्ते रुंदीकरण मोहीम अजिबात राबवली जात नाही. उलट अरुंद रस्त्यांचे विभाग पूर्णत: मोटार-स्कूटरमुक्त केलेले आहेत. रुंद रस्त्यांवर रुंद पदपथ बांधून त्यावर झाडे लावून बसण्याची बाके टाकली आहेत. मोटारींच्या मार्गिका अरुंद आणि कमी केल्या आहेत. त्यामुळे मुले, वृद्ध माणसे मजेत सुरक्षितपणे, निर्धास्तपणे तेथे हिंडू-फिरू शकतात. तेथे बसून बुद्धिबळाचे डाव टाकतात.  
2010 साली मी चीनमध्ये बीजिंग शहरात प्रचंड वाहतूक कोंडी अनुभवली होती. एकेकाळी तेथे हजारो सायकली असत हे ऐकून होते. पण मला तेव्हा तेथे क्वचितच सायकली दिसल्या होत्या; परंतु गेल्या पाच वर्षांत पुन्हा सायकली केंद्रस्थानी आल्या आहेत. मोटारींवर चांगलेच निर्बंध घातले आहेत. त्याचवेळी सायकलींना प्रोत्साहन देण्याचे मार्ग मोकळे केले आहेत. युरोपचे अनुकरण करून आणि त्यांच्या सायकल सेवा बघून बीजिंग शहराने डेन्मार्कमधील तज्ज्ञ बोलावून सायकल महामार्गाचे जाळे तयार करण्याचे नियोजन केले. सायकल परंपरा पुन्हा जोपासण्याचा चंग बांधला आहे. पर्यटकांसाठी भाड्याच्या सायकली आणि सायकल रिक्षाही उपलब्ध करून रोजगारनिर्मिती साध्य केली आहे. 2019च्या मे महिन्यात तेथे पहिला मार्ग सुरू झाला. रेल्वे रुळांच्या बाजूला आणि मोटारींच्या महामार्गांच्या, उड्डाणपुलांच्या खाली, उन्नत सायकल मार्ग तयार केले आहेत. त्याच्या अनेक चित्नफिती यू -ट्यूबवर उपलब्ध आहेत. त्यामुळे शहरे मोटारमुक्त, सुरक्षित, हिरवी, सुंदर, पर्यावरणस्नेही होत आहेत. विसावे शतक मोटारींचे होते; पण एकविसावे शतक मात्न सायकलींचे असणार आहे, याची प्रचिती येत आहे. 

sulakshana.mahajan@gmail.com
(लेखिका प्रख्यात नगर नियोजनतज्ज्ञ आहेत.)
....................

(ही लेखमाला दर पंधरा दिवसांनी प्रसिध्द होईल.)

................

पूरक यू ट्यूब लिंक :https://youtu.be/7FGNyiGKqlk
https://www.citylab.com/transportation/2017/06/cruising-a-superhighway-built-for-bikes/531246/

Web Title: Now new trend in the world is Bicycle highways...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.